मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आईची, वहिनीची माया पडद्यावर जिवंत साकारणारी आणि प्रत्यक्षातही तशाच स्वभावाची असणारी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन हे कुणालाही चटका लावून जाणारे आहे. मराठी किंवा हिंदी चित्रपटांचे पूर्वीचे वैभवाचे दिवस राहिले नाहीत. हिंदी चित्रपटांना जेव्हा बॉलिवूड असे नाव वापरले जात नव्हते त्या दिवसांतील सुलोचना या पडद्यावर सोज्वळ आईची भूमिका साकारणाऱ्या कलाकार म्हणून इतक्या प्रसिद्ध होत्या की, त्यांच्याविरोधात कुणीही वेडेवाकडे बोलू शकत नसे. सुलोचना या आईची भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध होत्या. हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी निरूपा रॉय यांच्यानंतर धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, सुनील दत्त, राजेश खन्ना, देव आनंद या अभिनेत्यांची आई म्हणून आपल्या भूमिका गाजवल्या. तसेच अनेक अभिनेत्रींच्याही त्या आई होत्या. अमिताभ बच्चन एकदा म्हणाला होता की, चित्रपटात पडद्यावरच्या आईच्या निधनामुळे मी इतक्यांदा रडलो आहे की, माझी खरी आई गेली तरी मला रडू येणार नाही, असे वाटते. पण सुलोचनादीदी या काही आईच्या भूमिका करण्यासाठी सुरुवातीपासून आल्या नव्हत्या. सुलोचना यांचे खरे नाव होते सुलोचना लाटकर. त्या मराठी चित्रपटात आल्या त्या भालजी पेंढारकर यांच्यामुळे. भालजींसारख्या सिद्धहस्त दिग्दर्शकाचा वरदहस्त लाभल्यानंतर सुलोचनादीदींनी मराठी चित्रपटात भूमिका गाजवल्या. मीठ भाकर, साधी माणसं यासह अडीचशे हिंदी आणि मराठी चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. भालजींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सोज्वळ मराठी नायिकेची आणि नंतर आई, वहिनी अशाच भूमिका केल्या. त्यांनी कधीही चवचाल भूमिका केल्या नाहीत. इतकेच काय पण, त्यांनी क्वचितच पाचवारी साडीत भूमिका केल्याचे दिसते. कायम त्या नऊवारी साडीत सोज्वळ भूमिकेत असायच्या. आईचा सोज्वळपणा हा त्यांच्या रूपात जिवंत होता. पडद्यावर सोज्वळ आईची भूमिका साकारणाऱ्या सुलोचनादीदी प्रत्यक्षात तशाच होत्या, असे क्वचितच होते. कारण नाटकात सिंधूची भूमिका करणाऱ्या नायिकेने प्रत्यक्षात स्वतःच मद्य प्राशन करून तळीराम आणि सुधाकरापेक्षाही अधिक बेताल बडबड केल्याचे किस्से आहेत. तसे सुलोचनादीदींचे नव्हते. त्या जशा पडद्यावर होत्या, तशाच प्रत्यक्षात होत्या. मीठ भाकर, धाकटी जाऊ, साधी माणसं आणि हिंदीत तर देव आनंदसह असंख्य चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका गाजल्या. छत्रपती शिवरायांची माता जिजाबाईंची भूमिका त्यांनी केली की प्रत्यक्षात जिजाबाई अशाच असतील, असे वाटू लागे. (चित्रपट : मराठा तितुका मेळवावा) त्यांच्या एकटी या चित्रपटाला तर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता आणि त्यात त्यांच्या पुत्राचे काम काशिनाथ घाणेकर यांनी केले होते.
तेच पुढे त्यांचे जावई म्हणजे कन्या कांचन घाणेकर यांचे पती झाले. अर्थात तो विवाह फारच थोडी वर्षे टिकला आणि काशिनाथ यांच्या विवाहात अनेक गुंतागुंत होती. पण सुलोचना यांनी मुलीच्या प्रेमाखातर ती सहन केली. अर्थात तो वेगळा विषय आहे. पण त्यांच्या चित्रपटीय कारकीर्दीबद्दल सांगायचे तर त्यांची चित्रपट कारकीर्द अत्यंत यशस्वी होती. मराठीत त्यावेळी ललिता पवार, जयश्री गडकर, सीमा यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्री पडदा उजळवून टाकत होत्या. त्यांच्या तुलनेत उतरून इतके यशस्वी होऊन दाखवायचे, हे सोपे काम नव्हते. पण सुलोचनादीदींनी ते करून दाखवले. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आणि महाराष्ट्र भूषण हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना देण्यात आला. पण २०१० मध्ये त्यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले. खेड्यातून आलेल्या एका अर्धशिक्षित महिलेसाठी जिने आपल्या हिमालयाएवढ्या कर्तृत्वाने हे यश साध्य केले, तिच्यासाठी अतिशय उत्तुंग भरारी होती. सुलोचनादीदींनी कधीही पदरही ढळू दिला नाही आणि तरीही त्यांनी आपले चित्रपट यशाच्या शिखरावर नेले. चित्रपट चालण्यासाठी नायिकेने पदराची हालचाल करायला हवी आणि थोडीशी अश्लीलतेकडे झुकणारी हालचाल नृत्यात केली तरच ती यशस्वी, असे समीकरण तेव्हाही होते. पण सुलोचना यांनी तसल्या विचारांना कधीच थारा दिला नाही. त्यांनी थारा दिला तो मधू आपटे या पोरक्या कलावंताला. सुलोचनादीदी यांनी अडीचशेहून अधिक चित्रपटांतून भूमिका केल्या आणि त्या कोणत्याही वादात सापडल्या नाहीत. वाद घालावा किंवा दिग्दर्शकाला आपण सूचना करून आपल्या शहाणपणाचे प्रदर्शन करावे, असा त्यांचा स्वभावच नव्हता. कन्या कांचन घाणेकर यांचे त्यांनी प्रचंड लाड केले. पण काशिनाथ घाणेकर यांच्याशी मुलगी लग्न करण्यास तयार झाली म्हटल्यावर त्यांच्यातील आई जागी झाली आणि त्यांनी कडाडून विरोध केला. अर्थातच पुढे मुलीच्या प्रेमापुढे मातेच्या प्रेमाने हार खाल्ली आणि त्यांनी विवाहास परवानगी दिली. हा त्यांच्या आयुष्यातील खासगी भाग आहे पण त्याचा उल्लेख यासाठी केला की त्यांच्या कन्येने आपल्या आत्मचरित्रात त्यावर सविस्तर लिहिले आहे. सेटवर त्यांना मोठमोठे हिंदी अभिनेतेही दबकून असत. याला कारण म्हणजे त्यांचा अभिनय नितांतसुंदर, सोज्वळ आणि विलक्षण खेचून घेणारा होता. त्यात हिणकस असे काही नव्हतेच. सुलोचना यांनी हिंदी चित्रपटात प्रचंड दबदबा निर्माण केला होता. त्यांनी रामायण चित्रपटात कैकेयीची भूमिका साकार केली तेव्हा कैकेयीचा राग यायचा नाही, तर कैकेयीला भडकवणाऱ्या मंथरा झालेल्या ललिता पवार यांना साऱ्या शिव्या पडायच्या. अशा होत्या आमच्या सुलोचनादीदी.