Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

बिहार दुर्घटनेतील एस. पी. सिंगला कंपनीचं मुंबईतील कंत्राट रद्द करा

बिहार दुर्घटनेतील एस. पी. सिंगला कंपनीचं मुंबईतील कंत्राट रद्द करा

मुंबई : बिहारच्या भागलपूरमध्ये गंगा नदीवर बांधकाम सुरु असलेला पूल रविवारी पडला. या पुलाच्या बांधकामाचे कत्राट एस. पी. सिंगला कंपनीला देण्यात आले होते. त्यामुळे अशा कंपनीला मुंबईतल्या पुलाच्या बांधकामाचं कंत्राट देऊ नये व कंपनीचा काळ्या यादीत समावेश करावा, अशी मागणी काँग्रेस नेते रवी राजा यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील उड्डाणपूल आणि उन्नत मार्गाच्या पुलाचं काम एस. पी. सिंगला कंपनीला देण्यात आलं होतं. मात्र हे काम काढून आता दुसर्‍या कंपनीला देण्यात यावं, अशी रवी राजांची मागणी आहे.

डिसेंबर २०२१ला या कंत्राटाबाबतचा प्रस्ताव पास झाला आणि जानेवारी २०२२ मध्ये तो मंजूर झाला. मुंबईतल्या पुलांचे कामही एस. पी. सिंगला कंपनीकडून सुरु करण्यात आले आहे. याबाबत गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे जे काम सध्या सुरु आहे ते निकृष्ट दर्जाचे आहे, असे रवी राजा म्हणाले. दीड वर्षांत त्यांनी फक्त २०% काम पूर्ण केले आहे. या कंपनीने बांधलेला पूल ४ जूनला कशा प्रकारे कोसळला ते अख्ख्या देशाने पाहिलेलं आहे, त्यामुळे कंपनीला ब्लॅक लिस्ट करण्याची रवी राजांनी मागणी केली आहे. यासंबंधी महापालिका आयुक्तांनी फेरविचार करावा व ताबडतोब निर्णय घ्यावा, असे आवाहन रवी राजांनी केले.

कमिशनखोर उद्धव सरकार

दरम्यान, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबईतल्या पुलांचं कंत्राट एस. पी. सिंगला कंपनीला देण्यात आलं होतं, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सरकारने फक्त आणि फक्त वसुली आणि कमिशनच्या उद्देशापोटी कामे दिली, अशी टीका भाजप आमदार राम कदम यांनी केली. हे कंत्राट दुसर्‍या सक्षम कंपनीला देण्याची मी मागणी करणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा