
नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारमधील कारकिर्दीला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क अभियानांतर्गत केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते अमित शाह महाराष्ट्र दौर्यावर येणार आहेत. १० जून रोजी ते नांदेडमध्ये दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे.
भाजपच्या मोदी मिशन २०२४ अंतर्गत केंद्र सरकारच्या कामांचा प्रचार करण्यासाठी अमित शाह देशभरात दौरे करणार आहेत. १० जूनला ते महाराष्ट्रात नांदेडमध्ये दाखल होतील. या दिवशी नांदेडमध्ये संध्याकाळी पाच वाजता अमित शाह जाहीर सभा घेणार आहेत. या सभेत ते केंद्र सरकारच्या कामांचा प्रचार व प्रसार करणार आहेत.
महाराष्ट्रात या प्रचाराची सुरुवात मुंबईपासून करायचे ठरले होते. मात्र तो दौरा रद्द करण्यात आला. यांनतर पुणे किंवा छत्रपती संभाजीनगर यांपैकी एका ठिकाणी सभा घेण्याबाबत चर्चा सुरु होती. मात्र ज्या ठिकाणी भाजपची शक्ती कमी पडते आहे किंवा प्रचार कमी झाला आहे, अशा ठिकाणी सभा घेण्याचे भाजपने ठरवले आहे. नांदेडमध्ये सभा घेतल्याने हिंगोली, लातूर, परभणी आणि नांदेड अशा चार जिल्ह्यांमध्ये भाजपचा प्रचार करता येईल. त्यामुळे या ठिकाणी भाजपची शक्ती वाढवण्यासाठी २०२४ च्या दृष्टीने भाजपची राज्यातील पहिली जाहीर सभा नांदेडमध्ये होणार आहे.