-
ज्योत्स्ना कोट-बाबडे
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे|
पक्षीही सुस्वरे आळविती||
संत तुकोबांच्या या अभंगाची ही वृक्षप्रेमाने नि भावार्थ भावनांनी भरलेली सुरुवात म्हणजे आज पर्यावरणाचे घोषवाक्य बनली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शाळेत असल्यापासून ते आजतागायत परिसर विषयाला अभ्यासात अधिक गुण मिळवण्यापलीकडे आपण सामान्य लोकांनी तसे Seriously कधी घेतलेच नाही. परिसर म्हणजे काय? वातावरण म्हणजे काय? अशा प्रश्नांची उत्तरे तोंडपाठ केली की झाले. शिवाय झाडे किंवा पर्यावरणाच्या निबंधाची सुरुवात वरील अभंगाने केली की एक Extra गुण हमखास मिळेल, याची खात्रीच असायची.
कधी परिसर/विज्ञानाच्या पुस्तकातून पर्यावरण, झाडे, त्यांची उत्पत्ती व महत्त्व त्यांची मानवाला असलेली गरज तसेच वातावरणातील बदल, प्रदूषण, त्याचे प्रकार, दुष्परिणाम अशा अनेक गोष्टींविषयी अभ्यास केला. ते केवळ गुणांसाठी… पण त्या पलीकडे जाऊन आपण तेव्हा कधी त्याचे गांभीर्याने निराकरण करण्याचा प्रयत्न केला नाही. तसे कधीतरी अभ्यास म्हणून शाळेत असताना जुन्या प्लास्टिकच्या डब्यात धान्याचे दाणे टाकून, काही दिवस गवत वाढवून कोणाचे झाड सर्वात उंच झाले आहे, माझे की तुझे? याची शर्यत करायचो गंमत वाटायची म्हणून, तर कधीतरी उपक्रम म्हणून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ म्हणत वृक्षारोपण केले होते. पण ते तेवढ्यापुरते. अरे तेव्हाचेच काय घेता, आता मोठे झालो तरी कुठे आपण पर्यावरणाविषयी जागृत आहोत? कधीतरी असा ५ जूनला एक दिवसाचा जागतिक पर्यावरण दिवस साजरा करतो. पण मुळात असा दिवस आहे आणि तो का आहे? तेही कित्येकांना माहीत नसते. मध्ये काही वर्षांपूर्वी नाही म्हणायला ‘ग्लोबल वॉर्मिंग’ (जागतिक तापमानवाढ) हा शब्द माहीत झाला लोकांना. तेव्हा कुठे नागरिक जरा जरा Environment या विषयावर बोलू लागले. कारण त्यांना कळले की, ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणात अनेक गंभीर बदल होत आहेत, ज्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. तापमान वाढीमुळे समुद्राच्या पातळीतही वाढ होऊ शकते. याचाच अर्थ पर्जन्यवृष्टीच्या पद्धतींमध्ये बदल होऊ शकतो. अर्थात गेल्या काही वर्षांत या पर्यावरणीय बदलांचे दृश्य परिणाम हळूहळू दिसूही लागले आहेत. मध्येच दुष्काळ आणि पूर येण्याचे धोके आणि जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. लोकांच्या जीवनमानावर दृश्य परिणामांव्यतिरिक्त, पर्यावरणातील असंतुलनामुळे मानवी आरोग्यावर तीव्र आणि प्रतिकूल परिणाम होत आहेत. गारवातील ती कविता माहीतच असेल सर्वांना.सौमित्रची… ऊन जरा जास्त आहे, दरवर्षी वाटतं, भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं… तरी पावलं चालत राहतात. मन चालत नाही, घामाशिवाय शरीरामध्ये कोणीच बोलत नाही! अगदी असेच या वर्षीही ऊन जरा जास्त आहे, वाटले असेलच ना तुम्हालाही? या वर्षीचे काय घेता.
आजच निघा नि जरा दुपारी घराबाहेर एक तास या उन्हात फिरून बघा किंवा निदान १० मिनिटे एका जागी राहा आणि मग अंगाची लाहीलाही होऊन घामाशिवाय शरीरामध्ये खरंच कोणीच बोलत नाही हे जाणवेल. गमतीचा भाग सोडा, हे दरवर्षी ऊन जरा, नाही खूपच जास्त आहे वाटणे, हे केवळ या कवितेपुरतेच नाही, तर प्रत्यक्षातही जाणवू का लागले आहे? याचा विचार कधी केला आहे का? कारण एव्हाना कळलेच असेल. लांब कशाला नुकतेच १६ एप्रिल २०२३ रोजी खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे १२ ते १३ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आठवत असेलच. हा ग्लोबल वॉर्मिंगचाच दुष्परिणाम आहे. निसर्गाचा असमतोल, प्रचंड वृक्षतोड, निसर्गाला हानी पोहोचेल अशा वस्तूंचा तसेच प्लास्टिकचा वाढता वापर, नष्ट होत चाललेली जंगले याशिवाय आपल्यासारख्या निसर्गाचे देणे लागणाऱ्या करंट्यांनी पर्यावरणाला गांभीर्याने न घेणे, त्याची काळजी न घेणे हीसुद्धा कारणे यामागे आहेत. अवकाळीचे संकट आपल्या मानगुटीवर बसलेलेच आहे. भूकंपाचे धक्के काळजाचा ठोका चुकवतात. डोंगर खचल्याचे प्रकारही अनेकदा घडतात. पर्यावरणाचा हा प्रकोप उघड्या डोळ्यांनी पाहण्यावाचून आपल्याकडे पर्याय उरलेला नाही. वसुंधरेच्या हा विद्रूपपणा मानवी जीवनासाठी धोक्याची घंटा आहे. नियती का रुसली? कधी आभाळ फाटते, कधी सूर्यदेव आग ओकतो, पृथ्वीच्या पोटाला भेगा पडतात, तर कधी पृथ्वीच्या पोटातले पाणी विस्तारते आहे.
विकासाचा पाठलाग जग वेगाने करीत आहे. प्रगतीची कास आपण धरलेली आहे. गार वाऱ्यांची जागा आता एसीच्या थंडगार हवेने घेतली आहे. आकाशाशी स्पर्धा करणारे टॉवरच्या टॉवर उभारले जात आहेत. ते उभारताना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. वानस्यांनी सजलेला कैक मोठा परिसर डेव्हलपमेंटच्या नावाखाली गिळंकृत केला जातो. रस्ते, पूल, फ्लायओव्हर या वेगवान प्रवासासाठी झाडेमाडे जमीनदोस्त होत आहेत. खनिज साठ्यांच्या शोधात जंगले गिळंकृत होत आहेत. शहरे म्हणजे सिमेंट काँक्रीटची जंगले झालीत. तिथे झाडांना वाढायला जागाच नाही. वृक्षारोपण झालेच तरी वाढीसाठी जमिनीच्या पोटात मातीच नाही. बाजूला सिमेंटचे जाळे विणलेले. त्या काँक्रिटीकरणात या झाडांचा जीव घुसमटतोय. त्यांची वाढ खुंटते आणि मग ती शोभेची झाडे होऊन जातात. मोठ्या संख्येने झाडांची कत्तल केली जाते आणि त्या बदल्यात वृक्षारोपण झाले तरी त्या मोठ्या वृक्षांची जागा ही छोटी झाडे घेऊच शकत नाहीत. या नव्या झाडांच्या संवर्धनाचा प्रश्न आहेच. त्यातली किती झाडे जगतात, देव जाणो.
प्रगतीच्या नावे निसर्गाच्या चक्रालाच आपण धक्का देत आहोत. आजकाल आमची लाडकी चिऊताई दिसेनाशी झाली आहे. खनिज साठ्यांसाठी सृष्टीच्या पोटात हात घातला जातोय. मग त्यावर वसलेली जंगले रातोरात नाहीशी होऊन जातात. किनारी मार्गांसाठी समुद्राच्या पोटात आपण घुसलो आहोत. उद्या त्या अर्णवाने (समुद्र) त्याची जागा दाखवली, तर आपण त्याच्याच नावे बोटे मोडत बसू. रेल्वेमार्गांनी अनेक डोंगर पोखरलेत, तरणीताठी जंगले उद्ध्वस्त केलीत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवर हरित क्षेत्राचे सर्वेक्षण होते, तेव्हा आपल्या भौगोलिक क्षेत्रातील हरित क्षेत्र वाढल्याचा दावा अनेक देशांकडून केला जातो आणि आपली पाठ थोपटून घेतली जाते. वास्तव मात्र वेगळेच असते. एखादा रब्बी किंवा खरीप हंगाम पकडतात, त्यावेळी सर्वेक्षण केले जाते. त्यामुळे हरित क्षेत्र वाढले असले तरी घनदाट जंगलांची संख्या कमी होत चालली आहे. विरळ जंगलांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हरित क्षेत्र जरी वाढलेले भासवले जात असले तरी जंगले मात्र विरळ होत आहेत.
२६ जुलैच्या महापुरात झाडांमुळे मुंबई वाचली होती. मोठ्या प्रमाणात कोसळलेल्या पावसाचे पाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि मुंबईतील झाडांनी शोषून घेतले होते. आता परिस्थिती त्यापेक्षा बिकट आहे. कारण दिवसागणिक मोठमोठी झाडे आता कमी होत आहेत. मातीला धरून ठेवणाऱ्या झाडांचेच प्रमाण कमी झाले. त्यामुळे उद्या पुन्हा एखादा २६ जुलैसारखा महापूर आला, तर ते पाणी मुरायला या शहरांमध्ये माती आणि तितकी मोठी अशी सक्षम झाडे तर हवीत ना. अर्थात हे बदलता येऊ शकेल… झाडे लावून, ती वाढवून, जगवून. वानसे (झाडे) हा पर्यावरणाचा श्वास आहे. पर्यावरण टिकावे असे वाटत असेल, तर आधी या झाडांची घुसमट थांबवायला लागेल. जी आहेत त्या झाडांची वाढ, तर नाही ना खुंटत? याकडे लक्ष द्यायला हवे. लावलेली झाडे जगवणे आपले कर्तव्य ठरायला हवे. वड, पिंपळ या झाडांचे रोपण व्हायला हवे. त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या, मगच आपण श्वास घेऊ. संस्कृतमधील एक सुभाषित आहे –
शाश्वतम्, प्रकृति-मानव-सङ्गतम्,
सङ्गतं खलु शाश्वतम्।
तत्त्व-सर्वं धारकं, सत्त्व-पालन-कारकं
वारि-वायु-व्योम-वह्नि-ज्या-गतम्।
याचा भावार्थ असा की, निसर्ग आणि माणूस यांचे संबंध शाश्वत आहेत. नाते शाश्वत आहे. पाणी, वायू, आकाश, अग्नी आणि पृथ्वी ही सर्व घटक वस्तुत: जीवांचे पालनपोषण करणारे आणि पालनकर्ते आहेत. त्यामुळेच धावपळीच्या युगात या शाश्वत नात्याला चिरंतन टिकवायचे असेल, तर मानवाला पृथ्वीचे, झाडांचे पर्यायाने पर्यावरणाचे महत्त्व कळायलाच हवे. माणसे कशी आपल्या जवळच्यांशी, आप्तेष्टांशी, जिवलगांशी सलोखा जपतात, त्यांची काळजी घेतात. तोच सलोखा आपण या वानस्यांशी जपूया. कारण या वानस्यांवरच पर्यावरणाचा समतोल अवलंबून आहे आणि मानवाचे भवितव्यही. अन्यथा पर्यावरण रंग बदलतोय म्हणण्यापेक्षा त्याला आपण प्रवृत्त करतोय. उन्हाळा, हिवाळ्यात पावसाची धार लागतेय. उष्णतेच्या झळा असह्य होताहेत, हा त्याचाच परिपाक आहे. हे थांबावे, असे वाटत असेल, तर चला दोस्तहो ‘वानसे (झाडांशी) सलोखा’ जपूया.