Wednesday, April 30, 2025

विशेष लेखसंपादकीय

विवेकानंद रुग्णालय, लातूर

विवेकानंद रुग्णालय, लातूर
  • सेवाव्रती : शिबानी जोशी

सुमारे सहा दशकांपूर्वी पुण्यातील सुप्रसिद्ध बी. जे. मेडिकल महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेतलेले डॉ. अशोक कुकडे, डॉ. ज्योत्स्ना कुकडे, डॉ. गोपीकिशन भराडीया आणि डॉ. रामचंद्र अलुरकर यांनी पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. खरं तर पुण्यासारख्या शहरांमध्ये त्यांनी प्रॅक्टिस केली असती, तर त्यांना लाखोंची माया जमवता आली असती; परंतु राष्ट्रीय विचाराने प्रेरित आणि संघाचे कार्यकर्ते असल्यामुळे सेवाभाव, समर्पण वृत्ती हे संस्कार त्यांच्यामध्ये तरुणपणापासूनच रुजले होते. पुण्यासारखं शहर सोडून या चौघांनी लातूरसारख्या त्या वेळच्या मराठवाड्यातल्या उपेक्षित आणि तुलनेने मागासलेल्या शहरात वैद्यकीय सेवा देण्याचा एक धाडसी निर्णय घेतला. १९६६ साली लातूर आणि परिसरात दर्जेदार, रास्त दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध नाही, हे पाहून तिथे वैद्यकीय सेवेचे व्रत घेऊन रुग्णालय सुरू करण्याचं धाडसाचं पाऊल उचललं आणि हे चौघे अतिशय निष्णांत आणि हुशार डॉक्टर लातूरला आले. त्या काळात लातूरला कोणत्याही सोयी-सुविधा उपलब्ध नव्हत्या. मराठवाड्यातल्या रुग्णांना रास्त दरात, विश्वसनीय, तत्काळ आरोग्यसेवा उपलब्ध होत नव्हती, ती या परिसरात उपलब्ध करून द्यायची, हे एकमात्र उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी काम सुरू केलं. सुरुवातीस टिळक नगरातील शिवशरणप्पा चितकोटे यांच्या जागेमध्ये छोटे रुग्णालय सुरू केलं आणि त्याला नाव दिलं विवेकानंद रुग्णालय. या सर्व डॉक्टरांनी, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांना अनुसरूनच इथे वैद्यकीय सेवा द्यायला सुरुवात केली. १९६६ साली त्यांनी विवेकानंद जयंतीच्या दिवशी रुग्णालयाची स्थापना केली. दर्जेदार आणि रास्त दरात रुग्णसेवा यामुळे रुग्णांचा विश्वास मिळाला आणि रुग्णांचा ओघ वाढू लागला. जागा अपुरी पडू लागली, त्यामुळे काळाची गरज लक्षात घेऊन रुग्णालयाने स्वतःची इमारत उभारायचं ठरवलं. त्यानंतर सिग्नल कॅम्प भागात रुग्णालयाची इमारत उभी राहिली. वैद्यकीय क्षेत्रातल्या आधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज असे हे रुग्णालय लातूर आणि आसपासच्या विभागात दर्जेदार सेवा देण्यास सज्ज झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक रजूभैया तसेच तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री शिवराज पाटील चाकुरकर, प्रसिद्ध सर्जन डॉ. श्रीखंडे तसेच उद्योगपती वालचंद हिराचंद यांच्या उपस्थितीत रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होऊन त्यांचे आशीर्वाद या रुग्णालयाला लाभले. सुप्रसिद्ध हृदय शल्यविशारद डॉ. अशोक कानेटकर यांनी विवेकानंद रुग्णालयात हृदयावरील शस्त्रक्रियांना सुरुवात केली आणि ज्या काळात लातूरकरांना हृदय शस्त्रक्रियांसाठी मुंबई, पुणे गाठावं लागत असे, त्यांच्यासाठी हे सर्व उपचार लातूरमध्येच मिळू लागले. सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयाचा विस्तार होऊ लागला. दर आठवड्याला ग्रामीण भागात जाऊन वैद्यकीय शिबीर घेणे, ग्रामीण भागात वैद्यकीय केंद्र सुरू करणे अशा उपक्रमांद्वारे ग्रामीण भागातही रुग्णसेवा पोहोचू लागली. रुग्णालयात हृदयविकार विभाग, कॅन्सर विभाग, न्युरो सर्जरी, नेफ्रॉलॉजी आणि प्लास्टिक सर्जरी आदी सुपर स्पेशालिटी विभाग आता कार्यरत आहेत.

निराधार आणि वृद्धांच्या शारीरिक आणि मानसिक काही वेगळ्या गरजा असतात. त्या गरजा लक्षात घेऊन संस्थेने सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी मातोश्री वृद्धाश्रमही सुरू केला. संस्थेचे वेगवेगळे आयाम सुरू आहेत. यात विवेकानंद रुग्णालय,मातोश्री वृद्धाश्रम, रुग्णसेवा सदन, दोन औषधालये तसेच रुग्णसेवा सदन यांचा समावेश आहे. आजकाल हृदयविकार सोबतच कॅन्सरचे प्रमाण आपल्या जीवनपद्धतीमुळे खूपच वाढू लागलं आहे, हे लक्षात घेऊन हृदयरोग चिकित्सा विशेष विभाग स्थापन करण्यात आला आहे. या ठिकाणी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया सोबतच बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया नामांकित डॉक्टर्सच्या हातून घडतात. कॅन्सरसारख्या मोठ्या रोगाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी एमआयडीसी भागात स्वतंत्र रुग्णालयाची स्थापना करण्यात आली आहे. या रुग्णालयाचे उद्घाटन तत्कालीन केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते झाले होते. या ठिकाणी केमोथेरपी, रेडिएशन, शस्त्रक्रिया केल्या जातात. कॅन्सरवर अनेक दिवस उपचार सुरू असतात. अशावेळी रुग्णांच्या नातेवाइकांच्याही निवासाची सोय व्हावी म्हणून विवेकानंद रुग्णसेवा केंद्राची इमारत उभारण्यात आली असून या ठिकाणी त्यांचे नातेवाईक निवास करून उपचार घेऊ शकतील, अशी सोय करण्यात आली आली आहे. या इमारतीचे उद्घाटन २०२१ साली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. रुग्णांच्या नातेवाइकांना अत्यल्प दरामध्ये राहणे व भोजनाची व्यवस्था करण्यात येते. विवेकानंद रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात दरवर्षी अंदाजे एक लाख रुग्ण उपचार घेतात, तर आंतररुग्ण विभागात अंदाजे दोन हजार शस्त्रक्रिया आणि जवळपास चारशे प्रसूती, शस्त्रक्रिया होतात. रुग्णालयामध्ये केवळ उपचारच नाही तर संशोधनही केलं जाते. आयुर्वेद शास्त्र आणि आधुनिक वैद्यकीय शास्त्राचा मिलाप करून इथे विविध प्रकारचे संशोधन केलं जाते. अशा प्रकारचे संशोधन मराठवाड्यासारख्या भागात करणारे विवेकानंद रुग्णालय हे एकमेवच ठरेल. याशिवाय चाळीस वर्षं वयापेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी सर्वंकष आरोग्य चिकित्सा सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे अशा सर्व व्यक्तींचे संपूर्ण मेडिकल चेकअप कमी खर्चात केले जाते. दर गुरुवारी रुग्णालयामध्ये विशेष प्रार्थना सभेचे आयोजनही करण्यात येत. काही रुग्णांची अजिबातच मूल्य देण्याची क्षमता नसते, अशांना दर गुरुवारी विनामूल्य तपासणी सेवा पुरवली जाते. विवेकानंद रुग्णालयात केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ गरीब रुग्णांना मिळवून दिला जातो. आयुष्मान भारत आणि महात्मा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांवर पूर्णपणे नि:शुल्क उपचार देतात. रुग्णालयात सध्या १०० डॉक्टर्स आणि ४५० आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत. इथे रुग्णांप्रमाणेच कर्मचाऱ्यांचीही देखील काळजी घेतली जाते. त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते.

नेहमीच्या रुग्णसेवा खेरीज अचानक येणाऱ्या नैसर्गिक किंवा मानवी आपत्तीमध्ये सुद्धा विवेकानंद रुग्णालय मदतीचा हात पुढे करत असते. १९९३ साली लातूर भागात किल्लारी येथे विनाशकारी असा भूकंप झाला. शेकडो माणसे मृत्युमुखी पडली, हजारो जखमी झाली, तर हजारो जणांचे डोक्यावरचे छप्पर उडाले होते. या काळात रुग्णालयाने खूप मोठी सामाजिक जबाबदारी शिरावर घेतली आणि हजारो रुग्णांवर विनामूल्य उपचार केले. कोविड-१९ च्या काळामध्ये कोरोना रुग्णांसाठी विशेष विभाग सुरू करण्यात येऊन दर्जेदार डॉक्टर उपलब्ध करून त्वरित सेवा देण्यात आली होती. शासनातर्फे डेडिकेटेड कोविड रुग्णालय अशी मान्यताही रुग्णालयाला मिळाली होती. त्यासाठी रुग्णालयाने स्वतंत्र इमारत उभारली तसेच साडेचारशे स्टाफला प्रशिक्षित करून त्यांना विमा कवचही दिले होते. विवेकानंद रुग्णालय हे औषध उपचारासाठी जसं प्रसिद्ध आहे, तसेच ते शिस्तीसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. कारण वैद्यकीय क्षेत्रात शिस्त खूपच महत्त्वाची ठरते.

रुग्णालयाने केलेल्या अविश्रांत मेहनतीचे फळ त्यांना समाजानेही नेहमीच भरभरून दिलं आहे. अनेक राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय पुरस्काराने रुग्णालयाला सन्मानित करण्यात आले आहे. विवेकानंद रुग्णालयामध्ये सुरुवातीला जे डॉक्टर्स आले, त्यांनी स्वतः समर्पित भावनेने आयुष्यभर काम केलं आहेच; परंतु त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून येणाऱ्या पिढीतील नवे तरुण डॉक्टरही याच विचाराने विवेकानंद रुग्णालयात सेवा बजावत आहेत आणि बजावत राहतील, अशी अपेक्षा डॉ. कुकडे व्यक्त करतात. सर्वे सुखीन संतु, सर्वे संतु निरामया... असा आपल्याकडे श्लोक आहे. खरं तर कोणी आजारी पडूच नये; परंतु कोणी दुखी,पीडित असेल तर त्याचं दुःख हलकं करण्यासाठी विवेकानंद रुग्णालयात सेवा, समर्पण आणि संघटन वृत्तीने प्रयत्न केले जातात. जुन्या तंत्रज्ञानाला चिकटून न राहता कायमच स्वतःला अद्ययावत करत, सर्व प्रकारच्या रुग्णांना दर्जेदार सेवा देण्याचं व्रत रुग्णालयानं घेतलं आहे. आगामी काळात कॅन्सर रुग्णांसाठी पेट स्कॅन, रोबोटीक शस्त्रक्रिया तसेच नवजात बालकांतील दृष्टिदोष शोधून त्यावर उपचाराची व्यवस्था होणार आहे. सेवाभाव समर्पण आणि संघटन वृत्तीने सेवा दिल्यामुळे विवेकानंद रुग्णालय हे केवळ रुग्णालय न राहता गरजू रुग्णांसाठी आरोग्य मंदिर ठरत आहे.

[email protected]

Comments
Add Comment