नागपूर : शिवसेनेत फूट पडल्याने ठाकरे गटाला जनाधार राहिलेला नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत ताकद नाही, हे एका पाहणीत स्पष्ट दिसून आले आहे. यामुळे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत बाळासाहेबांच्या सहानुभूतीचा फायदा घेण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळेच अजित पवार आणि संजय राऊत यांनी आता नरमाईची भूमिका घेतली आहे.
काल नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना अजित पवार स्पष्टच म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस असो की ठाकरे गट असो, आमची मुंबईत ताकद राहिलेली नाही. परंतु मुंबईतील लोकांना दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा म्हणून उद्धव ठाकरे यांच्याबाबत सहानुभूती आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुका या एकत्र लढण्याबाबत ठाकरेंसोबत चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.
मुंबई शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची खूप काही ताकद नाही. आमचे कमी आमदार या ठिकाणी निवडून येतात, नगरसेवक ही कमीच निवडून येतात. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिकेच्या निवडणुकांना एकत्र सामोरे जाऊ, अशी विनंती केली आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
नुकत्यात झालेल्या एका पाहणीत शिवसेनेच्या ठाकरे गटाला जास्त जागा दाखवत आहे. निश्चितपणे उद्धव ठाकरे यांना मुंबईतल्या लोकांकडून मिळणाऱ्या सहानुभूतीमुळे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ठाकरे गटासोबत राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली तर याचा फायदा त्यांनाही मिळण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे गटासोबतच आपली आघाडी करणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट झालेले आहे, असे अजित पवार म्हणाले.
यावेळी संजय राऊत यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता, कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. संजय राऊत मोठे नेते आहेत, असे बोलून त्यावर अधिक बोलणे त्यांनी टाळले.
तर दुसरीकडे नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना, अजित पवार यांच्याबद्दल मी काल जे काही बोललो आहे, त्याचा मला खेद वाटतो. मी असे बोलणे योग्य नाही, असा जाहीर माफीनामा व्यक्त करत खासदार संजय राऊत यांनी माघार घेतली. त्यामुळे महापालिका निवडणुका डोळ्यासमोर असल्याने ‘मविआ’ मध्ये शनिवारी दोन नेत्यात जुंपलेले शब्दयुद्ध थंड झाल्याचे दिसून आले.