Share

मानव कितीही सामर्थ्यवान झाला तरीही नियती नावाच्या शक्तीसमोर त्याला हार मानावीच लागते. ओडिशात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भीषण रेल्वे अपघाताला जबाबदार नियतीची इच्छा नाही, तर अन्य काय कारणमीमांसा करायची? शालिमार चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस आणि बंगळूरु हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस या दोन गाड्यांचा भीषण अपघात होऊन जवळपास ३०० प्रवासी मृत्युमुखी पडले. अपघात पण इतका विचित्र की अगोदर कोरोमंडल एक्स्प्रेस थांबलेल्या मालगाडीवर आदळली आणि त्याचवेळी दुसरी प्रवासी गाडी मेन लाईनवरून जात असताना कोरोमंडलचे घसरलेले डबे उलटले आणि तीन गाड्यांचा भयानक अपघात घडला. यात सरकारी आकड्यानुसार २८८ प्रवासी मरण पावले, तर ९०० प्रवासी जखमी झाले. कोरोमंडल एक्स्प्रेस मुळात मेन लाईनवर असायला हवी होती. ती लूप लाईनवर गेली, ज्यावर मालगाड्या थांबवत असतात. मृत प्रवाशांच्या नातेवाइकांना दहा लाख रुपये, गंभीर जखमींना २ लाख रुपये वगैरे सरकारी मदत जाहीर झाली. या अपघाताला जबाबदार, चूक कुणाची आणि मानवी चूक हे कारण आहे का, यावर आता चौकशी होईल. प्राथमिक चौकशीत तर असे आढळले आहे की, कोरोमंडल एक्स्प्रेस मेन लाईनवर न येता लूप लाईनवर गेली. अर्थात ती मेन लाईनवर आली असती तर कदाचित अपघात टळला असता. लूप लाईन ही व्यवस्था मालगाडी थांबण्यासाठी केलेली असते. ज्या बालासोर स्थानकात हा अपघात झाला, तेथे चार प्लॅटफॉर्म आहेत आणि त्यातील दोन मालगाड्यांसाठी तर दोन प्रवासी गाड्यांसाठी आहेत. अपघात गंभीर होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लगेचच ओडिशाला पाहणीसाठी रवानाही झाले. कोणत्याही घटनेचे राजकारण करायचे, याचा चंग बांधलेल्या राजकारण्यांनी लगेचच दोन गाड्यांची टक्कर होऊ नये म्हणून केलेली व्यवस्था कवच ही कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये नव्हती, असा आरोप करून मोदी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यास सुरुवात केली. ममता यांनी आपण रेल्वेमंत्री असताना कवच ही व्यवस्था सुरू केली होती, असा दावाही केला. पण ममता यांच्यापेक्षा रेल्वेच्या तंत्रज्ञान आणि सुरक्षा व्यवस्थेत तज्ज्ञ असलेले सुधांशू मणी यांनी कवच असले तरीही अपघात टाळला जाऊ शकला नसता, असे सांगून ममतांच्या आरोपातील हवा काढून टाकली. सुधांशू मणी हे तेच रेल्वे अधिकारी आहेत ज्यांनी वंदे भारत किंवा ट्रेन १८ ही नवी रेल्वेगाडी आपल्या मार्गदर्शनाखाली सुरू केली आहे.

मणी यांनीच वंदे भारतची रचना आणि अन्य सुरक्षा व्यवस्था तयार करून घेतली आहे. त्यामुळे त्यांचे मत तद्दन राजकारणी मतापेक्षा अत्यंत महत्त्वाचे आहे. मणी यांनी सांगितले की, भारतात रेल्वे रुळांची मुळापासून सुधारणा म्हणजे ओव्हरहॉल करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. फिशप्लेट्स उखडण्याची संधी घातपात घडवणाऱ्यांना वारंवार मिळते ती त्याचमुळे. भारतात आपल्या रेल्वे अधिकाऱ्यांसह सर्वांचे लक्ष रेल्वे अद्ययावत बनवण्याकडे आणि जास्तीत जास्त सुविधा पुरवण्याकडे असते. पण रेल्वे रूळ ज्यांवरून रेल्वे धावते, त्याकडे फारच कमी लक्ष दिले जाते. ती सवय बदलायला हवी, असे मणी यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यात शंभर टक्के तथ्य आहे. कवच ही एतद्देशीय स्वयंचलित रेल्वे सुरक्षा व्यवस्था आहे, जी रेल्वे मंत्रालयाने २०२२ मध्ये विकसित केली आहे. राजकारणी काहीही म्हणोत, कारण त्यांचा अभ्यास नसतोच. पण मणी यांनी जे सांगितले आहे ते महत्त्वाचे आहे. त्यांच्या मते सिग्नलिंग यंत्रणेच्या अपयशामुळेही हा अपघात झाला नाही. अपघाताचे मूळ कारण पहिली गाडी रुळांवरून घसरली, त्यात आहे. पहिली गाडी का घसरली, याचे कारण सरकारने शोधून काढले पाहिजे, हे त्यांचे म्हणणे सरकारने गांभीर्याने घेतले पाहिजे.

मणी यांच्याच मार्गदर्शनाखाली वंदे भारत किंवा ट्रेन १८ ही गाडी तयार झाली आहे. ट्रेन १८ नावाचे आत्मचरित्रही त्यांनी लिहिले आहे. कोरोमंडल इतक्या वेगात होती की, त्याने रुळांवर अडथळा पाहिला असता तरीही तो गाडी थांबवू शकला नसता. ममता यांच्यासह सर्वच पक्षांना आता राजकारण करायचे आहे, यात काही वाद नाही. कारण आता वर्षभराच्या कालावधीत लोकसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे त्यांना कोणताही मुद्दा निवडणुकीचा बनवता येतो. पण त्यांच्या राजकारणाचा भाग सोडला तरीही अपघात भीषण होता आणि त्यात इतक्या लोकांची प्राणहानी होणे, ही निश्चितच रेल्वेच्या कामगिरीला कलंक आहे, हे मान्य करावेच लागेल. स्वतंत्र भारतात गेल्या ३० वर्षांतील हा सर्वात मोठा अपघात आहे, असे सांगण्यात येते. रेल्वेच्या यंत्रणेत काही त्रुटी आहेत का? आणि त्या शोधून काढता येतील का, यावर आता रेल्वेने प्रयत्न करायला हवेत. राजकारण बाजूला ठेवून प्रत्येक पक्षाने रेल्वे अपघात कसे टाळता येतील, यावर सूचना द्यायला हव्यात आणि त्या सरकारने उपयुक्त असतील तर तातडीने अंमलात आणायला हव्यात. केवळ सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यावर विरोधी पक्षांनी आपली बुद्धी खर्च करू नये. आता यात अनेक कोनांतून तपास केला जाईल आणि मानवी चूक कारण आहे काय याचाही तपास होईल. जो कुणी जबाबदार आहे, त्याला कठोरातील कठोर शिक्षा केली जाईल, असे पंतप्रधान यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे दिलासा मिळेल, पण तसे प्रत्यक्षात व्हायला हवे. अर्थात गेलेले बहुमोल जीव परत येणार नाहीतच, हे तर
खरेच आहे.

Recent Posts

SSC-HSC Exam : दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पुरवणी परीक्षेची तारीख जाहीर

मुंबई : दहावी आणि बारावीच्या (SSC-HSC Exam) परीक्षेत अनुत्तीर्ण (Fail) झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर…

32 mins ago

Nutrition Food : OMG! शालेय पोषण आहारात आढळले सापाचे पिल्लू

चिमुकल्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण सांगली : शालेय विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी शालेय पोषण आहार…

1 hour ago

Milk Price Hike : ग्राहकांच्या खिशाला चाप! गोकुळच्या दूध दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ

मुंबई : सध्या सातत्याने महागाई वाढत चालत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला…

2 hours ago

Horoscope: जुलै महिन्यात या ४ राशींचे जीवन होणार सुखकर, होणार हे बदल

मुंबई: जुलै महिन्याला सुरूवात झाली आहे. जुलै २०२४मध्ये ४ मोठे ग्रह शुक्र, बुध, मंगळ आणि…

2 hours ago

Indian Team: टीम इंडियाच्या परतण्याला पुन्हा उशीर, चक्रवाती वादळामुळे सातत्याने येतायत अडचणी

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ अद्याप बार्बाडोसमध्येच अडकला आहे. टीम इंडियाने बार्डाडोसमध्ये फायनल सामना जिंकत टी-२०…

3 hours ago

आजपासून महाग Jioचे सर्व प्लान, ग्राहकांना द्यावे लागणार इतके पैसे

मुंबई:रिलायन्स जिओचे प्लान आजपासून महाग होत आहेत. आता ग्राहकांना रिचार्ज कऱण्यासाठी आधीपेक्षा १२ ते २५…

4 hours ago