Tuesday, July 23, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यकोकणात ‘वंदे भारत’

कोकणात ‘वंदे भारत’

मुंबई डॉट कॉम : अल्पेश म्हात्रे

भारतीय रेल्वेने सुरू केलेली ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस (Vande Bharat Express) देशाच्या अनेक राज्यात सुरू करण्यात आली आहे. अत्यंत कमी वेळेतच वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत तीन वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. लवकरच आता कोकणात जाण्यासाठी महाराष्ट्राला चौथी वंदे भारत ट्रेन मिळाली आहे. त्यामुळे कोकणवासीयांमध्ये मोठा आनंद व्यक्त होत आहे. शनिवारी मडगाव येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार होते. परंतु ओरिसा येथे झालेल्या रेल्वे अपघातामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. आज सोमवारपासून सुरू होणारी ही गाडी आता काही दिवसांनंतर सुरू होणार आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान वंदे भारत ट्रेन ५ जूनपासून प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी दाखल होणार होती. या गाडीसाठीचे बुकिंग अद्याप सुरू झाले नाही. मात्र एक-दोन दिवसांत आयआरसीटीसीच्या साईटवरून प्रवाशांना बुकिंग करता येणार आहे.

या गाडीचा कोकणी माणसाला नक्कीच आनंद झाला असेल, यात शंका नाही. मात्र, सर्वप्रथम प्रश्न असा उभा राहतो तो असा की, खरंच कोकण रेल्वे ही कोकणवासीयांसाठी आहे का? कोकण रेल्वेची स्थापना झाल्यापासून कोकण रेल्वे मार्ग हा कोकणासाठी कमी आणि दक्षिण भारत व कर्नाटक गोव्यासाठी जाणाऱ्या गाड्यांसाठी जास्त उपयोगात आणला गेला. कर्नाटक, गोवा, केरळ येथे जाण्यासाठी हा मार्ग शॉर्टकट ठरला आणि दिवसरात्र या मार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्या धावू लागल्या. यात कोकणी प्रवाशांची फार मोठी कुचंबणा होऊ लागली. ज्या कोकणी माणसासाठी ही रेल्वे बांधण्याचा घाट घातला गेला, ज्या कोकणी माणसांनी आपल्या जमिनी या प्रकल्पासाठी देऊ केल्या, त्या कोकणी माणसावरच रेल्वे गाडीत उभ्याने व लटकून प्रवास करण्याची वेळ आली. कोकणवासीयांचा विचार करता आज फारच कमी गाड्या त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत. बाकी सर्व गाड्या गोव्यात मडगाव अथवा पुढे कर्नाटक व केरळपर्यंत जातात. त्यामुळे कोकणातील प्रवाशांसाठी एकही गाडी नाही, कोकणात रेल्वेसाठी एकही मोठे टर्मिनस नाही, गाड्यांच्या देखभालीसाठी कोकणात मोठे स्थानक नाही, परिणामी एकही गाडी कोकणातील सुटत नाही. ज्या गाड्या आहेत, त्या कोकणात आल्या की लगेचच परतीच्या प्रवासाला लागतात. आजही कोकण रेल्वे एकाच मार्गावर चालते. त्यात पनवेल ते रोहा नुकतेच दुहेरीकरण पूर्ण झाले. त्यामुळे या मार्गावर वाहतूक सुरळीतपणे सुरू असते. मात्र पुढे गोव्यापर्यंत एकेरी मार्ग असल्याने प्रत्येक छोट्या-मोठ्या स्थानकांवर रेल्वे गाडी साईंडिंगला घ्यावी लागते व दुसऱ्या समोरील गाडीला अथवा मागच्या जलद गाडीला मार्ग द्यावा लागतो. त्यामुळे प्रवासाचा अवधी वाढतो व ताटकळत प्रवास करावा लागतो. त्यातच आता परराज्यातील गाड्यांची या मार्गावर इतकी संख्या वाढवण्यात आली आहे व काही जुन्या गाड्या कोकण मार्गावर वळवण्यात आल्यामुळे गाड्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र एकेरी मार्गावर गाड्या चालवणे कोकण रेल्वेला दररोज मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच लगोलग दुहेरीकरण करणे म्हणजे इतके सोपे नाही. कारण कोकण रेल्वे दऱ्याखोऱ्यातून उंच डोंगरावरून गेल्याने मोठ-मोठे लांबीचे बोगदे व उंच उंच पुलांवर कोकण रेल्वे बांधली गेली आहे. त्यामुळे दुहेरीकरण करणे रेल्वेसाठी मोठे आव्हान आहे. तसे करावयाचे झाल्यास मोठा कालावधी लागणार आहे. त्यातच आता या मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृपेने देशातील सर्वात आधुनिक व वेगवान अशी वंदे भारत रेल्वे सुरू झाली आहे. कोकणातील दऱ्या-खोऱ्यांतून ही प्रगत रेल्वे ‘वंदे भारत’ धावणार आहे. कोकणासाठी ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे, यात शंकाच नाही. मात्र खरंच याचा फायदा कोकणी माणसाला होईल का? या गाडीचा वेग प्रचंड आहे, मात्र मुळात एकेरी मार्गावर धावणारी कोकण रेल्वे या गाडीला अपेक्षित वेग मिळण्यासाठी रिकामा मार्ग मिळू शकणार आहे का? कोकणवासीयांच्या गणपती, होळी या सणात कोकण रेल्वेवर प्रचंड ताण असतो. मोठ्या प्रमाणावर गाड्या या मार्गावर सोडल्या जातात, तेव्हा या वंदे भरत रेल्वेसाठी इतर गाड्यांचा खोळंबा जागोजागी करून ठेवावा लागणार आहे. सध्या ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी सुटणार आहे. ती दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली, थिविममार्गे जाऊन दुपारी १.१० वाजता मडगावला पोहोचणार आहे. तर मडगावहून ही गाडी दुपारी २.४० वाजता सुटून पुन्हा रात्री १०.२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचणार आहे. म्हणजे अवघ्या नऊ तासांत (मार्ग मोकळा मिळाल्यास) ही गाडी इच्छितस्थळी पोहोचणार आहे. या गाडीला कोकणात फक्त खेड, रत्नागिरी व कणकवली येथीलच थांबे मिळाले आहेत. म्हणजे या तीन स्थानकांवरीलच प्रवाशांना या गाडीचा लाभ मिळणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश मिळून या गाडीला कणकवली येथे थांबा मिळाला आहे. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या गाडीला सिंधुदुर्ग येथे थांबा मिळावा, अशी मागणी केली आहे. तर इतरही राजकीय नेत्यांकडून आता या गाडीला आपल्या विभागातील थांबा मिळावा, अशी मागणी सुरू केली आहे. या गाडीचे दरही मोठ्या प्रमाणावर असणार आहेत. अजून या गाडीचे दर ठरले नाही, पण बहुतेक तेजस एक्स्प्रेसच्या आसपास अथवा जास्त दर या गाडीचे असतील. या गाडीत सुसज्ज अशी आसन व्यवस्था, उच्चतम दर्जाची खानपान सेवा, आदरातीथ्य सेवा असेल. त्यामानाने या गोष्टींवर खर्च करणारा वर्गही असतो. त्यावर याला या गाडीचा खूप फायदा होईल तसेच रस्ते मार्गापेक्षा ही गाडी जलद जाणार असल्याने त्याचाही फायदा प्रवाशांना होईल. इतर गाड्यांमधील वातानुकूलित गाडीने जाणारा प्रवासीवर्ग या गाड्यांकडे वळला, तर इतर गाड्यांमधील शयनयानातून प्रवास करणारा प्रवासी वातानुकूलित वर्गाकडे वळेल व जास्तीत जास्त जागा या मुंबई-गोवा मार्गांवर उपलब्ध होतील. याचा फायदा पर्यायाने प्रवाशांनाच मिळणार आहे. थोडक्यात काय तर प्रत्येक वर्गाची सोय त्यामुळे होणार आहे. तसेच या गाडीमुळे कोकण व गोवा यांच्या पर्यटनावरही चांगला परिणाम होऊन पर्यटनात वाढ होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे. या गाडीच्या आठ डब्यातील सेवेचे भविष्य आता येणारा काळच ठरवेल. तेव्हा लवकरात लवकर ही गाडी सुरू व्हावी हीच सदिच्छा व शुभेच्छा!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -