Sunday, October 19, 2025
Happy Diwali

अलिबाग येथील तरूणाच्या कानाचा पुण्यात रिक्षाचालकाने घेतला चावा, पडले १० टाके!

अलिबाग येथील तरूणाच्या कानाचा पुण्यात रिक्षाचालकाने घेतला चावा, पडले १० टाके!

रिक्षाचालक आणि वृद्ध महिला प्रवासी यांच्या वादात मध्यस्थी करणे भोवले

पुणे : पुण्यात नातवासोबत प्रवास करणाऱ्या वृद्ध महिलेकडे अव्वाच्या सव्वा भाडे मागणा-या रिक्षाचालकाला समजवण्यास गेलेल्या अलिबागच्या तरूणाला मध्यस्थी करणे चांगलेच महागात पडले.

पोलिसांकडे तक्रार दाखल केलेल्या माहितीनुसार, स्वारगेट बस टर्मिनसबाहेर एक जून रोजी पहाटे एकच्या सुमारास ही घटना घडली. पीडित संतोष चव्हाण हा अलिबाग, रायगड येथील रहिवासी असून तो त्याच्या चुलत भावाच्या लग्नाला पुण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी तो घरी परतण्यासाठी स्वारगेट टर्मिनस येथे बसची वाट पाहत असताना त्याला एक वृद्ध महिला धान्याने भरलेली गोणी घेऊन सोबत ८ ते ९ वर्षांच्या नातीसह जाताना दिसली. ही महिला रिक्षाचालकाला त्यांच्या २-३ किमी अंतरावर असलेल्या त्यांच्या घरी नाममात्र भाड्यात सोडण्याची विनंती करत होती. पण चालक १५० रुपयांची मागणी करत होता, असे संतोष चव्हाण याने सांगितले.

संतोष चव्हाण याने रिक्षाचालकाला थोडी दया दाखवून वृद्ध महिलेला मदत करण्याची विनंती केली. मात्र चालक संतापला आणि त्याने संतोषला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने त्याच्या दोन मित्रांनाही बोलावले आणि संतोषला मारहाण करण्यास सुरुवात केली, असे या पीडित व्यक्तीने सांगितले. दरम्यान, रिक्षाचालकाने त्याच्या डाव्या कानाला जोरात चावा घेतला. चव्हाण यांनी वेदनेने आरडाओरडा केल्यावर आरोपींनी घाबरून तेथून पळ काढला.

त्यानंतर त्याने रिक्षाचे (एमएच १२ जेएस ९२०८) फोटो काढले आणि कानाला कपडा बांधून मदतीसाठी स्वारगेट पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी त्याला आधी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. ट्रकचालक म्हणून काम करणाऱ्या चव्हाण यांच्या कानाला १० टाके पडले आहेत. पोलिसांनी आरोपी ऑटोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बवचे यांनी सांगितले की, स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत आणि त्यानुसार आरोपींवर कारवाई करू, असे बवचे यांनी सांगितले.

Comments
Add Comment