Tuesday, July 9, 2024
Homeताज्या घडामोडीविधानसभा उपाध्यक्षांना अजित पवारच मुख्यमंत्री हवेत!

विधानसभा उपाध्यक्षांना अजित पवारच मुख्यमंत्री हवेत!

दादा गरम आहेत पण नरम आहेत : नरहरी झिरवाळ

सुरगाणा : राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांना वेळ असला तरी भावी मुख्यमंत्री पदाबाबत जोरदार चर्चा आणि आडाखे बांधले जात आहेत. विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये भावी मुख्यमंत्री पदावरून पोस्टरबाजीही सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी मुख्यमंत्री झाले पाहिजे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केल्याने मुख्यमंत्री पदाच्या चर्चेला धुमारे फुटले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार बनविण्याची संधी मिळालीच किंवा शह कटशहाच्या राजकारणातून संधी मिळवलीच तर मुख्यमंत्री पद कुणाला द्यायचे हा पक्ष नेतृत्वासाठी तसा कळीचा मुद्दा आहे. सुप्रिया सुळे की अजित पवार? की आणखी तिसरा कुणी? यासारखे प्रश्न आतापासून चर्चेत असतांना विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मात्र अजित पवार यांनीच मुख्यमंत्री व्हावं अशी मनातली इच्छा बोलून दाखवली आहे.

ही इच्छा बोलून दाखवताना नरहरी झिरवाळ यांनी अजित पवार यांच्यावर स्तुती सुमने उधळली. ‘फणसाच्या अंगी काटे, आत अमृताचे साठे’ अशी उपमा देत त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी अनेक गुणही विषद केले. राज्यभरातून येणाऱ्या लोकांना अजित पवार यांच्याबद्दल काय वाटतं तेही नरहरी झिरवळ यांनी बोलून दाखवलं. बरेच लोक म्हणतात की, दादा गरम आहेत, मात्र दादा कामाच्या बाबतीत आग्रही असतात त्यामुळे त्यांना भेटायचं म्हणजे अनेकांना त्यांचा धाक वाटतो. असं नरहरी झिरवाळ यांचं मत आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कामाविषयी सांगताना नरहरी झिरवाळ म्हणाले की, कामाच्या पातळीवर अजित पवार म्हणजे एक प्रकारची शिस्त आहे. त्यामुळे कोणतेही काम करताना अजितदादा यांच्यापेक्षाही आपण स्ट्रिक्ट झाले पाहिजे. त्यांच्या कामामुळेच आता अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना झिरवाळ म्हणाले की, मी मुख्यमंत्री यांच्याकडे जात नाही, तर तेच माझ्याकडे येतात आणि त्यांनाच माझ्याकडे यावं लागतं असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. विधान सभा उपाध्यक्षांच्या मनातील या भावी मुख्यमंत्र्याविषयीच्या भावना राष्ट्रवादीत नवा वाद निर्माण करण्यास कारणीभूत ठरल्या नाही तरच नवल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -