केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विश्वास
आर्थिक व उदयोग क्षेत्रात भरारी घेणार
महाराष्ट्रात एमएसएमईसाठी स्वतंत्र सचिव!
मुंबई (विशेष प्रतिनिधी): आर्थिक व उदयोग क्षेत्रात देशात महाराष्ट्र नंबर १ घडविणार आणि राज्याला सोबत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करणार असा विश्वास केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सोमवरी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केला. महाराष्ट्रात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) उभारणीसाठी एक स्वतंत्र सचिव देण्याची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
एमएसएमईचे अधिकारी, महाराष्ट्राच्या उद्योग विभागातले अधिकारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपण स्वतः अशी एक बैठक सह्याद्री अतिथीगृहात झाली. या बैठकीत एमएसएमईचे उद्योग महाराष्ट्रात कशा पद्धतीने राबवता येतील यावर विचार करण्यात आला. देशाच्या उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र पहिला राहावा, महाराष्ट्रात तरुण-तरुणींना उद्योग करायला प्रवृत्त करावे, त्या माध्यमातून रोजगारनिर्मिती वाढवावी, उत्पादन वाढवावे, दरडोई उत्पन्न वाढवावे, निर्यात वाढवावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारत तयार करावा, यादृष्टीने काय करता येईल यावर या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली. या चर्चेनंतर एमएसएमईचे उद्योग महाराष्ट्रात राबवण्यासाठी एक स्वतंत्र सचिव देण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दाखवली. सिंधुदूर्ग जिल्ह्यात उभे राहत असलेल्या दोनशे कोटींच्या टेक्निकल सेंटरसाठी लागणाऱ्या जमिनीचे १३ कोटी रुपये माफ करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. मुंबईत साकीनाका येथील एमएसएमईच्या कार्यालयाच्या जागेवरील आरक्षण तत्काळ काढून टाकण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले, असे राणे म्हणाले.
कोविडच्या काळात एमएसएमईचे बंद पडलेले उद्योग पुन्हा उभे करण्यासाठी केंद्र सरकारने पाच लाख कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध केले. त्यातले तीन कोटी ७६ लाखाचे कर्ज
उद्योजकांनी वापरले आणि आता तेथे पूर्वीपेक्षा जास्त उत्पादन केले जात आहे. मागच्या आघाडीच्या सरकारच्या काळात अडीच वर्षांत तेव्हाचे मुख्यमंत्री मंत्रालयातच जेमतेम दोन तास आले. त्यांच्याशी एमएसएमईचे उद्योग राबवण्याविषयी चर्चा तरी कशी करणार, असा सवाल त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृह तसेच सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यावर ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी, हे दोघे नेते मक्का-मदीनाला जातात तसे गेले होते, अशी टिप्पणी केली. अमित शाह हे केवळ मंत्रीच नाहीत तर भारतीय जनता पार्टीचे नेतेही आहेत. फडणवीससुद्धा भाजपाचे नेते आहेत. एक नेता स्वतःच्या पक्षाच्या दुसऱ्या नेत्याला भेटायला जाणे म्हणजे मक्का-मदीना होते काय, असा सवाल त्यांनी केला. संजय राऊत यांचे डोके ठिकाणावर नाही. कुठे, कधी, काय बोलायचे हे त्यांना समजत नाही. अशा लोकांना तुम्ही प्रसारमाध्यमे कशी काय प्रसिद्धी देता, हे समजत नाही. उद्या असे होता कामा नये की, संजय राऊत बाजूला पडतील आणि माध्यमे निशाण्यावर येतील, असे ते म्हणाले. या देशाच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ब्रिटिशांनी बांधलेली जुनी संसद भवन आपण वापरत होतो. या इमारतीच्या दुरूस्तीची वेळ आली होती. त्याची दुरुस्ती करण्यासारखी स्थिती नव्हती. अशावेळी एक स्वतंत्र इमारत उभारण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला. अवघ्या अडीच वर्षांत त्यांनी ही इमारत उभारली. ही इमारत कोणा व्यक्तीची नाही तर साऱ्या भारतीयांची आहे. या देशाची आहे. त्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, याचे उद्घाटन झाले नाही तर तेथे मोदींनी राज्याभिषेक केला. विरोधकांना आता काही काम राहिलेले नाही. साधा गृहप्रवेश असला तरी आजूबाजूची लोकं शुभेच्छा देतात.
देशासाठी एक नवीन इमारत उभी राहिली. साध्या शुभेच्छा देणं सोडा, हे टीका करत राहिले. राज्याभिषेक असे बोलतात. यांचा राज्याभिषेक कधीच होणार नाही. साधे लग्न झाले नाही तर राज्याभिषेक काय होणार, असा सवाल नारायण राणे यांनी केला. कोणताही नैतिक अधिकार नसताना वाट्टेल तशी टीका करायची, हे धंदे बंद करा. नाहीतर तोंडे कशी बंद करायची हे आम्हाला चांगलं माहिती आहे, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे व्हॉट्स एपच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत, याबद्दल विचारले असता नारायण राणे म्हणाले की, पोहोचतील… पोहोचतील… आणि उपस्थितांमध्ये एकच हंशा पिकला. कशाला नाव घेता आमच्या कामात? चांगले काम चालले आहे. सगळे आम्ही कामाला लागलेलो आहोत. पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. अशा वेळेला नको त्या व्यक्तीचे नाव घेऊन कशाला वेळ घालवता, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपात यावे असे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केले आहे. त्याबद्दल मत विचारले असता राणे म्हणाले की, हा पक्ष पातळीवरचा निर्णय आहे. पक्ष त्याबद्दल निर्णय घेईल. त्यावर आपण आपले वैयक्तिक मत देऊ शकत नाही. ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेतील मृतांची संख्या लपवली जात आहे, या ममता बॅनर्जी यांच्या आरोपाला उत्तर देताना नारायण राणे म्हणाले की, अशी माहिती कशी लपवायची हे त्यांना व्यवस्थित माहिती आहे. त्या स्वतः रेल्वेमंत्री होत्या. मी त्यावेळी त्यांना भेटलेलोही आहे. त्यामुळे त्याबद्दल काय बोलणार? राहता राहिला आमच्या रेल्वेमंत्र्यांचा प्रश्न.. तर ते माहिती लपवणाऱ्यातले व्यक्ती नाहीत, एव्हढेच मी सांगू शकतो