पुणे: शिरूर लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे कोल्हेंना दिलासा मिळाला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत चर्चा सुरू होत्या. विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे विरुद्ध भोसरीचे माजी आमदार विलास लांडे असा हा संघर्ष होता.
पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातल्या निर्सग मंगल कार्यालय येथे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख खासदार शरद पवार यांचे उपस्थितीत पक्षातील महत्त्वपूर्ण नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे अनुषंगाने आढावा घेण्यात आला आणि त्यावर मतदारसंघातील प्रमुख नेत्यांशी विचार विनिमय झाला. यावेळी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत पवार यांनी आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिरूर मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे कोल्हे यांना दिलासा मिळाला आहे.