Monday, July 8, 2024
Homeमहत्वाची बातमीआधी स्वतःची लायकी ओळखा मग नैतिकतेचे धडे द्या : नितेश राणे

आधी स्वतःची लायकी ओळखा मग नैतिकतेचे धडे द्या : नितेश राणे

नितेश राणेंनी ठाकरे गटाच्या गैरवर्तनांचा वाचला पाढा

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नेहमीच अजबगजब विधाने करत असतात. त्यातच आता ओडिशा रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाच्या गैरवर्तनांचा पाढाच वाचला आणि संजय राऊतांचे वाभाडे काढले.

रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या ठाकरे गटाच्या मागणीवर नितेश राणेंनी जोरदार टीका केली. आज रेल्वे पुन्हा सुरु होईपर्यंत वैष्णवजींनी अपघातस्थळावरुन काढता पाय घेतला नाही, रेल्वेमंत्र्याचं काम कसं असावं याबाबत विद्यमान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा आदर्श समोर ठेवावा. तरीही ठाकरे गटाकडून रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली जाते. नैतिकता आणि पश्चात्तापाची भाषा केली जाते. मात्र उद्धव ठाकरे ज्या कोविड काळात मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या निष्काळजीपणामुळे अनेकांना जीव गमवावा लागला, त्याचा पश्चात्ताप उद्धव ठाकरेंना झाला होता का?

केंद्र सरकारला नावं ठेवणार्‍या ठाकरे गटाचा सामना वृत्तपत्राचा ५० लाखांचा व्यवसाय हा केंद्र सरकारच्या जाहिरातींमधूनच चालतो, असा आरोप नितेश राणेंनी केला आहे. ज्यांच्या जीवावर ठाकरे गट जगतो आहे अशा केंद्र सरकारला नावं ठेवण्याची त्यांची हिंमत कशी होते, असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला.

मुख्यमंत्रीकाळात पेंग्विन उद्धव ठाकरे यावर्षी मुंबई तुंबणार नाही अशी आश्वासनं द्यायचे. मात्र त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या मुंबई महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे एकही पावसाळा असा गेला नाही की मुंबई तुंबण्याचा प्रकार घडला नाही. उद्धव ठाकरे लंडनला उपचारांसाठी गेले त्याचाही खर्च कोविड काळात केलेल्या भ्रष्टाचारातूनच झाला. उद्धव ठाकरेंकडे आर्थिक उत्पन्नाचे स्रोत नसल्याने हा पैसा भ्रष्टाचारातूनच जमा केला आहे, असं नितेश राणे यावेळी म्हणाले.

संजय राऊत आपल्या मालकाच्या या सर्व गोष्टींकडे लक्ष न देता नैतिकतेचे धडे देत आहेत, मग त्यांच्या मालकाने नैतिकता जपत साध्या विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा का नाही दिला? संजय राऊत म्हणतात की खरी शिवसेना दिल्लीसमोर कधी झुकत नाही मग उद्धव ठाकरे इतक्यांदा जनपथवर तमाशे करायला का गेले होते? सीबीआय चौकशीवर बोलताय मग श्रीधर पाटणकरांवर असलेल्या चौकशीचं काय झालं? त्यामुळे उगाच इतरांवर आरोप करण्यापेक्षा तुमच्या मालकाने अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले यावर कधीतरी भाष्य करा आणि नैतिकतेचे धडे द्या, असा खोचक सल्ला नितेश राणेंनी संजय राऊतांना दिला.

राऊत आणि ठाकरे जी शिवसेना चालवतायत ते चायनीज मॉडेल आहे आणि कधीही बंद पडेल. त्यांच्या जागांची संख्या घसरुन आता केवळ २२ वर आली आहे आणि पुढच्या काही दिवसांत ती २ वर येईल. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आधी स्वतःची लायकी ओळखा मग दुसर्‍यांवर आरोप करा, अशा शब्दांत नितेश राणेंनी संजय राऊतांची चांगलीच जिरवली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -