पुणे : लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पुण्यामध्ये आज राष्ट्रवादीची आठ मतदारसंघांबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पदाधिकार्यांशी संवाद साधला. यानंतर तिकीटांवरुन भांडणा-या कार्यकर्त्यांची अजित पवारांनी हजेरी घेतली.
पदांवरुन वाद घालणार्या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी त्यांच्या शैलीत चांगलंच खडसावलं. ते म्हणाले, “पदांवरुन कोणीही भांडायचं नाही, नाहीतर एकेकाच्या कानाखाली आवाज काढेन. हा कुठला फाजीलपणा आहे? यातून तुमची नाही तर आमची आणि पवारसाहेबांची बदनामी होते.” याचवेळी जर असं वागलात तर मी अत्यंत टोकाची भूमिका घेऊन पदाचा राजीनामा देईन असा अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दम भरला.
लोकसभानिहाय मतदारसंघांचा आढावा घेण्याचं काम राष्ट्रवादीने सुरु केलं आहे. प्रत्येक मतदारसंघात कोणत्या उमेदवाराची किती ताकद आहे हे विचारात घेऊनच महाविकास आघाडीत जागावाटप केलं जाईल, असं सध्या या आघाडीचं सूत्र आहे. या चाचपणीसाठीच आजची आढावा बैठक घेण्यात आली व त्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांना अजित पवारांनी चांगलीच समज दिली.