
वाराणसी: अवधेश राय हत्याकांड प्रकरणी गँगसटर मुख्तार अन्सारीला वाराणसी एमपी-एमएलए कोर्टाने ३२ वर्षानंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
गेल्या वर्षभरात मुख्तार अन्सारीला वेगवेगळ्या चार प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. परंतु अवधेश राय हत्याकांड प्रकरणी मुख्तार अन्सारीला सर्वात मोठी शिक्षा मिळाली आहे. या हत्येप्रकरणी दोन साक्षीदारांनी कोर्टात आपली साक्ष नोंदवली. शिक्षा सुनावल्यानंतर अन्सारीने वयाचा विचार करता शिक्षा कमी करण्याची मागणी केली होती.
या प्रकरणात मुख्तार अन्सारीसह पाच जण आरोपी आहेत. मुख्तार अन्सारी, भीम सिंह, कमलेश सिंह, राकेश माजी आमदार अब्दुल कलाम अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान या पाच आरोपींपैकी अब्दुल आणि कमलेश यांचा मृत्यू झाला आहे.
काय आहे प्रकरण?
अवधेश राय यांची ३ ऑगस्ट १९९१ साली करण्यात आली होती. अवधेश राय आपला छोटा भाऊ काँग्रेस नेते अजय राय यांच्या घराबाहेर उभे होते. अचानक एक व्हॅन आली. व्हॅनमधील लोक खाली उतरले आणि त्यांनी गोळीबार केला. काँग्रेस नेते अवधेश राय यांची हत्या वारणसीच्या चेतगंज पोलिस ठाण्याच्या परिसरात झाली. ज्यादिवशी हत्या करण्यात आली त्यादिवशी पाऊस होता. व्हॅनमधून आलेल्या लोकांनी अवधेश राय यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.