औरंग्याचं नाव घेत असेल तर माफी नाही : देवेंद्र फडणवीस
आता महाविकास आघाडीचं सरकार नाही: नितेश राणे
अहमदनगर: अहमदनगरच्या मुकुंदनगरमध्ये एका उरूसानिमित्त निघालेल्या मिरवणुकीत तरुणांनी औरंगजेबाचा फोटो झळकविला. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याची गंभीर दखल घेतली आहे. हे सहन केले जाणार नाही, जर कुणी औरंग्याचं नाव घेत असेल तर त्याला माफी नाही, असे फडणवीस यांनी ठणकावले आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
रविवारी रात्री फकिरवाडा परिसरात हजरत दमबाहरी हजरत यांच्या उरुस निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत औरंगजेबचे पोस्टर झळकविल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील मुकुंदनगर परिसरातून चादर अर्पण करण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत काही जण औरंगजेबचा फोटो असलेले फलक घेऊन नाचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
यावर फडणवीस म्हणाले, ‘औरंगजेबाचा फोटो झळकविला जाणे कदापी सहन केले जाणार नाही. असे कृत्य कोणी तरीत असेल तर ते मान्य केले जाणार नाही. कोणी औरंग्याचं नाव घेत असेल तर त्याला माफी नाही,’ असेही फडणवीस म्हणाले आहेत.
भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले, ‘राज्यात काही भागात अशा प्रकारच्या जिहादी विचारांचे लोक आहे. ते पाकिस्तानच्याही घोषणा देतात. पण त्यांनी लक्षात घ्यावे की आता महाविकास आघाडीचे सरकार नाही. त्यांनी लक्षात घ्यावे यापुढे असे प्रकार चालणार नाहीत. ते परत अशी हिमंत करणार नाहीत, अशी काळजी आम्ही घेऊ.
चौघांविरूद्ध गुन्हा दाखल
याबाबत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलिस कर्मचारी सचिन नवनाथ धोंडे यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी मोहमंद सर्फराज इब्राहिम सय्य्द उर्फ सर्फराज जहागिरदार (रा. दर्गादायरा), अफनान आदिल शेख उर्फ खडा (रा. वाबळे कॉलनी), शेख सरवर (रा. झेंडीगेट), जावेद शेख उर्फ गब्बर (रा. आशा टॉकीज चौक) यांच्या विरुद्ध भा.दं.वि.कलम ५०५ (२), २९८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.