Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीबिहारमध्ये गंगा नदीवर बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला

बिहारमध्ये गंगा नदीवर बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला

भागलपूर : बिहारमधील भागलपूरमध्ये रविवारी एक बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला. खगरिया-अगुवानी-सुलतानगंज दरम्यान बांधण्यात येत असलेला पूल कोसळल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात कोणतीही जीवित झाली नाही. हा पूल कोसळल्याने घटनास्थळी आणि परिसरात लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून या घटनेला जबाबदार असलेल्या दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले.

पुलाची पडझड सुरू झाल्यानंतर अवघ्या काही क्षणातच संपूर्ण पूल गंगा नदीत कोसळला. आश्चर्याची बाब म्हणजे दोन वर्षांपूर्वीही या पुलाचा काही भाग कोसळला होता. चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या पुलाची पायाभरणी केली होती. या पुलाच्या अपघाताने बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. तर, सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

१७१७ कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. एप्रिलमध्ये आलेल्या वादळामुळे या बांधकामाधीन पुलाचा काही भागही खराब झाला होता. खगरिया-अगुवानी-सुलतानगंज दरम्यान गंगा नदीवर बांधण्यात येत असलेल्या महासेतूचा मधला भाग नदीत कोसळला आहे.

बांधकामाधीन पुलाचा वरचा भाग कोसळल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र पूल कोसळण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

भागलपूरचे डीडीसी कुमार अनुराग यांनी सांगितले की, आज सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पूल कोसळल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. संबंधित विभागाकडून याबाबतचा अहवाल मागितला असल्याचे त्यांनी म्हटले.

जेडीयूचे आमदार ललित मंडल म्हणाले की, ही घटना दुर्दैवी आहे. यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या पुलाचे उद्घाटन होईल, अशी आमची अपेक्षा होती, मात्र असे अपघात घडत आहेत, हा तपासाचा विषय आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. त्याची चौकशी होईपर्यंत काहीही सांगणे कठीण असल्याचे ते म्हणाले.

बांधकामाधीन पूल कोसळल्याबद्दल विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा म्हणाले की, या घटनेमुळे भ्रष्ट बिहार सरकारच्या असंवेदनशीलपणाचा आणखी एक नवीन प्रकार समोर आला आहे. २०१४ मध्ये ६००-७०० कोटी खर्चाच्या या पुलाची किंमत सुमारे १७०० कोटींवर पोहोचल्याचे ते म्हणाले. उच्च अधिकाऱ्यांनी कमिशनच्या माध्यमातून पैसे वसूल केले. या घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. बिहारची जनता कधीच माफ करणार नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -