उल्हासनगर (वार्ताहर) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात सिंधी भाषिकांबाबत अपशब्द काढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२७ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस उल्हासनगर शहर जिल्ह्याच्या वतीने उल्हासनगर ५ च्या प्रभात गार्डन स्मॅश टर्फ येथे आढावा बैठक व सार्वजनिक प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ‘सिंहाला मारण्यासाठी १०० सिंधी कुत्रेही काही करू शकत नाहीत’ असे विधान केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच असलेले प्रदेश सचिव व उल्हासनगरचे माजी नगरसेवक भरत गंगोत्री यांचा गट आणि कलानी गट हे एकमेकांवर नेहमीच आरोप – प्रत्यारोप करीत असतात. या कार्यक्रमासाठी गंगोत्री गटाला निमंत्रण देण्यात आलेले नव्हते, त्यामुळे संतप्त झालेल्या गंगोत्री यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जितेंद्र आव्हाड, माजी खासदार आनंद परांजपे, पप्पू कलानी आणि ओमी कलानी यांचा निषेध व्यक्त केला होता.