श्री दशभूज लक्ष्मीगणेशाचे कोकणातील एकमेव मंदिर

Share

कोकणी बाणा : सतीश पाटणकर

हेदवी गावाच्या उत्तरेला गुहागर डोंगराच्या कड्यावर श्री दशभुजा लक्ष्मी-गणेश मंदिर आहे. हे कोकणातील अष्टविनायकांमधील एक आहे.

गेल्या काही वर्षांपासून कोकणात पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. कोकणातील धार्मिक वातावरण जवळून अभ्यासले असता आपणास आजही तुलनेने फारशी व्यापारी मानसिकता जाणवत नाही. कोकणातील एकूणच सर्व धार्मिक परंपरा आपले अस्तित्व आजही संभाळून आहेत. जगभरातील धर्मप्रेमी म्हणूनच आजही कोकणात दर्शनाला येतातच… कोकणातील गणेश मंदिरे अतिशय स्वच्छ, सुंदर व निटनेटकी आहेत. आजूबाजूचा परिसर न्याहळताना कधी एकदा आपण गणपती मंदिराकडे पोहोचतो, हे कळतच नाही.

अप्रतिम निसर्गाची पार्श्वभूमी लाभलेल्या कोकणभूमीत गणेशाची अनेक जागृत देवस्थाने आढळून येतात. त्यातीलच एक स्थान म्हणजेच हेदवी येथील श्री दशभूज लक्ष्मीगणेश मंदिर. निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या गुहागर तालुक्यातले हेदवी हे गाव मुंबईपासून २९० किलोमीटर, तर पुण्यापासून २४२ किलोमीटर अंतरावर आहे. गुहागरकडून येताना हेदवी गावात शिरल्यावर डाव्या हाताला किल्लेवजा दगडी तटबंदीने वेढलेले उंच टेकडीवर वसलेले श्री गणेशाचे मंदिर आपल्या नजरेस पडते. वर चढून जाण्यासाठी पायऱ्या असून थेट मंदिरापर्यंत गाडी रस्ताही तयार करण्यात आला आहे. मंदिर परिसरासमोरच वाहने पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पेशवेकाळात केळकर स्वामी नावाच्या गणेशभक्ताला श्रीमंत पेशव्यांच्या बाबतीत वर्तविलेल्या काही घटनांची साक्ष पटल्यामुळे पेशव्यांनी दिलेल्या निधीतून केळकर स्वामींनी येथे हे मंदिर उभारले. हेदवी गाव रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यात आहे. गावाच्या उत्तरेला गुहागर डोंगराच्या कड्यावर श्री दशभुजा लक्ष्मी-गणेश मंदिर आहे. हे कोकणातील (Konkan) अष्टविनायकांमधील एक आहे. गणपतीची दशभुजामूर्ती साडेतीन फूट उंच असून सिंहासनाधिष्ठ आहे. मूर्ती संगमरवरी व डाव्या सोंडेची आहे. सोंडेत अमृत कलश असून डाव्या मांडीवर लक्ष्मी विराजमान आहे. मंदिर एका टेकडीवर उपवनात बांधलेले आहे. मंदिरासमोर दीपमाळ आहे. गाभाऱ्यासमोर लांब सभामंडप आहे. मंदिराच्या भोवती मजबूत दगडी तट आहे. भाद्रपद व माघ महिन्यात यात्रा भरते, दीपोत्सव साजरा करण्यात येतो.

श्रीगणेश हे महाराष्ट्राचे सर्वात लाडके दैवत. लोकमान्य टिळक यांचे सध्या स्मृतिशताब्दी वर्ष चालू आहे. त्यांनीच घरातल्या गणपतीला ‘सार्वजनिक’ केले. गणपतीचे नुसते नाव जरी घेतले तरी चार हातांच्या गोंडस मूर्तीचे रूप चटकन नजरेसमोर येते. त्यातील एक हात भक्तांना आशीर्वाद देणारा असतो. दुसऱ्या हातात त्याला आवडणारा मोदक असतो, तर उर्वरित दोन हातांमध्ये पाश, परशू, अंकुश आदी आयुधे असतात. गणपतीच्या बहुसंख्य मूर्ती चार हातांच्याच असून त्याच अधिक पूजिल्या जातात. पण त्यापेक्षा जास्त हात व कमी हात असलेल्या मूर्ती नाहीतच असे नाही. पुराणकथा आणि मूर्तिकारांची कल्पनाशक्ती यामुळे हातांची संख्या कमी-अधिक झाली असावी. माणसांपेक्षा देव श्रेष्ठ ही संकल्पना साकारण्यासाठी शिल्पकाराने कदाचित हातांची संख्या वाढविली असावी. महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध गणपती १० हातांचे असून कोथरुड (पुणे), हेदवी आणि जांभुळपाडा येथील दशभुजा गणपतीची कीर्ती दूरवर पसरली आहे. मंदिरातील ही पूर्वाभिमुख मूर्ती काश्मीर येथील पांढऱ्या पाषाणापासून घडवलेली आहे. मूर्तीला दहा हात असून उजव्या बाजूला पहिल्या हातात चक्र, दुसऱ्या हातात त्रिशुळ, तिसऱ्या हातात धनुष्य, चौथ्या हातात गदा व पाचव्या हातात महाळुंग आहे. डाव्या बाजूच्या पहिल्या हातात कमळ, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात नीलकमळ, चौथ्या हातात दात व पाचव्या हातात धान्याची लोंब आहे. गणेश मूर्तीच्या डाव्या मांडीवर अष्टसिद्धीपैकी एक असलेली सिद्धलक्ष्मी बसलेली आहे. मूर्ती डाव्या सोंडेची असून सोंडेमध्ये अमृतकुंभ धरलेला आहे. एका मोठ्या आसनावर विराजमान असलेल्या या गणेशमूर्तीची उंची साडेतीन फूट आहे.

मूर्तीचे काळेभोर डोळे अत्यंत बोलके आहेत. मंदिरात कोठेही उभे राहून दर्शन घेतल्यास श्री गणेश आपल्याकडेच पाहात आहे, असे भासते. गळ्यात नागाचे जानवे परिधान केलेली अशी ही दशभूज लक्ष्मीगणेश मूर्ती संपूर्ण भारतात एकमेव आहे, असं म्हणावं लागेल. मंदिराच्या उजव्या कोनाड्यात असलेली लक्ष्मी विष्णूची मूर्ती ही विशेष रूपातली आहे. मूर्तीच्या बाजूला जय-विजय असून मूर्ती गरुडारूढ आहे. टप्याटप्याने जीर्णोद्धार करण्यात आलेल्या या मंदिरात भाद्रपद आणि माघी गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. संकष्टी अंगारिका आणि विनायक चतुर्थीला येथे भाविकांची गर्दी असते. अशा या निसर्गरम्य हेदवी गावास स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा लाभलेला आहे. आपल्याला पर्यटन आणि तिर्थाटन या दोन्हींचा लाभ येथे घेता येतो.

अशा या हेदवी गावात श्री दशभुजा लक्ष्मीगणेश मंदिराव्यतिरिक्त समुद्रकिनारी असलेल्या उमा महेश्वराच्या मंदिराला पर्यटक आवर्जून भेट देतात. उमा महेश्वर मंदिरापासून खडकाळ समुद्र किनाऱ्यावरून पुढे चालत पुढे गेल्यावर थोड्याच अंतरावर निसर्गाचा अद्भुत चमत्कार समजला जाणारे निसर्गनिर्मित स्थान म्हणजे बामण घळ. समुद्रकिनाऱ्यावर काळ्या कातळातील अंदाजे वीस मीटर लांब भेगेमधून ऐन भरतीच्या वेळी उंच तुषार उडवत उसळणारा जलस्तंभ ही ठिकाणंही पाहण्यासारखी आहेत. हेदवी गावात निवासासाठी भक्तनिवास अथवा खासगी हॉटेल्समध्ये चांगल्या प्रकारे सोय होऊ शकते. गावात काही ठिकाणी घरगुती स्वरूपात शुद्ध शाकाहारी भोजनाची व्यवस्था देखील केली जाते. धार्मिक विधी, अभिषेक देणगी देण्यासाठी थेट मंदिर व्यवस्थापन समितीशी
संपर्क साधावा.

(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)

Recent Posts

Team india: बीसीसीआयकडून टीम इंडियाला १२५ कोटींचे बक्षीस

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…

57 mins ago

Indian player: विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंसाठी शिंदे सरकारकडून बक्षीस जाहीर

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…

2 hours ago

Shubh: शुभ काम करण्याआधी का खातात दही-साखर, हे खरंच शुभ असतं का?

मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…

2 hours ago

नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अखेर १२ वर्षानंतर कार्यान्वीत

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…

2 hours ago

Video: मरीन ड्राईव्हवर गर्दीत अडकली अ‍ॅम्ब्युलन्स, चाहत्यांनी असा दिला रस्ता

मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…

3 hours ago

Team India Victory Parade: टी-२० चॅम्पियन्सचे मुंबईत ग्रँड वेलकम, मरिन ड्राईव्हवर चाहत्यांची गर्दी

मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…

4 hours ago