Thursday, July 18, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनकोकणात शैक्षणिक साक्षरतेची गरज!

कोकणात शैक्षणिक साक्षरतेची गरज!

  • दृष्टिक्षेप : अनघा निकम-मगदूम

काही दिवसांपूर्वी बारावी आणि शुक्रवारी दहावीच्या परीक्षेचा निकाल घोषित झाला आहे. अपेक्षेप्रमाणे मुलींनीच बाजी मारली, तर दरवर्षीप्रमाणेच कोकण बोर्डानेच संपूर्ण राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. गुणवत्ता आणि कोकण याचे जुने नाते आहे. ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक, साहित्यिक मूल्ये या मातीत रुजली आहेत. सह्याद्रीच्या कुशीत आणि अथांग समुद्राच्या शेजारी वसलेल्या या कोकणाने आपलं वेगळेपण नेहमीच दाखवून दिलं आहे. प्रत्येक गोष्टीत कोकण वेगळा आहे, बुद्धिमान आहे, विचारी आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा जर कोकण राज्यात चमकले, तर त्यात वेगळं वाटण्याची खरं तर गरज नाहीय. पण वेगळा विचार करण्याची खरं तर त्यापुढे गरज आहे. गरज आहे ती इथल्या बुद्धिमत्तेला कोंदण घालण्याची, या बुद्धिमत्तेला योग्य संधी देण्याची. दरवर्षी दहावी आणि बारावी परीक्षांचा निकाल लागतो. संपूर्ण राज्यातून कोकणची पोरे अव्वल येतात. त्यांचं कौतुक होतं, एका दिवसाचा कौतुकाचा सोहळा होतो, बातमी झळकते. पण पुढे ही गुणवत्ता कुठे जाते? हाच मोठा प्रश्न आहे. कारण एमपीएससी, यूपीएससी या स्पर्धात्मक परीक्षाच्या निकालामध्ये कोकणाचा चेहरा क्वचित आढळतो. व्यवसाय, उद्योगामध्ये ठळकपणे घेता येतील, अशी कोकणातील नावे फार कमी आहेत. त्यात जी नावे पुढे आहेत ती कोकणातून बाहेर पडून वेगळ्या ठिकाणी राहून स्वतःची ओळख निर्माण केलेली आहेत. म्हणूनच अशा वेळी प्राशन पडतो, बोर्डात झळकलेली ही गुणवत्ता कुठे गायब होते. काय होतं अशा बुद्धिमान विद्यार्थ्यांचे?

यावर अनेक ठिकाणी उहापोह झाला आहे, मतमतांतरे झाली आहेत. त्यात पुढील शिक्षणासाठी आवश्यक संधी कोकणात उपलब्ध नाही, हा मुद्दा आहेच. पण बारावीनंतर नेमकं काय आणि कसं करायचं? याचं मार्गदर्शन देणारी व्यवस्थाच इथे नसल्याचे अनेकदा दिसून येते. दहावी, बारावीचे शिक्षण घ्यायचं आणि पुणे किंवा मुंबईला जायचं, तिथे मिळेल ती संधी स्वीकारायची आणि आपल्या मर्यादेत राहून, मग ती मर्यादा आर्थिक जास्त महत्त्वाची असते. ती समजून प्रयत्न करत राहायचे, ही एक मानसिकता इथे दिसून येते. म्हणजेच पाल्य आणि पालक यांना शैक्षणिक संधीच्या दृष्टीने साक्षर करणारेच नसल्याचे प्रकर्षाने दिसून येते. हेच बदलण्याची गरज आहे. आताचे शिक्षण हे जिल्हा, राज्य किंवा अगदी देशांतर्गत मर्यादित राहिलेले नाही. ग्लोबल स्तरावरचे शिक्षण देणाऱ्या शिक्षण देणाऱ्या शाळा आता कोकणात शहरी भागात दिसू लागल्या आहेत. पण या प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षणाचा ग्लोबलायझेशन झाले असले तरीही उच्च शिक्षण घेताना मात्र त्याचा कितपत फायदा होईल, याची शंकाच आहे. याचसाठी आधी या बुद्धिमान लोकांच्या कोकणात शैक्षणिक साक्षरता आणण्याची गरज आहे. केवळ एज्युकेशन हब निर्माण होऊन चालणार नाही, तर पालकांना आणि पाल्याला भविष्यातील संधी कोणत्या आणि त्याचा उपयोग कसा आणि कोणत्या मार्गाने करायचा? याचे ‘शिक्षण’ देण्याची गरज आहे, तरच प्रचंड मेहनत करून अव्वल येणाऱ्या कोकणातल्या या गुणवत्तेला योग्य मार्ग दिसेल आणि तिचा उपयोग राष्ट्र घडवायला होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -