Wednesday, May 14, 2025

ताज्या घडामोडीठाणे

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नऊ वर्षात सामान्यांना सुखी ठेवण्यास प्राधान्य

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नऊ वर्षात सामान्यांना सुखी ठेवण्यास प्राधान्य

देशाची सुवर्णयुगाकडे वाटचाल : केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील


मुरबाड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नऊ वर्षांत गरीबांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले गेले असून, सामान्य माणसाला सुखी ठेवण्याचा एकमेव उद्देश ठेवण्यात आला. नियोजनबद्ध लोकहिताच्या वेगवान विकासकामांमुळे सामान्य माणसाचे जीवन आनंदी होत आहे. जगभरात भारताचा लौकिक वाढला असून, देशाची सुवर्णयुगाकडे वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ९ वर्षांत केलेले कार्य व महाजनसंपर्क अभियानाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


कोरोना महामारीपासून ८० कोटी नागरिकांना मोफत अन्न-धान्य, आयुष्मान भारत योजनेतून पाच कोटी रुग्णांवर पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार, कोरोनावर २२० कोटी मोफत डोस, साडेतीन कोटी कुटुंबांना पक्के घर, ११ कोटी ७२ लाख शौचालये, १२ कोटी घरात नळाने पाणी, जनऔषधी केंद्रांवर स्वस्तात औषधे, १ रुपयात सॅनिटरी नॅपकिन, साडेनऊ कोटी भगिनींना मोफत गॅस जोडणी, प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक ६ हजार रुपये, खतांच्या किंमती कायम आदी महत्वपूर्ण काम करून गरीबांसाठी सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी कार्यरत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सिद्ध केले. केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णयात गरीबांच्या हिताचा व कल्याणाचा विचार केला गेला, असे प्रतिपादन कपिल पाटील यांनी केले.



कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो, आठ पदरी माजिवडा-वडपे बायपास, शहापूर-खोपोली महामार्ग आदींसह अनेक महत्वाचे प्रकल्प मार्गी लागले असून, नरेंद्र मोदी यांच्यामुळेच भिवंडी लोकसभा मतदारसंघात विकासाची नवी पहाट उगविली, अशी भावना कपिल पाटील यांनी व्यक्त केली.


`न भूतो न भविष्यति' कार्य
जम्मू-काश्मिरातून ३७० कलम रद्द, ५२८ वर्षांपासून प्रतिक्षेत असलेले अयोध्येतील श्री राम मंदिर, केदारनाथ धाम पुनर्निर्माण, काशी विश्वनाथ व सोमनाथ कॉरिडॉर आदींबरोबर लोकशाहीचे नवे मंदिर असलेली नवी संसद आदी `न भूतो न भविष्यति' कार्य नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीतच पार पडले, असे कपिल पाटील यांनी नमूद केले. देशातील उद्योग क्षेत्राला चालना मिळाली. हवाई मार्ग, जलमार्ग, महामार्ग, लोहमार्ग अशा सर्वच वाहतूक मार्गांमध्ये सुधारणा करण्यात आली. जागतिक अर्थव्यवस्थेत भारताने पाचव्या क्रमांकापर्यंत भरारी घेतली. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाच्या माध्यमातून गावे स्मार्ट करण्याचे कार्य सुरू आहे. जगभरात विश्वगुरू म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी ही देशाची गरज आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.



भिवंडी मतदारसंघात नऊ वर्षांत वेगाने प्रगती!
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील विविध भागात नऊ वर्षांत वेगाने प्रगती झाली. रेल्वेमार्ग, जलमार्ग, हर घर जल योजनेतून मतदारसंघातील गावांमध्ये पाणीयोजनांसाठी कोट्यवधींचा निधी, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून ग्रामीण भागात कॉंक्रीट रस्ते, अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेली कामे केवळ नरेंद्र मोदींच्या सरकारमुळेच शक्य झाली. किसान सन्मान योजनेचा भिवंडी लोकसभा मतदारसंघात १ लाख ७५ हजार शेतकरी लाभ घेत आहेत, असे कपिल पाटील यांनी नमूद केले. भिवंडी मतदारसंघात १२१ आदिवासी गावांचा आदर्श गावे म्हणून, तर देशातील पहिले कार्बन न्यूट्रल आदिवासी गाव भिवंडीत उभारले जात आहे, असे ते म्हणाले.


नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीत मुरबाड रेल्वेला हिरवा कंदील
भारतीय रेल्वेचे जनक नाना शंकरशेठ यांचे मूळ गाव मुरबाड आहे. भारतात रेल्वे सुरू होण्यासाठी दिवंगत नाना शंकरशेठ यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, त्यांच्या मूळ गावातील रहिवाशांना रेल्वेसाठी प्रतिक्षा करावी लागत होती. अनेक दशकांपासून मुरबाडपर्यंत रेल्वेची मागणी पूर्ण झाली नाही. अखेर नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत मुरबाड रेल्वेला हिरवा कंदील मिळाला.

Comments
Add Comment