नैराश्यावर मात

ओंजळ : पल्लवी अष्टेकर


कुढत राहण्यापेक्षा आपली व्यथा आपल्या जवळच्या व्यक्ती किंवा मानसोपचारतज्ज्ञ यांच्यापाशी व्यक्त करावी. नैराश्याचे प्रमाण जास्त असल्यास त्यावर उपाय करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणे अतिशय महत्त्वाचे आहे.


जीवनात एखाद्या कठीण प्रसंगाला सामोरे जाताना, दुःखाचा सामना करताना नैराश्य येणे स्वाभाविक आहे. ‘डिप्रेशन’ अर्थात ‘नैराश्य’ हा एक भावनिक असंतुलनाचा (मूड डिसऑर्डर) प्रकार आहे, ज्यामुळे आपले विचार, भावना, वर्तन, दिनक्रम यावर विपरित परिणाम होतो; परंतु भारतात अजूनही मानसिक आरोग्याला तितकेसे महत्त्व दिले गेलेले नाही. जसे शरीर आजारी पडते, तसे मनही आजारी पडू शकते व त्यावरही उपचार करणे तितकेच आवश्यक आहे, ही संकल्पना अजून आपल्या भारत देशात तितकीशी रुजलेली नाही.



परदेशांत ‘मेडिकल लिव्ह’प्रमाणे सर्रास ‘माइंड लिव्ह’ पण घेणे मान्य आहे. एखाद्या दिवशी व्यक्तीला नैराश्यामुळे अथवा एखाद्या मानसिक कारणाने रजा घ्यावीशी वाटत असल्यास त्यासाठी त्याला किंवा तिला ती घेण्याची मुभा आहे. मानसिक रुग्णाकडे सहानुभूतीने पाहणे, प्रसंगी समुपदेशकाची मदत घेणे जरूरीचे आहे. नैराश्याचे प्रमाण जास्त असल्यास त्या व्यक्तीच्या समस्या जाणून त्यावर उपाय करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणे अतिशय महत्त्वाचे आहे. ‘मन करा रे प्रसन्न... सर्व सिद्धीचे कारण’ असे साधू-संत म्हणूनच सगळ्यांना सांगून गेले आहेत. कितीतरी वेळा दैनंदिन जीवनातील ताणतणाव एखादी व्यक्ती सक्षमपणे हाताळू शकत नाही व ती पूर्णपणे कोलमडून जाते. अशा वेळेस जर त्या व्यक्तीला कुटुंबीयांची, नातलगांची वेळीच मदत मिळाली नाही, तर ती व्यक्ती नैराश्येच्या गर्तेत पार बुडून जाते. त्यांचे विचार अगदी आत्महत्या करण्यापर्यंत जाऊ शकतात. योग्य वेळी न केलेल्या उपचारांअभावी व्यक्तीला ‘तीव्र नैराश्य’ अर्थात ‘क्रॉनिक डिप्रेशन’ येऊ शकते.



अशा वेळी मानसोपचारतज्ज्ञ आजाराचे निदान करून औषध देतात. त्यामुळे रुग्णाचे पुनर्वसन होऊन त्याला किंवा तिला समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होते.



आलोकच्या घरात ७-८ माणसे राहायची. मोल-मजुरी करून त्याचे आई-वडील कुटुंबाचे पोट भरायचे. त्यात गावाकडून पै-पाहुण्यांची दोन मुले शिक्षणासाठी येऊन राहिली होती. आर्थिक टंचाई, कौटुंबिक ताणतणाव यात आलोकचे वडील कधी व्यसनाच्या विळख्यात सापडले ते कळलेच नाही. त्याच भरात त्यांनी आपले जीवन संपविले. त्यांच्या आत्महत्या करण्याने संपूर्ण कुटुंब कोलमडले. या धक्क्याने आलोकनेही आपले जीवन संपविले. वडिलांच्या आत्महत्येने आलोकच्या मनावर झालेले व्रण भरून निघाले नाहीत. त्यावेळी जर त्याचे दुःख दूर करण्यासाठी त्याला एखाद्या मित्राचा आधार मिळाला असता, कुटुंबापैकी कोणी वेळीच त्याची मनःस्थिती समजून घेऊन त्याला उभारी दिली असती, तर आज ही वेळ आली नसती.



म्हणूनच स्वतःला त्रास करून घेणे, कुढत राहाणे यापेक्षा आपली व्यथा आपल्या जवळच्या व्यक्ती, समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ज्ञ यांच्यापाशी व्यक्त करावी. डिप्रेशन हा काही गरिबीतच आढळणारा मानसिक आजार नाही, तर तो सर्व स्तरांमध्ये आढळतो. नट-नट्या, यशस्वी क्षेत्रांत काम करणारे उद्योजक यांनी मानसोपचारांनी, मनमोकळी चर्चा, औषधोपचार यातून फायदा झाल्याचे सांगितले आहे.



माणसाचे मानसिक आरोग्य सदृढ असल्यास त्याच्यातील क्षमतेनुसार तो उत्तम आयुष्य जगू शकतो. तुमच्यातील नकारात्मक भावना, विचार व वर्तणूक यात मानसोपचाराने आमूलाग्र बदल होऊ शकतो. अपर्णा पिरामल-राजे यांचे ‘केमिकल खिचडी’ हे पुस्तक प्रचंड गाजत आहे. लेखिकेला स्वतःला बायपोलर डिसऑर्डर हा आजार असून ती स्वतःच्या वयाच्या २४व्या वर्षांपासून ३६व्या वर्षापर्यंत यासाठी झगडत राहिली. यात तिला तिच्या पतीची, बहिणीची व आईची अखंड साथ मिळाली. मानसोपचारतज्ज्ञांची मदत मिळाली. यातून अपर्णा आता अनेकांना मार्गदर्शन करतात, अनेक कार्यक्रमांत लोकांना बायपोलर डिसऑर्डर या मानसिक आजाराबाबत प्रबोधन करतात. त्यामुळे लोक याबाबत जागरूक होत आहेत. तीव्र मानसिक आजार असूनसुद्धा व्यक्ती मानसोपचारतज्ञ यांच्या सहाय्याने यावर मात करत नोकरी, संसार सांभाळून आयुष्य जगू शकते.



समाजाला मार्गदर्शक असे डाॅक्टर संजय उपाध्ये यांचे अनेक व्हीडिओज यूट्यूबवर उपलब्ध आहेत, जे प्रेरणादायी आहेत. आयुष्यात विनोदाचे महत्त्व, भूतकाळातील कटू आठवणी विसरून वर्तमानकाळात जगता आले पाहिजे, भविष्यकाळाचा अतिविचार टाळावा, अशा आशयाचे संदेश ते आपल्या मनोरंजक शैलीतून श्रोत्यांना देत असतात. षडरिपूंवर ताबा, तुलना नको-करायचीच तर अधोतुलना करा, म्हणजे आपल्यापेक्षा दु:खी लोकांशी तुलना करा, म्हणजे त्यांना मदत करण्याची तुम्हाला इच्छा होईल, असे ते सांगतात.



अच्युत व मेघना यांचा प्रेमविवाह. अच्युत एका नावाजलेल्या कंपनीत चांगल्या पदावर काम करायचा. मेघनाही उच्चशिक्षित; परंतु छोट्या कुटुंबातून मोठ्या कुटुंबात आलेली. त्यांच्या लग्नाला दीडेक वर्ष झाले होते. लग्नानंतर कुटुंबातील १०-१२ मंडळींसोबत जुळवून घेणे मेघनाला जड जाऊ लागले. त्यात तिच्या सासरच्या मंडळींचा तिच्या नोकरी करण्याला विरोध होता. त्यामुळे मानसिक कुचंबणा होऊन ती अस्वस्थ राहू लागली. यातून सुटका म्हणून तिच्या फेऱ्या वारंवार माहेरी होऊ लागल्या. याचा परिणाम अच्युतच्या ऑफिस कामावर होऊ लागला. त्याला नैराश्य आले. शेवटी या जोडप्याने कौटुंबिक मार्गदर्शन केंद्रात धाव घेतली. आम्ही समुपदेशकांनी त्यांना थोड्या समजूतदारपणे वागण्याचा सल्ला दिला.



लग्नानंतर सुरुवातीचा काळ हा प्रत्येकाच्या जीवनात बदलाचा, तडजोडीचा असतो. त्यात प्रवाहाबरोबर जुळवून घेण्याची क्षमता असणाऱ्यांना या बदलांसोबत जुळवून घेणे सोपे जाते. संसारात परस्परांना न दुखावता पुढे जाण्याची कला आत्मसात करण्याचा सल्ला आम्ही त्यांना दिला. आता ते दोघे संसारात हळूहळू स्थिरस्थावर होण्याच्या प्रयत्नात आहेत, तर असा नैराश्याचा वेढा आपल्यापासून लवकरात लवकर दूर करा, म्हणजे एक सुंदर, परिपूर्ण आयुष्य जगायला मिळेल.

Comments
Add Comment

क्रिकेटमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

तंत्रवेध : डॉ. दीपक शिकारपूर आज क्रिकेट सामन्याप्रसंगी तसेच नंतर ॲक्शन रिप्ले आणि हायलाईट्सच्या माध्यमातून

साहित्यातला दीपस्तंभ - वि. स. खांडेकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर विष्णू सखाराम खांडेकर हे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य कादंबरीकार, एक लोकप्रिय

ए मेरे दिल कहीं और चल...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे प्रत्येकाच्या जीवनात असा एखादा क्षण येऊन गेलेलाच असतो की जेव्हा त्यावेळी

वंदे मातरम्’ मातृभूमीचे सन्मान स्तोत्र

विशेष : लता गुठे भारतीय संस्कृतीचा विचार जेव्हा मनात येतो, तेव्हा अनेक गोष्टी मनात फेर धरू लागतात. अतिशय प्राचीन

पारिजातक वृक्ष पृथ्वीवर येण्याची कथा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे पारिजातकाला स्वर्गातील वृक्ष असेही म्हटले जाते. पारिजात हा एक सुगंधी

घर जावई

क्राइम : अॅड. रिया करंजकर लग्न या संस्काररूपी संस्थेवरून तरुणांचा विश्वास उडत चाललेला आहे. शादी का लड्डू नही खावे