ऐकलंत का! : दीपक परब
कुणाही प्रतिभावंत कलाकाराला ‘मराठी’ची भूल ही पडतेच आणि त्याला मराठीत काम करण्याची कमालीची उत्सुकता असते. मराठी कलाक्षेत्रातील बुजुर्गांनी केलेल्या दमदार कामगिरीचे हे फलीत आहे, असेच म्हणायला हवे. आता हेच पाहा ना, एक हरहुन्नरी प्रतिभावंत कलाकार म्हणून मनोज वाजपेयी यालाही मराठीची भुरळ पडली आहे. पण तो योग्य संधीची वाट पाहतोय. मनोजला एका मराठी सिनेमासाठी मध्यंतरी विचारणा झाली होती. पण इतर चित्रीकरणाचे काम सुरू असल्याने दुर्दैवाने त्या सिनेमासाठी त्याला तारखा देता आल्या नाहीत. मराठी सिनेमात करण्याची आपली इच्छा आहे आणि मी ते करेनच. मराठी सिनेविश्वात विविधांगी कथा खुबीने दाखवल्या जात आहेत. त्यात सहभागी व्हायला अपल्याला आवडेल, असे त्याने बोलून दाकवले आहे.
दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या या अभिनेत्याच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘बंदा’ सिनेमातील भूमिकेसाठी त्याचे भरभरून कौतुक होत आहे. हा सिनेमा एक सत्यकथा मांडणारा चित्रपट आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या वेगवेगळ्या कथांमधून हा सिनेमा तयार झाला आहे. त्यात न्यायव्यवस्थेशी निगडित अनेक तांत्रिक बाबींचा समावेश आहे. कथानकातील व्यक्तिरेखांना आणि घटनांना पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न येथे केला गेला आहे. त्यामुळेच हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनाला भिडला आहे.