क्राइम : ॲड. रिया करंजकर
आज-काल नो डॉक्युमेंट्स पद्धतीने ॲपवरून कर्ज मिळतात. गरजवंत लोक कर्ज घेतात अन् नातेवाइकांचे नंबर देतात. पण मग पुढे वसूलकर्त्यांकडून त्यांना विनाकारण मानसिक त्रास होतो.
सुजाता घाईघाईतच ऑफिसमधून घरी जायला निघाली. रस्त्यात तिला एक फोन आला. अनक्नोन फोन होता म्हणून तिने काही उचलला नाही. दोन-तीन वेळा त्याच फोनवरून कॉल येऊ लागले. कोणाचा तरी ओळखीचाच असेल हा विचार करून सुजाताने तो फोन उचलला. समोरून कसली चौकशी न करता ‘तुम्ही सुषमा या नावाच्या व्यक्तीला ओळखता का?’ असा प्रश्न करण्यात आला. आधी नेमकी सुषमा कोण हेच कळेना. सुजाता पेशाने वकील असल्यामुळे तिच्याकडे अनेक क्लाएंटचे नंबर होते. सेम नावे असलेले क्लाएंट तिच्याकडे होते. समोरूनच व्यक्तीने सांगितलं की, ‘सुषमा नावाची तुमच्या ओळखीची व्यक्ती आहे, तिने कर्ज काढलेले आहे व ती कर्जाचे हप्ते भरत नाही, त्यामुळे याच्यापुढे तुम्हाला ते कर्जाचे हप्ते भरावे लागतील.’ सुजाताला थोडा वेळ काहीच कळालं नाही. कोण सुषमा व मी कधी कोणाला कर्ज घेण्यासाठी विटनेस राहिली होती, हेच आधी समजलं नाही म्हणून तिने नेमकी ‘सुषमा कोण?’ याबद्दल विचारणा केली असता ती तिची शालेय मैत्रिणी निघाली व समोरच्या व्यक्तीने सांगितलं की, ‘तुमच्या मैत्रिणीने आमच्याकडून कर्ज घेतले आहे व कर्ज घेताना तुमचा फोन नंबर आम्हाला दिलेला आहे. तुमची मैत्रीण आमचा आता फोन उचलत नाही, त्यामुळे तुम्हाला आता कर्ज भरावे लागेल. आम्ही थोड्या वेळाने तुम्हाला फोन करतो’, असे त्यांनी सांगून फोन ठेवून दिला.
सुजाताने सुषमाला फोन केला आणि नेमका प्रकार काय आहे? याच्याबद्दल विचारणा केली असता, ‘हो मी कर्ज घेतलं होतं. पण तुझं नाव दिलं नव्हतं’, असे ती म्हणाली. सुजाताने विचारलं, ‘माझा नंबर दिला नव्हता, तर माझा फोन नंबर त्यांच्याकडे आला कुठून? कर्ज घेताना मला सांगितलं होतं का?’ ती बोलायला लागली, ‘नाही. मोबाइलच्या ॲपमधून कर्ज घेतले आहे आणि मी ते फेडलेले आहे. तरीही मला त्या लोकांचे फोन येतात आणि वेगवेगळे लोक मला फोन करतात. एवढेच नाही तर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या सगळ्यांचे फोन नंबर घेऊन ते सगळ्या लोकांना हेच सांगत आहेत’, असं ती म्हणायला लागली. म्हणून सुजाताने फ्रेंड सर्कलमधील इतर फ्रेंड लोकांना फोन केला, तर ते म्हणायला लागले की, ‘आम्हाला कोणालाही फोन आलेला नाही. म्हणून पुन्हा सुजाताने सुषमाला फोन केला आणि विचारलं, ‘बाकीच्यांना फोन केले नाहीत. पण मलाच कसा काय आला?’ ती म्हणाली, ‘मला माहीत नाही. पण मी काय फोन नंबर दिलेला नाही.’
थोड्या वेळानंतर परत दुसऱ्या फोनवरून सुजाताला फोन आला. सुजाताने परत तो फोन उचलला. समोरची व्यक्ती नको नको त्या शिव्या सुजाताला देऊ लागल्या. सुजाताने सरळ सांगितले, ‘मी पेशाने वकील आहे. तुम्ही कोणाला शिव्या घालता यायचं भान आहे का?’ समोरची व्यक्ती म्हणाला लगेच, ‘तुम्ही कोणी पण असून द्या, आमचं कर्ज फेडा.’ सुजाताने आपल्या पेशाला धरून विचारलं की, ‘तुम्ही कर्ज घेताना मला फोन केला होता का? माझे काही आधार कार्ड, पॅन कार्ड तुमच्याकडे आहेत का? की मी कुठल्या कागदपत्रावर सही केलेली आहे का? ते पुरावे आधी मला दाखवा.’ समोरचा व्यक्ती म्हणाला, ‘पण तुमचा फोन नंबर आम्हाला दिला गेला होता.’ तेव्हा सुजाता सरळ बोलली की, ‘ज्यावेळी फोन नंबर दिला गेला होता, तेव्हा फोन करून तुमची मैत्रीण कर्ज काढत आहे आणि तुमचा फोन दिलेला आहे, अशी विचारणा तुम्ही केली होती का?’
समोरील व्यक्ती उडवा-उडवीची उत्तरे देऊ लागली. तेव्हा सुजाताने सरळ सांगितले की, ‘तुमचा ॲड्रेस कुठे आहे तो सांगा मी तिथे येते आणि एकटीच येणार नाही, तर पोलिसांना घेऊन येते. त्यामुळे तुमच्या ऑफिसचा ॲड्रेस मला द्या, तर समोरील व्यक्ती बोलू लागली आमचा ॲड्रेस आम्हीच कोणालाही सांगत नाही. त्या सुजाताने सांगितलं, याच्यापुढे तुम्ही मला फोन करायचा नाही. नाहीतर मी सरळ तुमच्याविरुद्ध आणि ज्याने कर्ज घेतले त्याच्याविरुद्ध पोलीस कम्प्लेंट करेन.’ आणि त्याचप्रमाणे पोलीस कम्प्लेंट आपल्या मैत्रिणीविरुद्ध व फोन करणाऱ्याविरुद्ध केली.
सुजताने सुषमाला फोन करून. चांगलीच कानउघडणी केली. आमचे फोन देण्याच्या अगोदर तू आमची परमिशन घेतली होतीस का? हा सर्व प्रश्न तिने केला. तेच उत्तर होतं की, ‘मी त्यांना फोन दिले नाही. माझ्या फोनवरून त्याने घेतले.’ असे कोणी कोणाचे फोन घेऊ शकत नाही. ॲपवरून कर्ज घेताना, नातेवाइकांचे किंवा रिलेटिव्हचे फोन नंबर लोक देतात. पण गंमत अशी होते की, कर्ज घेणारे कर्ज फेडतात; परंतु वसुली करणारे लोक वेगवेगळे असल्यामुळे, वेगवेगळे लोक कर्जवसुलीसाठी फोन करतात आणि कर्जापेक्षा दुप्पट रक्कम कशी वसूल केली जाईल. हा वसुली करणाऱ्या लोकांचा हेतू असतो. सुषमाचं असं म्हणणं होतं की, ‘मी कर्ज फेडलेले आहे आणि क्लिअर केलेले ऑनलाइन डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत. तरीही लोक मला सतवत आहे. म्हणून मी त्यांचे फोन उचलत नाही.’ सुषमाला सुजाताने असा सल्ला दिला की, ‘जिथून तू कर्ज घेतले आहे तिथे जा आणि सगळे डॉक्युमेंट्स दे.’ यावर उत्तर दिले, त्यांचे ऑफिसच नाही, तर मी कुठे देऊ? मग सुषमाला सुजाता म्हणाली, ‘जर ऑफिसच नाही त्यांच, मग तू कर्ज घेतलं कसं? आणि घेतले ते घेतले आणि नातेवाइकांच्या नंबर देऊन नातेवाइकांना तू फसवण्याचे काम केलेले आहे. कर्ज घेऊन मोकळी झालीस आणि शिव्या मात्र ज्यांचे नंबर दिले त्यांना पडल्या विनाकारण.’
आज-काल नो डॉक्युमेंट्स अशा पद्धतीने ॲपवरून कर्ज मिळतात आणि ज्यांना गरज आहे ते लोकही कर्ज घेतात. काही लोक फेडतात, काही लोक फेडत नाहीत. पण आपल्या नातेवाइकांचे नंबर देतात आणि त्या नातेवाइकांना विनाकारण मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
(सत्यघटनेवर आधारित)