कल्हईवाला : एकनाथ आव्हाड
कल्हईवाला
आला हो आला
कल्हईवाला…
हुशार खूप
जरी दिसे बावळा…
मळकट पोशाख
रुमाल डोक्यावर…
नाना भाषा
त्याच्या ओठावर…
विस्तवावर भांड्यांना
करी तो कल्हई…
त्यावर भरभर
नवसागर फिरवी…
चिमट्याने भांडे मग
बुडवी पाण्यात…
‘चर्र’ आवाज
घुमे आमच्या कानात…
पितळेच्या भांड्यांना
कल्हई अशी करतो…
जुनीपुराणी भांडी
नवी करून देतो…
पाहून सारे मी
सांगतो थाटात…
कल्हईवाल्याच्या
जादू आहे बोटात…
काव्यकोडी : एकनाथ आव्हाड
१) हे पेरून ताजी ताजी
कोथिंबीर मिळते
मुखशुद्धीसाठी याची
डाळ वापरली जाते
मसाल्यांमधला हा
महत्त्वाचा पदार्थ
जिऱ्यासोबत कुणाचं
नाव नेमकं येतं?
२) सरसो का साग सोबत
याचीच खावी भाकरी
पंजाबमध्ये हमखास
मिळणार याची खात्री
चिवडा, पोहे बनवतात
भाजूनसुद्धा खातात
गुजरातीमध्ये कोणाला
‘भुटा’ असं म्हणतात?
३) दुधात विरजण घातल्यावर
नावारूपाला येते
पंचामृतात याचीही
गणना केली जाते
रुचकर, अग्निदीपक
दुधापेक्षाही भारी
पटकन याचे नाव
सांगा कुणीतरी?
उत्तर –
१) धने
२) मका
३) दही
eknathavhad23 @gmail.com