रेल्वेचा ताजा अपघात, त्यातील मृतांची अवस्था आणि जखमींचे हाल पाहून आतून हालली नसेल तो माणूसच नाही… मात्र असे भीषण अपघात पचवूनही रेल्वे ढिम्म आहे. आता सदर अपघाताची चौकशी होईल, यथावकाश त्याची माहिती जाहीर होईल, पण चुकीमधून धडा घेत पुन्हा असे अपघात होणारच नाहीत, याची खात्री देता येणार नाही. त्यामुळेच केवळ चकमकाट न करता मुळात रेल्वेचा पाया भक्कम करणे गरजेचे आहे.
ट्रेन क्रमांक १२८४१ शालीमार-चेन्नई, कोरोमंडल एक्स्प्रेस आणि ट्रेन क्रमांक १२८६४ सर. एम. विश्वेश्वरय्या-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ रुळावरून घसरून झालेल्या अपघातात अनेकांचे बळी गेले. बळींची संख्या वाढणार असून जखमींची संख्याही खूप मोठी आहे. रेल्वेच्या इतिहासात अतिशय मोठा आणि विदारक अशी या अपघाताची नोंद होणे अगदी स्वाभाविक असून मदतीच्या कितीही मलमपट्ट्या लावल्या तरी त्याची दाहकता कमी होणार नाही. थोडक्यात या अपघाताने पुन्हा एकदा रेल्वे यंत्रणेतील अनेक कच्चे दुवे समोर आणले असून त्रूटी दूर करण्याची गरज नव्याने अधोरेखित झाली आहे.
ताजा अपघात घडला ते रेल्वे स्टेशन छोटे असून तिथून अप-डाऊन ट्रेनच्या लाइन आहेत, तर मालगाड्या जाण्यासाठी एक लाइन आहे. सदर अपघात मालगाडीमुळे झालेला नाही, तर आधी कोरोमंडल ट्रेनला अपघात होऊन काही डबे जोराने मालगाडीच्या लाइनवर येऊन पडले. त्याच वेळी हावडा ट्रेनही आली आणि अपघातग्रस्त ट्रेनवर आदळल्याने घटनेची तीव्रता आणखी वाढली. इथे लक्षात घ्यायला हवे की, रात्रीच्या वेळी अन्य वाहकांप्रमाणेच रेल्वेचे चालकही गाडी वेगाने चालवण्याच्या प्रयत्नात असतात. साहजिकच गाड्यांचा वेग अधिक असल्यामुळे अपघाताची तीव्रता वाढून मोठ्या प्रमाणावर लोक मृत वा गंभीर जखमी झाले असल्याचे प्रथमदर्शी समजत आहे. पहिल्या गाडीला अपघात झाल्याचे मागून येणाऱ्या गाडीला समजले नाही आणि पुढे जाण्याचा सिग्नल मिळाल्याने ती वेगाने पुढे आली आणि या तिन्ही गाड्यांचा अपघात झाला. आता या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी होईल. मात्र त्यातून काही निष्पन्न होईल असे वाटत नाही, कारण कोणीही याची नैतिक जबाबदारी स्विकारणार नाही. जवळपास तीनशे माणसांचा मृत्यू आणि हजारो जखमी झालेले असताना एवढ्या मोठ्या गुन्ह्याची जबाबदारी स्विकारण्यास कोणीही तयार न होण्यास नवल वाटण्यासारखी काहीच नाही. त्यामुळेच या चौकशीतून काही समोर येण्याची शक्यता खूप कमी आहे.
सध्या रेल्वे यंत्रणेमधील सुधारणांचा बराच बोलबाला कानी येत आहे. मात्र या आधीही सिग्नलविषयक अनेक प्रयोग झाले आहेत, हे विसरून चालणार नाही. ठरावीक अंतरावर दुसरी गाडी असेल, तर आधीच त्याची सूचना देण्याची यंत्रणा यापूर्वीही प्रायोगिक पातळीवर अवलंबण्यात आली होती. सध्याच्या यंत्रणेनुसार पहिली गाडी ठरावीक अंतरापलीकडे गेली की, सिग्नल पडतो आणि त्यामागील गाडी त्या ट्रॅकवरील पुढे जात राहते. या सगळ्याचे नियोजन कंट्रोल रूममधून होते.
हे सरकार दिल्लीला खूप मोठे कंट्रोल युनिट स्थापन करणार होते. मात्र रेल्वेच्या अन्य प्रोजेक्टप्रमाणेच हेदेखील आतापर्यंत अस्तित्वात आलेले नाही. साहजिकच अशा कच्च्या दुव्यांमुळे ताजा अपघात झाला. त्यामुळे मानवी चुकांमुळे हा अपघात घडल्याची शक्यता खूप मोठी आहे.
सध्याचे सरकार नवनवीन गाड्या आणत आहे. मात्र मुळात नवीन रेल्वे आणण्यापेक्षा रुळाची यंत्रणा सक्षम करणे अधिक गरजेचे आहे. अधूनमधून रूळ बदलण्याचे, त्याला खालून पॅकेज देण्याचे काम होत असले तरी रुळांची क्षमता वाढवणे सर्वप्रथम गरजेचे आहे. आधीचे रूळ बदलून त्याजागी नवीन तंत्रज्ञानाने युक्त रूळ बसवण्यास आपण प्राधान्य द्यायला हवे. याअंतर्गत सेमी हायस्पीड नव्हे, तर बुलेट ट्रेन जाऊ शकेल अशा क्षमतेचे रूळ बसवणे गरजेचे आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनसाठी वेगळे रेल्वेमार्ग निर्माण करण्याची आवश्यकता राहणार नाही. आपल्याकडे प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या बाजूला, रेल्वेमार्गाच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध आहे. स्टेशन्स मागे घेण्याचा पर्याय आहे. बरोबर मध्यभागी मालगाड्यांसाठी जागा ठेवणेही शक्य आहे. मात्र हे केले जात नाही. लोहमार्गाची तात्पुरती डागडुजी करून त्यावरून १२०-१३० किमी प्रतितास इतक्या वेगाने गाडी चालवणे सुरक्षित असल्याचे राजरोस सांगितले जाते. यावेळी वरून हे सांगण्याचा दबावही समोर येतो. मात्र ताज्या रेल्वे अपघातासारख्या एखाद्या भयावह घटनेच्या रूपाने या तणावाची प्रचिती कशी होते, हे समजते.
रेल्वेने प्रवाशांच्या जीवाचे मोल आतातरी ओळखायला हवे. गाडी सुटते आणि पोहोचते अशा दोन्ही ठिकाणी गाडीची तपासणी आणि आवश्यक ती डागडुजी होत असते. मात्र एकीकडे तपासणी झाली आहे, असे समजून दुसरीकडे अत्यंत सुमार दर्जाची तपासणी केली जाते. म्हणजेच मेन्टेनन्स चांगला नसणे, हेही रेल्वेच्या अपघातांमागील एक महत्त्वाचे कारण आहे.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…