Sunday, July 7, 2024
Homeसाप्ताहिककोलाजपरिवर्तनाची नांदी : आयपीएल २०२३

परिवर्तनाची नांदी : आयपीएल २०२३

विशेष : उमेश कुलकर्णी

यंदाच्या आयपीएल २०२३ मुळे भारतीय क्रिकेटमध्ये परिवर्तनाची नांदी सुरू झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यात काही प्रतिभावान आणि तरुण खेळाडूंनी भारतीय क्रिकेटचे दरवाजे जोरदार ठोठावण्यास सुरुवात केली आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये गेल्या आठवड्यात रॉयल चॅलेंजर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होता. विराट कोहलीने रॉयल्सतर्फे खेळताना तडाखेबंद शतक काढले. बंगळूरुचे प्रेक्षक सातव्या आसमानात होते. पण त्यांना शुभमन गिल नावाचे वादळ घोंघावणार आहे, याची काहीच कल्पना नव्हती. पण ते आले आणि कोहलीचे शतक कवडीमोलाचे करून गेले. गिलनेही जबरदस्त शतक काढले आणि गुजरातला विजय मिळवून दिला. त्यामुळे कोहलीचा संघ बाहेर गेला. त्यानंतर कोहलीच्या चाहत्यांनी गिलला आणि त्याच्या बहिणीलाही घृणास्पदरीत्या ट्रोल केले. पण एक बाब त्यामुळे स्पष्ट झाली. भारतीय क्रिकेटमध्ये मशाल तरुणांच्या हातात देण्याची वेळ आली होती. कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा यांचा सुवर्णकाळ संपला आहे. त्याऐवजी यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रिंकू सिंग, तुषार देशपांडे यांच्या हातात क्रिकेटची धुरा सर्व तिन्ही फॉरमॅटमध्ये देण्याची वेळ आली आहे, हे स्पष्टपणे आयपीएल २०२३ने दाखवले आहे.

कोहलीचे युग सुरू झाले, तेव्हा सचिनचे युग संपले होते. तसेच आता गिलचे युग सुरू झाल्याबाबत सांगता येईल. त्यामुळे आता कोहलीने निवृत्त होण्याची वेळ आली नसली, त्याच्यात अजूनही तो दमखम बाकी आहे, पण त्याच्याकडे आता क्रिकेटची धुरा राहणार नाही, याचे संकेत मिळाले आहेत. आयपीएलच्या काही प्रतिभावान आणि तरुण खेळाडूंनी भारतीय क्रिकेटचे दरवाजे जोरदार ठोठावण्यास सुरुवात केली आहे आणि त्यांकडे दुर्लक्ष केले, तर निवड समितीसारखी करंटी तीच राहील. भविष्यात कोणत्या खेळाडूंचा संपूर्ण भारतीय क्रिकेटमध्ये बोलबाला राहील, याचा एक धांडोळा घेऊ या. आयपीएलच्या कामगिरीवर भारतीय संघात प्रवेश द्यायचा की नाही, यावर काही दिग्गज खेळाडू नाखूष असतात. पण टी-२० मध्येही तेच कौशल्य, टेंपरामेंट आणि पदन्यास यांची आवश्यकता असते ज्याची एकूणच क्रिकेटमध्ये असते. मग आयपीएल किंवा टी-२० मधील कामगिरीवरून देशाच्या संघात का स्थान मिळू नये, असा प्रश्न आहे.

१. शुभमन गिल : गिलची खेळण्याची शैली एकदम आक्रमक आहे आणि तो कोहलीपेक्षाही जास्त आक्रमक आहे. त्यामुळे दीर्घकाळापासून कोहलीचा नैसर्गिक वारसदार म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने ४ शतकांसह आठशेच्या वर धावा काढून ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. त्याने सर्वच संघ आणि सर्वच गोलंदाजांना आपल्या बॅटचा प्रसाद दिला आहे. त्याचे लेगकडे उचलून मारलेले षटकार आणि चौकार, तर डोळ्यांचे पारणे फेडणारे असतात. उजव्या हाताच्या फलंदाजाच्या फटक्यांचे अभिजात सौंदर्य त्याच्याकडे दिसते. तो नुसताच आडव्या बॅटने चेंडू चोपून काढणारा आडदांड फलंदाज नाही, तर कलात्मक फलंदाजही आहे. त्यामुळे त्याची फलंदाजी सौदर्यपूर्ण असते. गिलकडे भविष्यात भारतीय क्रिकेटची मशाल सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे. तो भारतीय संघात तर येईलच, पण दीर्घकाळपर्यंत तेथेच राहील. गिल काही दिवसांत २४ वर्षांचा होणार असून कोहलीकडे सूत्रे आली तेव्हा त्याच्यापेक्षा तो दोन वर्षांनी लहानच आहे. गिलने अगदी लहान वयात आपल्याकडे क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले. तो १५ वर्षांचा असतानाच त्याने एका अंडर १५ सामन्यात विजय मर्चंट ट्रॉफी स्पर्धेत पंजाबकडून ३५१ धावा केल्या होत्या. अंडर १९ मध्ये त्याला भारताचा उपकर्णधार नेमण्यात आले. पंजाबकडून त्याने सुरुवात केली आणि पाकिस्तानविरोधात त्याने उपांत्य सामन्यात नाबाद १०२ धावा केल्या, तेव्हा त्याच्यासाठी सारे दरवाजे सताड उघडले होते. गुजरातला तो आयपीएल २३ मध्ये अंतिम सामन्यात विजय मिळवून देऊ शकला नाही, कारण अर्थात पावसाचा व्यत्यय हेच होते. डकवर्थ लुईस नियमावलीने दिग्गज संघांना गारद केले आहे. एका सामन्यात दक्षिण आफ्रिकेला वेस्ट इंडिजविरोधात एका चेंडूत ९९ धावा कराव्या लागणार होत्या, अशी ही बिनडोक डकवर्थ लुईस नियमावली आहे. ते असो. पण गिल आज क्रिकेटचे वर्तमान आणि भविष्य दोन्ही आहे.

२. रिंकू सिंग : कोलकता नाईट रायडर्सचा संघ आयपीएल २३ गुणतक्त्यात सातवा राहिला. पण त्यांच्यासाठी रिंकू सिंग हा उदयोन्मुख तारा असून त्याला भारतीय संघात स्थान मिळणे जवळपास निश्चित आहे. रिंकू सिंग हा अत्यंत गरिबीतून वर आलेला आहे. त्याला तर झाडूपोछा करण्याचे काम त्याच्या वडिलांनी दिले होते. पण त्याने आईच्या पाठिंब्याने क्रिकेट किट मिळवले आणि गुपचूप सरावाला जाऊ लागला आणि आज तो राष्ट्रीय सितारा बनला आहे. गुजरात टायटन्सविरोधातील त्याचा एक सामना कायम स्मरणात राहील. राशिद खानने हॅटट्रिक घेऊन केकेआरला रोखले होते. शेवटच्या षटकात केकेआरला विजयासाठी २९ धावांची आवश्यकता होती. रिंकू स्ट्राईकवर आला आणि यश द्यालच्या उरलेल्या पाच चेंडूवर त्याने पाच षटकार लगावले. तो सामना केकेआरने अभूतपूर्वरीत्या जिंकला. रिंकू तेव्हापासून राष्ट्रीय तारा बनला. केकेआरने रिंकूला ५.५ दशलक्ष रुपयांना संघात ठेवून योग्य निर्णय घेतला. पुढील लिलावात त्याची बोली वाढेल. पण त्याचबरोबर त्याला राष्ट्रीय संघाचे दरवाजे आता मोकळे आहेत. तो लवकरच भारतीय राष्ट्रीय संघाकडून खेळताना दिसला, तर आश्चर्य वाटणार नाही. १५० च्या स्ट्राईक रेटने त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये ४७४ धावा ५९ च्या सरासरीने काढल्या आहेत.

३. यशस्वी जयस्वाल : गिलनंतर सर्वात चर्चित राहिलेला म्हणजे यशस्वी जायस्वाल. याची कहाणी तर फारच वेगळी आहे. हा १२व्या वर्षी उत्तर प्रदेशहून मुंबईला आला तो क्रिकेट खेळण्यासाठी. त्याने तंबूत रात्री काढल्या आणि दिवसा त्याने पैसा कमावण्यासाठी रस्त्यावर खाद्यपदार्थ विकले. त्याने सराव वानखेडे स्टेडियमवर सातत्याने केला. मैदानावर त्याला खेळताना एका स्थानिक प्रशिक्षकाने त्याला पाहिले आणि त्याचा वरच्या दिशेने प्रवास सुरू झाला. यंदाच्या वर्षी या २१ वर्षीय खेळाडूने आयपीएलमध्ये स्वतःच्या फलंदाजीने वादळच आणले. त्याचा संघ राजस्थान रॉयल्स प्ले ऑफ खेळू शकला नाही. पण यशस्वीने १६३ च्या स्ट्राईक रेटने ६२५ धावा केल्या. राजस्थान प्ले ऑफमध्ये गेला असता, तर त्याने गिलला जोरदार टक्कर दिली असती. पण त्याचा संघ बाद झाल्याने गिल पुढे निघून गेला. अनकॅप्ड खेळाडूने जास्तीत जास्त धावा करण्याचा विक्रम यशस्वीकडे आहे. त्याने १३ चेंडूंत सर्वात जलद अर्धशतकही काढले आहे आणि तोही विक्रम त्याच्या नावावर आहे.

४. जितेश शर्मा : पंजाब किंग्जचा यष्टीरक्षक फलंदाज असलेला जितेश शर्मा हाही भारतीय क्रिकेटचे आजचे वर्तमान आणि उद्याचे भविष्य आहे. खाली येऊन खेळताना त्याने यंदा आपल्या फलंदाजीच्या कौशल्याचे यथेच्छ प्रदर्शन केले आहे. ३०९ धावा करून तो तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च धावा करणारा खेळाडू ठरला आहे. काही अत्यंत महत्त्वाच्या खेळी त्याच्या नावावर आहेत. भारताच्या टी-२० संघाचा तो हिस्सा होता. पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पण आता त्याला ती मिळेल. त्याचे सातत्य आणि निर्भयता यामुळे ज्येष्ठ खेळाडूही त्याच्या पुन्हा समावेशास पाठिंबा देत आहेत. ६० प्रथमश्रेणीचे सामने त्याच्या नावावर आहेत आणि त्याने विदर्भकडून खेळताना मुश्ताक अली करंडक स्पर्धेत एकमेव शतक काढले आहे.

५. तुषार देशपांडे : गेल्या वर्षी केवळ दोन सामने खेळू शकलेल्या तुषार देशपांडे या उजव्या हाताच्या मध्यमगतीच्या गोलंदाजाने यंदा कहर केला आहे. यंदा त्याने चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना जोरदार प्रदर्शन केले आणि एमएस धोनीच्या चलाख नेतृत्वाखाली प्रतिस्पर्धी फलंदाजांना गारद केले. त्याच्याकडे उरात धडकी भरवणारा वेग नाही. पण त्याच्याकडे आपली क्षमता आणि योजनेप्रमाणे गोलंदाजी करण्याची अफाट क्षमता आहे. सुरुवातीला त्याचा फारसा परिणाम झाला नाही. पण धोनीने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि तो चेन्नईतर्फे आज सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. २८ वर्षीय तुषार हा आयपीएल २३ च्या सर्वोच्च पाच विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये आहे. काही महिन्यांनीच सुरू होणाऱ्या जागतिक चषक स्पर्धेत देशपांडे हा आदर्श गोलंदाज ठरेल.

आणखीही काही खेळाडू आहेत की, ज्यांनी यंदाच्या आयपीएलमध्ये जोरदार प्रदर्शन केले आहे. पण त्यात सातत्य राखले नाही. प्रतिभा किंवा क्षमता यात ते कुठेही कमी नाहीत. पण क्रिकेटसाठी जे सातत्य लागते त्याचा अभाव आहे. मुंबईचा तिलक वर्मा हा असा एक खेळाडू आहे. त्याने मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीला मधल्या फळीत बळ दिले आहे. त्याने आपल्या प्रतिभाशाली खेळाने तज्ज्ञांना त्याची दखल घेण्यास भाग पाडले आहे. ४५ च्या सरासरीने त्याने ९ सामन्यांत २७४ धावा काढल्या.

यंदाच्याच नव्हे, तर संपूर्ण आयपीएल स्पर्धेचे एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे आयपीएलमध्ये जोरदार प्रदर्शन करत असलेले हे युवा खेळाडू हे फार मोठ्या धनाढ्य परिवारातील नाही. काही तर अगदीच गरिबीतून वर आले आहेत. ध्रुव जुरेल, रिंकू सिंग, यशस्वी हे सारे अगदीच गरिबीतून आणि संघर्ष करत वर आले आहेत. पूर्वी केवळ धनाढ्य परिवारातूनच खेळाडू येत असत. कारण कित्येकांकडे तर क्रिकेटचे किटही परवडत नसे. आज तसे नाही. आज या गरीब पण प्रतिभाशाली खेळाडूंना मदत करणारे लोक, संस्था पुढे येत आहेत आणि त्यामुळे हे खेळाडू गरीब परिवारातील असूनही प्रतिभेच्या जोरावर क्रिकेटमध्ये स्थान मिळवू पाहात आहेत. एका अर्थाने प्रस्थापितांचे वर्चस्व क्रिकेटमध्ये होते. ते आता गेले आहे. आता केवळ प्रतिभाशाली आणि टॅलेंट हेच पाहिले जाते. त्यामुळे हा एक बदल सुखावह असा देशांतर्गत क्रिकेटमध्ये झाला आहे. तो हळूहळू झिरपत राष्ट्रीय क्रिकेटमध्ये होत आहे. हा एक चांगला परिणाम आयपीएलनेच दिला आहे. आयपीएलच्या नावाने कितीही बोटे मोडली तरीही प्रस्थापितांची दादागिरी संपवली आहे आणि खरे प्रतिभाशाली खेळाडू येत आहेत, ही खूप चांगली बाब आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -