समीर वानखेडेंच्या दाव्याने खळबळ
मुंबई: एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर वानखेडे यांच्या विरोधातील एफआयआर योग्यच असल्याचा दावा करत सीबीआयने मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. तसेच, सीबीआयने वानखेडेंच्या याचिकेवर आक्षेप घेत याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे समीर वानखेडे यांनी आपणास जीवे मारण्याची धमकी येत असल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी त्यांनी कुख्यात डॉन दाऊद याचे नाव घेतले आहे.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातून सोडून देण्यासाठी समीर वानखेडे यांनी २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुखकडे केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने वानखेडेंविरोधात एफआयआर दाखल केला असून तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी करीत वानखेडे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मात्र, ही याचिका योग्यच असल्याचे सीबीआयने कोर्टात म्हटले आहे. तर, दुसरीकडे मला डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं वानखेडे यांनी म्हटलं आहे. खोट्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांना ही धमकी आल्याची तक्रार मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली. तसेच, मला वा माझ्या कुटुंबीयांस काही झाल्यास जबाबदार कोण? असा सवालही वानखेडे त्यांनी उपस्थित केला.