Sunday, July 21, 2024

पर्यावरण…

गुलदस्ता : मृणालिनी कुलकर्णी

वेगाने होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हास हा माणसाच्या वर्तणुकीशी संबंधित आहे. मानवालाच नव्हे, तर सर्व प्राणीमात्रांना जगण्यासाठी पर्यावरण आवश्यक आहे. त्यामुळे पर्यावरणरक्षणासाठी प्रत्येकाने काम केले पाहिजे.

खूप वर्षांपूर्वी रामपूर गावात लोक शांतपणे आयुष्य जगत होते. शेतकरी शेतांत काम करायचे, स्त्रिया जंगलातून फळे गोळा करायचे, गुरे माळरानावर तासन् तास चरत, लोकसंख्या कमी, अन्नधान्य व जंगलामुळे पाणीही भरपूर. एके दिवशी शीतपेयांचा कारखाना बांधण्यासाठी जंगलातील झाडे तोडली गेली. गावकऱ्यांनी हरकत घेताच त्यांच्या तरुण मुलांना कारखान्यांत नोकरी दिली. कालांतराने युवक शेतातले, मेंढ्या पाळण्याचे काम विसरून गेले. स्त्रियांना फळे कमी मिळू लागली. उद्योगपतीने बाहेरून आणलेले अन्नधान्य महाग पडू लागले. कारखान्यांमुळे पाणी दूषित झाले. लोक आजारी पडू लागले म्हणून गावात दवाखाना आला. थोडक्यात गावाची अन्न, पाणी, आरोग्याची गुणवत्ता घसरली, वातावरण बदलले. ‘बीएनएचएस’ पुस्तकातील गोष्ट.

आज वेगाने होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हास हा माणसाच्या वर्तणुकीशी आणि दृष्टिकोनाशी संबंधित आहे. तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे नैसर्गिक संसाधनाचे अधिक शोषण होते. मानवाला नव्हे सर्व प्राणीमात्रांना जगण्यासाठी पर्यावरण आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आपण पर्यावरणावर, पर्यायाने निसर्गावर अवलंबून आहोत. पर्यावरण हा निसर्गाचाच भाग, मानव हे निसर्गाचे अपत्य, निसर्गाच्या कुशीतच वाढले. उंच वृक्षराजी, आकाशात उडणारे पक्षी पाहून माणसाचे स्वप्न विस्तारले. विकासाव्यतिरित्त वाढलेला हव्यास, वन्यजीव गुन्हेगारी, समाजाची बदललेली शैली, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, यातून पृथ्वीचे तापमान, हवामान, ऋतुमान बदलले, सर्व प्रकारच्या प्रदूषणाने माणसाचे आरोग्य बिघडले.

देशातील पर्यावरण निरोगी राहावे या उद्देशाने भारत सरकारने सन १९८० मध्ये पर्यावरण विभागाची स्थापना केली. ज्यांचे पुढे १९८५ मध्ये पर्यावरण आणि वनमंत्रालयात रूपांतर झाले. पर्यावरणीय समस्येतूनच पर्यावरणाच्या रक्षणासाठी, जागरूकतेसाठी, प्रश्न सोडविणाऱ्यास प्रोत्साहन देण्यासाठी, संयुक्त राष्ट्रांनी आंतराष्ट्रीय परिषदेत ५ जून दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून घोषित केला. त्यामुळे पर्यावरणीय प्रश्नांना व्यासपीठ मिळाले.

पर्यावरण दिनाची मुख्य उद्दिष्टे – 

१. मानवी कृतीमुळे पर्यावरणाची घटलेली गुणवत्ता वाढविणे.

२. नाश होत असलेल्या सजीवांना संरक्षण देणे.

३. वन्यजीव प्राणी, वनस्पती, जमीन, पाणी यांचे सुयोग्य व्यवस्थापन करणे.

४. पर्यावरण प्रशिक्षणाचा प्रसार करणे.

पर्यावरण म्हणजे जैविक आणि अजैविक घटकांनी मिळून तयार झालेला परिसर (वातावरण). वनस्पती, प्राणी हे जैविक घटक नैसर्गिक परिसरात जगताना, वाढताना तेथील जमीन, हवामान पाणी हे अजैविक घटक त्यांच्या जगण्यावर परिणाम करतात. म्हणूनच सजीवांचे जीवन हे पर्यावरणावर अवलंबून असते. जीवनसंघर्षात, उत्क्रांतीत जो पर्यावरणाशी जुळवून घेऊ शकतो, बदल स्वीकारतो, तोच तग धरतो.

गेल्या काही वर्षांत पर्यावरणाच्या ऱ्हासात प्लास्टिकचा फार मोठा वाटा आहे. प्लास्टिकच्या विघटनाला शेकडो वर्षे लागतात. मायक्रोप्लास्टिकमुळे दूषित झालेल्या माती, हवा, पाणी यांचे परिणाम दीर्घकालीन आहेत. याच प्लास्टिक प्रदूषणावर सामना करण्यासाठी ५ जून २०२३ची थीम “#Beat plastic pollution” . या वर्षीचा जागतिक पर्यावरण दिन पुन्हा पुन्हा सांगत आहे, प्लास्टिक वापरू नका. निदान जनतेनी रोजची भाजी, दूध, ब्रेड, फूल, आणतानाची प्लास्टिक पिशवी बंद करावी.

पर्यावरण रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यासाठी जास्तीत जास्त स्थानिक झाडे लावा नि जगवा. अनेकजण नि:स्वार्थीपणे हे काम करतात.
१. भक्तिपार्कमधील एक रहिवासी रवींद्र संपत स्वखर्चाने बागेतील किंवा इतरत्र पडलेल्या बिया रुजवून, जगलेले रोप बऱ्याच संस्थांना देतात.
२. साताऱ्यातील संध्या चौगुले यांचा हिरवाई प्रकल्प.
३. डॉ. संध्या प्रभू यांचा पश्चिम घाटावरील देवरायाचा अभ्यास.
४. कर्नाळाच्या अभयारण्यांत पक्ष्यांच्या १२० प्रजाती आहेत. या प्रणोती जोशीच्या अभ्यासामुळे तेथे रस्ता रुंदीकरण्यासाठी झाड तोडण्यास स्थगिती मिळाली.

पर्यावरण रक्षणासाठी काही गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष द्यावे.
१. आदिवासी आणि ग्रामीण लोकांना स्थानिक झाडांची, प्राण्यांच्या प्रजातीची असलेल्या माहितीचा पर्यावरण रक्षणांत उपयोग करावा.

२. पर्यावरणासंबंधित संस्थांच्या (सृष्टिज्ञान मुंबई) कार्यक्रमात सहभागी व्हावे, प्रशिक्षण घ्यावे.

३. रिसायकलकरिता येणारी उत्पादने वापरावीत.

४. कचऱ्याची विल्हेवाट अजूनही योग्य प्रकारे व्हावी.

५. मृत शरीरांना खाऊन परिसर स्वछ करणाऱ्या गिधाडांसाठी हरियाणात (पंचकुळी) एक प्रजनन केंद्र उघडले आहे.

६. सौरऊर्जेचा वापर वाढवावा. आपले अन्न, पाणी कुठून येते हे स्वतःलाच विचारावे.

७. छोट्या टेकड्या, वन्यजीवांसाठी राखीव क्षेत्र तयार करणे.

लहानपणापासून आपण परिसर, पर्यावरण, पर्यावरण शास्त्र शिकतो. बीएनएचएसच्या पुस्तकांत डॉ. भरूचा लिहितात, ‘शाश्वत जीवनपद्धत विकसित करणे म्हणजे नैसर्गिक संसाधनाचा वापर कसा करावा, या संसाधनाचे स्वरूप काय? त्यांचा अति किंवा गैरवापर कसा होतो आणि त्यांचे संवर्धन (वाचविण्याची प्रक्रिया) कसे करायचे? हे विद्यार्थ्यांना समजावून सांगणे. त्यांच्यात पर्यावरणीय जाणिवा आणि जागृती निर्माण करा. पर्यावरण शिक्षणाचे सर्वात उत्तम साधन, ‘निसर्गावर प्रेम करा’.

सिद्धी महाजन यांच्या ‘वसुंधरेच्या लेकी’ या लेखमालेत देशोदेशीच्या शाळकरी मुलींच्या पर्यावरण रक्षणाच्या कहाण्या आहेत, त्या वाचा.
१. मेलाती विजनेस या १८ वर्षांची इंडोनेशियन डच मुलीने प्लास्टिकवर बंदी आणण्यासाठी ‘बाय बाय प्लास्टिक बॅग्स’ ही संस्था काढली.
२. फेकून दिलेल्या प्लास्टिकमुळे होणारे सागरी प्रदूषण रोखण्यासाठी १३ वर्षांची नेदरलँडची लीली प्लँट जगभर काम करीत आहे.
३. रेश्मा कोसराजूच्या ‘ए आय’ मॉडेलमुळे कोणत्या जंगलांत वणवा लागण्याची सर्वाधिक शक्यता आहे याचे ९०% भाकीत होते. वणव्यामुळे प्राणी, पक्षी, कीटक यांचा अधिवासच नष्ट होतो.
४. ‘चिल्ड्रेन्स क्लायमेट प्राइज’ हा २०२० चा विभागून जागतिक पुरस्कार मिळवणारी १७ वर्षांची मुंबईची मुलगी आद्या जोशी. हिने ‘बायोपॉवर इंडेक्स’ म्हणजेच एखाद्या भागांत एखादी वनस्पती तिथल्या जैवविविधतेसाठी किती पोषक आहे हे सूचित करणारा निर्देशांक बनविला आहे. जनजागृतीसाठी शाळांमधून कार्यशाळा घेते.
५. अनेक जिल्ह्यांत, तालुक्यांत, पर्यावरण संवर्धन, समृद्धीसाठी कामे चालू आहेत.

पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदल यासाठी झटणाऱ्या संस्था, कार्यकर्ते, शास्त्रज्ञ, मूठभर सामान्य माणसे असूनही वाढत्या पर्यावरण असंतुलनामुळे प्रश्न वाढले आहेत. याचे कारण – १. माहितीची कमतरता, २. शालेय शिक्षणांत पर्यावरणाला दुय्यम स्थान. ३. सगळे समजते, पण अजूनही लोक गांभीर्याने मनावर घेत नाहीत. जागरूकता कुठेतरी कमी पडते. त्यासाठीच हा जागतिक पर्यावरण दिवस!

mbk1801@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -