मुंबईच्या पाणीपट्टीत वाढ होण्याची शक्यता!
मुंबई: महागाईने त्रस्त मुंबईकरांच्या खिशावर आता आणखी बोजा पडणार आहे. मुंबईच्या पाणीपट्टीत सहा ते सात टक्क्यांनी वाढ होणार आहे. येत्या १६ जूनपासून याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. पाणीपट्टी दरवाढीचा हा प्रस्ताव मुंबई महापालिका आयुक्तांकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. येत्या काही दिवसात यावर निर्णय होणे अपेक्षित आहे. मात्र, आगामी मुंबई महापालिका निवडणूक आणि प्रशासकाकडे असलेला कारभार पाहता दरवाढीचा निर्णयावर पुर्नविचार होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा आणि भातसा तलावातून उपसण्यात येणाऱ्या पाण्यासाठीचा खर्च, कर्मचाऱ्यांच्या आस्थापना खर्चात होत असलेली वाढ या सगळ्यांचा विचार करून मुंबईची पाणीपट्टी सहा ते सात टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. ही पाणीपट्टी प्रतिवर्षी आठ टक्क्यांनी वाढ करण्याचा अधिकार स्थायी समितीने याआधीच प्रशासनाला दिला आहे. त्यानुसार आता पाणीपट्टी दरात वाढ होणार आहे. प्रति हजार लीटर मागे २५ पैसे ते चार रुपयांची दरवाढ होणार आहे.
५ जूनला १६ तासांसाठी पाणीकपात
दरम्यान, जलवाहिन्याच्या कामासाठी सोमवारी म्हणजेच ५ जून २०२३ ला अंधेरी, जोगेश्वरी, सांताक्रूझ येथील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
अंधेरी पूर्व येथील महाकाली गुंफेजवळील बीडी सामंत मार्ग चौकात नवीन १५०० मिमी व्यासाची पाइपलाइन टाकण्याचे आणि १२०० मिमी पार्ले आउटलेटला जोडण्याचे काम सोमवारी करण्यात येणार आहे. जलवाहिनी जोडण्याचे काम सोमवारी सकाळी ८ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पालिकेच्या जल अभियांत्रिकी विभागामार्फत हाती घेण्यात येणार आहे. पाइपलाइन जोडणी व दुरुस्तीचे काम १६ तास चालणार आहे.