Thursday, July 25, 2024
Homeसाप्ताहिककोलाजपाहुनी वेलीवरची फुले...

पाहुनी वेलीवरची फुले…

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे

ग. दि. मा. जेव्हा एखाद्या विषयावर गाणे लिहीत तेव्हा ते ज्या सिनेमा किंवा नाटकातील पात्राच्या तोंडी दिले आहे त्याचा स्वभाव, त्याची त्यावेळची मन:स्थिती, त्याच्या समस्या, त्याचे आनंद हे सगळे लक्षात घेत. जशी परकायाप्रवेशाची विद्या असते तशी त्यांना ‘परमन-प्रवेशाची’ विद्या अवगत होती. गदिमा जेव्हा एखाद्या स्त्रीपात्रासाठी गाणे लिहीत तेव्हा ते त्या स्त्रीपात्राच्या मनात शिरून, त्याची खोली मोजून बाहेर आलेले असत. सांगितले नाही तर कळणारही नाही की गाणे कुणा कवीने लिहिले आहे की कवयित्रीने इतके ते हुबेहूब होऊन जाई! मात्र पूर्वी जसे संत अभंगाच्या शेवटी ‘तुका म्हणे’, ‘नामा म्हणे’ असे लिहून एक प्रकारे आपली सही करत तसे गदिमांचे गाणे, गुलजारचे गाणे, आरती प्रभूंचे गाणे कोणताही संदर्भ दिला नाही तरी सहज ओळखू येते. कोणत्याही दोन ओळी वाचल्या/ऐकल्या तरी संशय येतो हे गाणे गदिमांचे असणार आणि शोधाअंती ते खरेच ठरते!

गदिमांच्या लेखणीतून उतरलेली ‘गीत रामायण’ या महाकाव्याची मालिका हा पुणे आकाशवाणीच्या इतिहासातील एक मानाचा तुरा होता. पुणे केंद्राचे तत्कालीन संचालक सीताकांत लाड यांच्या प्रेरणेने गदीमांनी हे शिवधनुष्य उचलले आणि एखाद्या सुगरणीने खीर करताना शेवयांची लड तोडावी तसे क्षणात तोडून बाजूला टाकून दिले! पुणे आकाशवाणीवर ही अत्यंत लोकप्रिय झालेली मालिका १९५५ ते १९५६ असे वर्षभर चालू होती.

रामायणातील एकापेक्षा एक असलेल्या असंख्य पात्रांच्या भावभावना गदिमांनी लीलया व्यक्त केल्या होत्या. संगीतकार होते गदिमांचे परममित्र सुधीर फडके! त्यांना प्रभाकर जोग यांच्या वाद्यवृंदाने साथ दिली होती. त्यात होते सुरेश हळदणकर, केशवराव बडगे, अप्पा इनामदार, अण्णा जोशी इत्यादी.
‘रामाच्या जन्माने केवळ अयोध्येतच नव्हे तर अवघ्या सृष्टीत कसा आनंदीआनंद झाला’ हे श्रोत्याला जाणवण्यासाठी आधी त्यांना कौसल्यामातेचे अपत्यहिनतेचे दु:ख समजायला हवे होते. तिच्या मनातील व्याकुळता जाणवायला हवी होती. मग काय गदीमाच ते! जड देहातून बाहेर पडून सूक्ष्म देहाने ५ हजार वर्षे मागे जावून शिरले ना राणी कौशल्येला मनात!

खरे तर अपत्य नसल्याचे दु:ख राजा दशरथाच्या तिन्ही राण्यांना होते. राजा, राण्या, त्याचे मंत्री, राजगुरू आणि सर्व प्रजा दु:खी होती, चिंतेत होती. अयोद्ध्येच्या राज्याला वारस नाही ही गोष्ट सर्वांच्याच काळजीचा विषय होती. बिचाऱ्या कौसल्येला मात्र मूल नसल्याने आपले स्त्रीपणच अधुरे वाटत होते, अवघे जीवनच व्यर्थ वाटत होते.

या नाजूक, व्याकूळ मन:स्थितीचे वर्णन करणारे गदिमांचे गीत म्हणजे महाराणी कौसल्येचे एक स्वगत आहे. ती स्वत:शीच म्हणते-
उगा का काळीज माझे उले
पाहुनी वेलीवरची फुले…
सकाळच्या मंगलसमयी राणी कौसल्या राजमहालापुढील उद्यानात उभी आहे. वेगवेगळ्या वेलींवर सुंदर, रंगीबेरंगी फुले उमलली आहेत. मात्र ती फुले बघून राणीला आनंद वाटत नाही. ती स्वत:लाच विचारते, ‘आज मला आनंद व्हायच्या ऐवजी उदास का वाटते आहे बरे?’ माझ्या दोन्ही सवतीबद्दलसुद्धा मला कधी मत्सर वाटला नाही. मग या वेलींचे वैभव बघून मी खिन्न का होतीये?
कधी नव्हे ते मळले अंतर,
कधी न शिवला सवतीमत्सर,
आज का लतिका वैभव सले?
बागेत हरणे बागडत आहेत. त्यातील हरिणीच्या सोबत धडपडत वावरणारे नवजात पाडस बघून माझ्या डोळ्यांत पाणी का येतेय?
काय मना हे भलते धाडस,
तुला नावडे हरिणी पाडस.
पापणी वृथा भिजे का जले?
गाय आणि तिचे वासरू प्रेमाने फिरत आहेत. गाय आपल्या नैसर्गिक वात्सल्याने तिच्या वासराचे अंग चाटते आहे. ते पाहून मला राग का बरे येतोय? असे कौसल्या स्वत:लाच विचारते-
गोवत्सातील पाहुन भावा,
काय वाटतो तुजसी हेवा,
चिडे का मौन तरी आतले…
आपल्या मनातील दु:खाचे प्रतिबिंब माणसाला, विशेषत: संवेदनशील स्त्रीमनाला, सगळीकडेच दिसू लागते. फळाफुलांनी बहरलेल्या बागेत पक्षी आपल्या पिलांना चोचींनी दाणे भरवत आहेत. हे दृश्य बघूनही कौसल्या व्याकूळ होते. ‘आपल्या मनात कधी कुणाबद्दल मत्सर येत नाही. आपण अशा क्षुद्र भावनांना कधी थाराच दिला नाही, मग आज हे असे क्षुद्र विचार का घेरून टाकत आहेत?’ असे वाटून तिला स्वत:च्या भावना विपरीत वाटू लागतात.
ती म्हणते-
कुणी पक्षिणी पिला भरविते,
दृश्य तुला ते व्याकुळ करते.
काय हे विपरीत रे जाहले?
शेवटी कौसल्येला सत्य उमगते. ती सत्याला सामोरी जाते, कारण तिच्या लक्षात आपल्या दु:खाचे खरे कारण आलेले असते. आपण स्वत:पासूनच आपल्या अंतरीची वेदना लपवत होतो. ती उघड मान्य करायला काय हरकत आहे? असे ती स्वत:ला विचारते. स्त्रीला जगाच्या निर्माणकर्त्याने सृजनाचा वर दिलेला आहे. सृष्टीच्या निर्मितीत ती प्रत्यक्ष परमेश्वराची भागीदार आहे. तिच्याशिवाय जगाचे चिरंतनत्व देवही सिद्ध करू शकत नाही. तीच जर या परमोच्च अधिकाराचा वापर करू शकत नसेल, तर तिचे जगणे अधुरे आहे, व्यर्थ आहे.
स्वतः स्वतःशी कशास चोरी,
वात्सल्याविण अपूर्ण नारी,
कळाले सार्थक जन्मातले…
कौसल्येची आपल्या दैवाबाद्दल तक्रार आहे. देवाचा उल्लेख ती करत नसली तरी ती देवालाच विचारते आहे की साध्या दगडातूनसुद्धा मूर्ती साकारते रे! त्या कोरड्या पाषाणालाही काहीतरी घडवल्याचा, कुणाला तरी जन्म दिल्याचा, आनंद घेता येतो. मग ही कौसल्या काय त्या दगडाहूनसुद्धा तुला तुच्छ वाटते का?
मूर्त जन्मते पाषाणांतुन,
कौसल्या का हीन शिळेहुन,
विचारे मस्तक या व्यापिले…
शेवटी ती म्हणते, मी वयातीत तर झालेले नाहीच. पण वय वाढल्यामुळे जर हे दु:ख कायमचे पदराला येणार असेल तर मग हे आकाश तर आमच्या रघुकुलापेक्षा कितीतरी जुने आहे, वृद्ध आहे! त्यात तर रोज लाखो तारका जन्माला येतात आणि लाखो तारे निखळताना दिसतात. मग माझेच जीवन व्यर्थ का?
गगन आम्हाहूनी वृद्ध नाही का?
त्यांत जन्मती किती तारका,
अकारण जीवन हे वाटले…
आज जरी काळ बदलला असला, माणसाने पाश्चिमात्य औद्योगिक जगाच्या प्रभावाखाली आपल्या नैसर्गिक भावनांची आहुती दिली असली, स्त्रीचे स्वाभाविक व्यक्तिमत्त्व आणि पुरुषाचे व्यक्तिमत्त्व यातील भेद नष्ट करण्यात औद्योगिक संस्कृतीला यश आले असले तरी माणसाच्या खऱ्याखुऱ्या अंतर्मनाचे असे निरागस दर्शन सुखदच म्हणायला हवे ना?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -