- टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल
हेमंत ढोमे हा लेखक, अभिनेता, दिग्दर्शक अशा तिन्ही भूमिका लीलया पेलणारा आहे. मिळेल त्या संधीच सोनं करणारा आहे. गणराज प्रोडक्शन निर्मित व श्रेयस जाधव दिग्दर्शित ‘फकाट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आलेला आहे. या चित्रपटात सलीम नावाचं मुस्लीम पात्र त्याने साकारलं आहे. शिक्रापूर नावाच्या गावात राहणारा, लहानपणापासून मराठी वातावरणात वाढणारा असा सलीम आहे. ग्रामीण भागात ज्याप्रमाणे हिंदू-मुस्लीम एकमेकांच्या सणाला एकमेकांच्या घरी जातात, त्याप्रमाणे सलीमचे पात्र या चित्रपटात पाहायला मिळेल.
आपल्या कुटुंबाबद्दल, स्वतःबद्दल काही महत्त्वाकांक्षा नाही. ‘फकाट’ म्हणजे अशी मानसिक स्थिती असते जिथे ती व्यक्ती स्वतःच्या धुंदीत असते. त्या व्यक्तीला काहीही सुचत नाही, कळत नाही. म्हणजे नशा केलेली माणसे जशी वागतील, तशी ही माणसे वागत असतात. हेमंत आणि सुयोगच जे पात्र आहे, ते फकाट पद्धतीचं आहे. त्यांच्याभोवती हा चित्रपट फिरतो. या दोघांच्या हाती एल.ओ.सी. नावाची सिक्रेट गोष्ट लागते. त्यानंतर ते त्यासाठी किंवा पैशासाठी जे काही करतात, अशी चित्रपटाची गोष्ट आहे. मुळात हे विनोदी पात्र साकारायला हेमंतला खूप आवडलं, असा हा धमाल विनोदी चित्रपट आहे.
कर्जतमधील अभिनव विद्यालयामध्ये हेमंतच शालेय शिक्षण झाले. शाळेमध्ये असताना व्यसनमुक्तीच्या जनजागृतीसाठी त्याने पथनाट्य केले. पुण्यातील गरवारे महाविद्यालयात असताना ‘मर्मभेद’ नावाची एकाकीका हेमंतने लिहिली. त्याच दिग्दर्शन क्षितिज पटवर्धन यांनी केले होते. ती हेमंतची पहिली आंतरमहाविद्यालयीन एकांकिका होय.
हेमंतच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट म्हणजे त्याने पुण्याच्या गरवारे महाविद्यालयात असताना लिहिलेली ‘डायरी ऑफ अण्णा फाटक’ ही एकांकिका होय. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत, सवाई करंडक स्पर्धेत त्या एकांकिकेला सर्व बक्षिसे मिळाली. या एकांकिकेमध्ये अण्णा फाटक या सर्वसामान्य माणसाची डायरी असते. त्या माणसाला आपण जे जगलो त्याऐवजी जर वेगळ्या पद्धतीने जगलो असतो, तर खूप मजा आली असती, असे वाटते व ते तो त्या डायरीत मोठ्या रंजक पद्धतीने मांडतो. मग त्याच्या आयुष्यातील जे खरे प्रसंग आहे, ते प्रसंग तो तसे न सांगता रंगवून सांगतो. शेवटी त्याच्या लक्षात येते की, जसे आपण जगलो आहे, तसेच जगायला हवे होते.
त्यानंतरचा टर्निंग पॉइंट म्हणजे हेमंतने लिहिलेला ‘लूज कंट्रोल’ हा दीर्घांक होय. त्याचे दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी यांनी केले होते. त्यामध्ये हेमंत, निपुण धर्माधिकारी, अमेय वाघ हे कलाकार होते. त्या दीर्घांकाला चांगली ओळख मिळाली. त्याचे प्रयोग पृथ्वी थिएटर, एन.सी.पी.ए., आविष्कार, दिल्ली, बंगलोर येथे करण्यात आले. प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांनी त्या दीर्घांकाला पहिल्या पाचमध्ये स्थान दिले होते. त्यानंतर हेमंतने एक व्यावसायिक नाटक केलं होत, ज्याचं नाव होतं ‘नवा गडी नवं राज्य’ यामध्ये अभिनेत्री प्रिया बापट व अभिनेता उमेश कामत होता. या नाटकाचे लेखन क्षितिज पटवर्धन यांनी केले होते, तर दिग्दर्शन समीर विध्वंस यांनी केले होते.
त्यानंतर हेमंतच्या करिअरमधला टर्निंग पॉइंट म्हणजे त्याने केलेली पहिली मालिका ‘शुभं करोति.’ या मालिकेचे दिग्दर्शन संगीत कुलकर्णी यांनी केले होते. मालिकेत काम करण्याविषयी हेमंत थोडा घाबरायचा कारण ते त्याला जमेल की नाही असे वाटायचे; परंतु चांगला दिग्दर्शक लाभल्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला.
हेमंतचा पुढचा टर्निंग पॉइंट म्हणजे त्याने लिहिलेला व अभिनय केलेला चित्रपट. तो चित्रपट होता ‘क्षणभर विश्रांती.’ त्याच दिग्दर्शन सचित पाटील यांनी केलं होतं. त्यामध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, हेमंत ढोमे, सोनाली कुलकर्णी, मनवा नाईक, पूजा सावंत, कादंबरी कदम, शुभांगी गोखले अशी बरीच मंडळी या चित्रपटामध्ये होती.
त्यानंतर हेमंतचा महत्त्वाचा टर्निंग पॉइंट म्हणजे त्याला मिळालेली दिग्दर्शनाची संधी. गणराज प्रोडक्शनचा, ‘बघतोस काय मुजरा कर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंतने केले. गडकिल्ले संवर्धन या महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट होता. गडकिल्ले संवर्धन करणाऱ्या लोकांनी व राजकीय नेत्यांनी या चित्रपटाचे कौतुक केले. आजही या चित्रपटातील गाणी प्रत्येक शिवजयंतीला वाजतात. या चित्रपटाचे सीन, व्हीडिओ प्रत्येक शिवजयंतीला लोक पाहतात. तो चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांवर नव्हता, तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर होता. त्यामुळे तो चित्रपट नवीन होता व प्रेक्षकांनादेखील तो चित्रपट जवळचा वाटला. त्यामध्ये जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, विक्रम गोखले, अनंत जोग, नेहा जोशी व खलनायकाच्या भूमिकेत हेमंत ढोमे होते.
त्यानंतर हेमंतची अभिनयाची व दिग्दर्शनाची घौडदौड सुरूच राहिली. त्यानंतर ‘येरे येरे पैसा २’, ‘सातारचा सलमान’, ‘झिम्मा’ हे चित्रपट हेमंतने केले. सध्या ‘झिम्मा २’ चित्रपटाच्या कामात तो व्यस्त आहे.