धाराशिव : ओडिशामध्ये तीन ट्रेनच्या झालेल्या भीषण अपघाताने देश हादरून गेला असतानाच महाराष्ट्रातही झालेल्या दोन अपघातांनी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.
मध्यरात्री एकच्या सुमारास दुसऱ्या टप्प्यातील समृद्धी महामार्गावर पहिला भीषण अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू तर अन्य दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर आज सकाळी धाराशिवमध्ये प्रवाशांनी भरलेली बस पलटी झाली. त्यात २६ प्रवासी जखमी झाले आहेत.
चालकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्यांना बार्शी येथे हलवण्यात आले आहे. तर इतर सर्वांवर परांडा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धाराशिव जिल्ह्यातल्या सोनगिरी चाकूला येथे ही दुर्घटना झाली. परांडा डेपोची बस धाराशिवला येत होती. मात्र, चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस पलटी झाली. जखमींना स्थानिकांच्या मदतीने परांडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.