Sunday, March 23, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्सधक्कादायक! चीनमध्ये बसून लाखोंची फसवणूक...

धक्कादायक! चीनमध्ये बसून लाखोंची फसवणूक…

  • गोलमाल : महेश पांचाळ

मुंबईतील एका महिलेला मोबाइलवर अचानक व्हीडिओ कॉल येतो. समोरून पोलीस गणवेशातील व्यक्ती आपल्या नावाचे कुरियर दाखवते. ते कुरियरचे पाकीट तीच व्यक्ती फोडून दाखवते. त्यात छोटे पाकीट असते आणि त्या पाकिटात ड्रग्जसारखी वस्तू दिसते. तुमचा या ड्रग्जच्या व्यवसायाशी संबंध काय? असा प्रश्न पोलिसांच्या वेशातील व्यक्तींकडून त्या महिलेला विचारला जातो. त्या महिलेला नक्की काय चालले आहे, याचा थांगपत्ता लागत नाही. ती अक्षरश: घाबरून जाते.

आधी धमकी आणि काही मिनिटांमध्ये प्रकरण मिटविण्याचा स्वर त्या कथित पोलिसांकडून ऐकू येतो. बँक खात्याचा तपशील विचारला जातो आणि पाच मिनिटांमध्ये खात्यातील ५० हजार रुपये ट्रान्सफर झालेले दिसतात. हा प्रकार धक्कादायक असतो. काय चालले आहे हे सदविवेकबुद्धीने विचार करण्याअगोदर आपली फसवणूक झाल्याची जाणीव त्या महिलेला होते आणि नक्की ते पोलीस कुठले असावेत? याची खातरजमा व्हावी यासाठी शेवटी ती मुंबई पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेते आणि शेवटी बांगूर नगर पोलीस ठाणे गाठते.

‘घंटो का काम मिनिटोमे…’ अशी एक टिव्हीवरील जाहिरातील वाक्य आपण ऐकली आहेत; परंतु पाच मिनिटांच्या आत हजारो रुपये खात्यातून वळते कसे केले जात आहेत, अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी मुंबईसह राज्याच्या अनेक शहरांतील पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. त्या अनुषंगाने मुंबईतील बांगूर नगर पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी एक पथक तयार केले. त्यासाठी सायबर पोलिसांची मदत घेतली. तपास करताना या प्रकरणातील एक धक्कादायक माहिती समजली ती म्हणजे या टोळीचा म्होरक्या हा चीनमध्ये वास्तव्यास आहे. त्यामुळे त्याच्या महाराष्ट्रातील इतर साथीदारांना पकडण्याची व्यूहरचना पोलिसांनी आखली गेली होती. त्यानुसार, व्हॉट्सअॅप आणि स्काईप अॅपच्या माध्यमातून बहुतांश महिलांना टार्गेट करून त्यांची पाच मिनिटांत बँक खाते रिकामे करणाऱ्या आणि चीनमध्ये बसून मुंबई पोलिसांच्या नावाने ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा शोध घेण्यात सुमारे दीड महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर मुंबईतील बांगूर नगर पोलिसांना यश आले. यातील पाच जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. संजय मंडळ, अनिमेश वैद्य, महेंद्र रोकडे, मुकेश दिवे यांच्यासह मुख्य आरोपीचे श्रीनिवास राव दाडी (वय ४९ वर्षे) हे सध्या कोठडीत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, पुणे शहर, हैदराबाद, सायबराबाद, बंगळूरु, दिल्ली, कोलकाता आणि इतर अनेक शहरांमध्ये अशा ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आरोपींकडून आतापर्यत दीड कोटी रुपये जप्त केले असून संबंधितांची ४० बँक खाती जप्त करण्यात आली आहेत.पॅनकार्ड, डेबिट कार्ड, ओळखपत्र, बँक पासबुक, लॅपटॉप, मोबाइल फोन, स्टॅम्प रबर असे अनेक साहित्यही जप्त केले गेले आहे. मुख्य आरोपी दाडी हा हैदराबाद, तेलंगणा राज्यातील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला विशाखापट्टणम येथील पंचतारांकित नोव्होटेल हॉटेलमधून अटक केली होती, तर अन्य आरोपींना कोलकाता, मुंबई आणि विशाखापट्टणम येथून ताब्यात घेण्यात आले. या दाडीने डुप्लिकेट पोलीस ओळखपत्र तयार केली होती. तो स्वतःला मुंबई पोलिसांचे अधिकारी सांगल्याचे सांगून महिलांना धमकावत होता. त्यासाठी त्यांनी अनेक वेळा पोलिसांचा युनिफॉर्म घालून व्हीडिओ कॉल केले होते.

काय आहे चीनचे कनेक्शन…

पोलिसांच्या तपासात मुख्य आरोपी दाडीने सांगितले की, त्यांचा मास्टरमाइंड चीनमध्ये बसला आहे. त्याच्या इशाऱ्यावर लोक भारतातील विविध राज्यांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने ऑनलाइन फसवणूक केली जाते. यात मुख्य आरोपी श्रीनिवास सुब्बाराव दाडी याचा अल्पवयीन मुलाचा सहभाग आहे. मात्र तो सध्या चीनमध्ये आहे.टोळीचा मास्टरमाइंट चीनमध्ये बसला असून तेथून तो सूत्र हलवत असल्याचे समजल्यानंतर मुंबई पोलिसांनी केंद्र सरकारची मदत घेतली आहे. सध्या बांगूर नगर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून आता संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून त्यांच्या अन्य साथीदारांचाही शोध घेत आहेत.

तात्पर्य : उद्या रस्त्यात अडवून तुम्हाला कोणीही धमकावेल. तो पोलीस वेशातील असू शकतो; परंतु पोलिसांचा बँक खात्याशी तसा थेट संबंध येत नाही. त्यामुळे आपली बँकविषयक खासगी माहिती कुणाला देऊ नका. नाही, तर या महिलांसारखी तुमचीही फसगत होऊ शकते.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -