
छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नेहमीच अतर्क्य विधाने करत असतात. मात्र आता तर त्यांनी आक्षेपार्ह कृतीदेखील केली आहे. शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय शिरसाट व खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव ऐकताच राऊत पत्रकारांसमोर थुंकले होते. त्यामुळे शिंदे गट आक्रमक झाला असून कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संजय राऊतांविरोधात निदर्शने सुरु केली आहेत. त्यातच संजय शिरसाट यांनी राऊतांवर खळबळजनक आरोप केला आहे.
आज पत्रकार परिषदेत संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. राऊतांना आता फक्त बोलून चालणार नाही, तर करून दाखवावे लागणार आहे, असे ते म्हणाले. संजय राऊतांना एका महिलेपासून मूल आहे आणि त्या महिलेला राऊतांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती, असा गंभीर आरोप संजय शिरसाटांनी यावेळी केला. संजय शिरसाट म्हणाले, ज्या महिलेला संजय राऊतांपासून मूल झाले आहे, त्या माऊलीचे नाव मी घेऊ इच्छित नाही. मात्र, हे प्रकरण जगजाहीर आहे. संजय राऊतांनी या महिलेला अश्लील शिवीगाळ केली होती. ती क्लीप सर्वत्र व्हायरल झाली आहे. माझ्याकडेही ती क्लीप आहे आणि हे प्रकरण लवकरच समोर आणणार आहे.
संजय राऊत हे गाडीखाली असलेल्या कुत्र्यासारखे
संजय शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरे व संजय राऊतांनीच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली आहे. मविआ सरकार असताना अडीच वर्षे त्यांनी काहीच केले नाही. आम्ही ती चूक दुरुस्त केली तर आता टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरे काहीच काम राहिलेले नाही. संजय राऊत हे गाडीखाली असलेल्या कुत्र्यासारखे आहेत. त्यांना वाटते गाडी आपणच चालवतो. पण, तसे नसते. संजय राऊत आता ठाकरे गट संपवण्याचं काम परफेक्टपणे करत आहेत. त्यांची भाषा अत्यंत खालच्या पातळीवरील आहे. त्यांनी एक तरी निवडणूक लढवली आहे का? येत्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनताच त्यांना योग्य उत्तर देईल.
पत्रा चाळींचे सर्वेक्षणही करणार
याशिवाय मंगळवारी मी पत्रा चाळींचे सर्वेक्षणही करणार आहे. संजय राऊतांनी नेमका काय पत्राचाळ घोटाळा केला आहे, हे मी जनतेसमोर आणणार आहे. या प्रकरणांचा तपास होऊन लवकरच संजय राऊत पुन्हा तुरुंगात जातील, असेही संजय शिरसाट यावेळी म्हणाले.