
बालासोर : ओडिशातील बालासोर जिल्ह्यात बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या तीन गाड्यांच्या भीषण अपघातात आतापर्यंत २८८ जण मरण पावले असून, ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान मोदी बालासोरमध्ये दाखल झाले आहेत.
अपघातग्रस्तांना वाचवण्यासाठी अनेक मदतनीस, स्वयंसेवी संस्था घटनास्थळावर धावपळ करत आहेत. या अत्यंत भीषण अपघातामुळे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रेल्वेच्या बोगी एकावर एक आदळल्याने त्यांचे कटिंग करणे कठीण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्व मदतकार्याचा आढावा घेणार आहेत. तसेच कटक रुग्णालयात जाऊन ते जखमींची विचारपूस करणार आहेत. तसेच ओडिशा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची पंतप्रधान भेट घेऊन त्यांच्याशी बातचीच करणार आहेत.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकाळीच या घटनास्थळाची पाहणी केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील आपल्या कार्यालयात या अपघातामागची कारणे काय असावीत यासंबंधी एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदी थेट ओडिसामध्ये पोहोचले.