Tuesday, April 22, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्स‘सुंदर मी होणार’ नाटक मी पाहणार

‘सुंदर मी होणार’ नाटक मी पाहणार

  • नंदकुमार पाटील : कर्टन प्लीज

जुनी नाटके नव्याने पुनर्जीवित करायची म्हणजे आजच्या स्थितीत थोडेसे धाडसाचे म्हणावे लागेल. ‘प्रेक्षक येतील का?’ या एका प्रश्नाने बरेचसे निर्माते नाटकाची निर्मिती करण्याचे टाळतात. यातूनही सुधीर भट या निर्मात्याने अनेक जुन्या नाटकाची निर्मिती केली होती. त्यात त्यांना यशही आले होते. अभिनेते सुनील बर्वे यांनी ठरवून काही जुन्या नाटकाचे प्रयोग केले होते. त्यात त्यांना इतका प्रतिसाद मिळाला की प्रेक्षकांच्या आग्रहास्तव काही प्रयोगाची मर्यादा त्यांनी वाढवली होती. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीच्या नाटकाची पुन्हा निर्मिती करायची म्हणजे लेखकाचे श्रेष्ठत्व, त्यावेळी काम केलेल्या कलाकारांचे योगदान या साऱ्या गोष्टीतून तुलनात्मक चर्चा पुढे येते. नाटकाच्या काळाप्रमाणे रंगभूषा, वेशभूषा ही आलीच. या साऱ्या गोष्टी टाळण्यासाठी निर्माते साधारण वीस-पंचवीस वर्षांपूर्वी गाजलेलेली, माहितीतले नाटके रंगमंचावर आणणे पसंत करतात. चारचौघी, तू तू मैं मैं ही अलीकडे आलेली नाटके त्याचे उदाहरण सांगता येईल. अशा स्थितीत संतोष रोकडे यांनी आपल्या निर्मितीत शुभंकर करंडे यांच्या दिग्दर्शनात पु. ल. देशपांडे लिखित ‘सुंदर मी होणार’ हे नाटक व्यावसायिक रंगमंचावर आणले आहे. त्यासाठी गोट्या सावंत यांच्या व्ही. आर. प्राॅडक्शन, संकल्प फाऊंडेशन आणि युनिट ग्रुप्स हे निर्मितीत सहभागी झाले आहेत. अलीकडे जुनी नाटके नव्याने रंगमंचावर आणायची म्हणजे नाटकाची रंगावृती पूर्णपणे बदलली जाते. नाटक आजचे वाटावे म्हणून साऱ्या गोष्टी बदलल्या जातात. त्यातील संदर्भ आजच्या काळातील वाटावे यासाठी लेखक आपले कौशल्य दाखवून त्यात बदल करीत असतो. याचा अर्थ असे केल्याने सर्वच नाटके यशस्वी होतात, असे नाही.

‘सुंदर मी होणार’ या नाटकाचा विषय हा भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा आहे. भारतातल्या राजघराण्यांच्या संस्था लोकशाही कारभारात विलिनीकरण झाल्यानंतर ज्या राजे, महाराजांचे राजवाडे होते, त्या सर्वांना या बदलाचा जबरदस्त फटका बसला होता. काहींनी काळाप्रमाणे स्वतःला बदलून घेतले, तर काही जण सत्ता नसताना सुद्धा त्याच तोऱ्यात, अवेशात राहणे पसंत केले होते. त्याचा परिणाम स्वतःबरोबर कुटुंबावरही झालेला आहे. पु. ल. देशपांडे यांनी या कथेत भारतीय वातावरण आणले असले तरी या कथेची प्रेरणा त्यांना रॉबर्ट आणि एलिझाबेथ ब्राआयंग यांच्या आत्मचरित्रातून भावली. काही दशकापूर्वी नामवंत कलाकारांना घेऊन या नाटकाचे प्रयोग भट यांनी केले होते. परदेशातल्या मराठी रंगकर्मीना नाटक करायचे झाले, तर जी जुनी नाटके करावीशी वाटतात, यात ‘सुंदर मी होणार’ हे एक नाटक आहे.

पु. ल. देशपांडे यांची जी आजरामर नाट्यकृती आहेत. त्यात या नाटकाचे नाव द्यावे लागेल. नाटकाचे शिर्षक ‘सुंदर मी होणार’ आहे, म्हटल्यानंतर लेखकाला व्यक्तीच्या देखणेपणाविषयी काही सांगायचे आहे, असे आपल्याला वाटेल पण प्रत्यक्षात माणसाचे मन सुंदर असेल तर सानिध्यात येणाऱ्या माणसाचे मन सुद्धा आनंदी आणि प्रसन्न होते. असा साधा सरळ संदेश या नाटकातून दिलेला आहे. भारतातील राजघराणेची संस्थानीके पूर्णपणे खालसा झालेली आहे. पण या नाटकातल्या महाराजांना ते मान्य नाही. त्यांच्या नाहक तोऱ्याचा, खोट्या अवसानाचा त्यांच्या चार मुलांवर परिणाम झालेला आहे. त्यांना राजवाड्यात बंदिस्त ठेवलेले आहे. होणाऱ्या कोंडमारामुळे घरातील सर्वच कुटुंब सदस्य व्यथित झालेली आहेत. चर्चेमुळे मनाचा उद्रेक होतो. प्रत्येकजण आपल्या भावना व्यक्त करतो आणि यात जगण्याचा मार्ग सापडतो. बाहेर पडायचे म्हणजे विरोधाला सामोरे गेले पाहिजे की, वृत्ती प्रत्येकामध्ये बळावते आणि महाराज एकाएकी पडतात. मन सुंदर असेल, तर सहजीवन हीच सुंदर होते. दीदी, राजेंद्र, प्रताप, बेबी, सुरेश, नेमका, संजय, डॉक्टर असा नाटकात मोठा परिवार आहे. या सर्वांचे राहणे, येणे-जाणे या राजवाड्यात होत असले तरी विवेचना, तणाव प्रत्येकाची वेगवेगळी आहे. पु. ल. देशपांडे यांनी प्रत्येक व्यक्तिमत्त्वाला कथेत आणून नाटक प्रभावी लिहिले आहे. जुन्या प्रेक्षकांना हे नाटक पुन्हा पाहायला भाग पाडेल, तर नव्या प्रेक्षकांना विशेषत: युवा प्रेक्षकांना या नाटकाच्या निमित्ताने अलंकारिक, मर्मज्ञ, भाषेची शब्द रूपसंपदा सारे काही इथे अनुभवता येईल.

सांगायचं म्हणजे पु. ल. देशपांडे यांचे नाटक म्हटल्यानंतर त्यांच्या शब्दप्रभुत्वामुळे बऱ्याच गोष्टींचा विसर पडतो अर्थात जे लिहिले आहे, ते तसेच्या तसे सादर झाले पाहिजे ही या नाटकाची अट आहे. तेव्हा कुठे सारे प्रसंग, संवाद मनात घर करतात. नाटक प्रभावी व्हायला लागते. यातल्या कलाकारांनी ते आव्हान स्वीकारले आहे. कथेला, विषयाला ज्या व्यक्तिमत्त्वाची आवश्यकता आहे तसे काहीसे पात्र दिग्दर्शकाने निवडलेले आहेत आणि कलाकारांनी सुद्धा निवड सार्थकी ठरवलेली आहे. पु. ल. देशपांडे यांचे लेखन ही या नाटकाची जमेची बाजू आहे. आणखीन एक प्रेक्षकांना दिलासा देणारी बाजू आहे. ती म्हणजे मालिका, चित्रपट, नाटक या तिन्ही क्षेत्रांत स्वतःचे प्रस्थ निर्माण करणारे दोन ज्येष्ठ कलाकार या नवकलाकारांसोबत काम करीत आहेत. अजित केळकर यांनी भावना प्रधान, सहृदयी डॉक्टरची भूमिका साकार केलेली आहे. डॉक्टरी पेशा, त्यातले ममत्व, राजघराण्याचा शिष्टाचार सारे काही त्यांच्या भूमिकेत कदर करावे असे होते, तर नंदू गाडगीळ आपल्या राजबिंड्या व्यक्तिमत्त्वसह महाराजांच्या भूमिकेत दिसतात. रुबाबदार, भारदस्त आवाज, एककल्लीपणा सारे काही भूमिकेत मनोभावे आणतात. दीदी साकार करणाऱ्या प्राची सहस्त्रबुद्धे, तन्मयी वैद्य (बेबी), संजना बाळकृष्ण पाटील (मेनका), शुभम जोशी (सुरेश) यांच्या भूमिकेचे कौतुक करावे लागेल. दिग्दर्शकांने सांगितले, ते त्यांनी केले असले तरी भूमिकेत जीव ओतणे हे आलेच. ते काम या सर्वांनी केलेले आहे. त्यामुळे नाटक मनोरंजन करते पण हे कलाकार सुद्धा आपल्या गुणांमुळे छान लक्षात राहतात. याशिवाय सुमित चौधरी, आदेश वढावकर, शुभंकर करंडे, संबुद्ध मौर्य यांचा यात कलाकार म्हणून सहभाग आहे. नीलमाधव मोहपात्रा (संगीत), अनिरुद्ध नारायणकर (प्रकाशयोजना), उल्लेश खंदारे (रंगभूषा), मीनल गांगुर्डे, स्नेहा खुटवडे (केशभूषा) शुभम जोशी (वेशभूषा), यश मोडक (नेपथ्य) या सर्वांनी नाटक प्रभावी होण्याच्या दृष्टीने घेतलेली मेहनत दाद देणारी आहे. तेव्हा प्रेक्षकहो, ‘सुंदर मी होणार’ नाटक मी पाहणार, असा आग्रह धरायला काय हरकत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -