Saturday, August 30, 2025

समृद्धी महामार्गावरील वैजापूर टोलच्या ४० कर्मचाऱ्यांचे वेतन चार महिने थकीत

समृद्धी महामार्गावरील वैजापूर टोलच्या ४० कर्मचाऱ्यांचे वेतन चार महिने थकीत

कर्मचाऱ्यांचा कामावर हजर होण्यास नकार

वैजापूर: समृद्धी महामार्गावरील वैजापूरच्या जांबरगावाच्या टोल प्लाझावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन ते चार महिन्यांचे वेतन थकल्याने कामावर हजर राहण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हा टोल प्लाझा काल रात्री बंद होता.

समृद्धी महामार्गावरील वैजापूरच्या जांबरगावाच्या टोल प्लाझावर काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांचे वेतन दोन तर काहींचे चार महिन्यापासून रखडले आहे. तसेच कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून देण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या सततच्या त्रासाला कंटाळून आणि वेतन मिळत नसल्याने गुरुवारी रात्री ४० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्यास नकार दिला.

यानंतर येथे गाड्यांच्या रांगा लागल्या. शेवटी दुसऱ्या शिफ्टमधील इतर कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले आणि टोल सुरु करण्यात आले. मात्र यासाठी बराच वेळ लागला. विशेष म्हणजे वेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद करण्याची ही दीड महिन्यातील तिसरी वेळ आहे.

विशेष म्हणजे यासोबतच टोल प्लाझावर जेवण पुरवणाऱ्या आणि चार चाकी वाहने पुरवणाऱ्या संस्थेचे देखील बिल थकल्याने काही दिवसांपूर्वी त्यांनीही टोल प्लाझा बंद पाडला होता. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करावा लागला. दरम्यान, त्यानंतर देखील एकदा हाच टोल प्लाझा वेतनाच्या मागणीसाठी बंद करण्यात आला. तर आता ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे संबंधित कंपनीचा भोंगळ कारभार सतत समोर येत आहे.

Comments
Add Comment