मुंबई : महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची महिन्याभरातच बदली करण्यात आली आहे. मुंबईत मंत्रालयातील मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. याशिवाय सुधाकर शिंदे यांना मुंबईचे अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून कार्यभार सोपवण्यात आला आहे. मुंढेंसह २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलींचे आदेश काढण्यात आले आहेत.
तुकाराम मुंढे यांना जेमतेम महिन्याभरापूर्वीच कृषी व पशुसंवर्धन खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. खरं तर त्यापूर्वीच्या बदलीनंतर अनेक महिने मुंढेंना नियुक्ती मिळाली नव्हती. मात्र राज्य शासनाने तीन मे रोजी दहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते, त्यात तुकाराम मुंढेंच्या नावाचाही समावेश होता. त्यामुळे मुंढेंचा अनेक महिन्यांचा वनवास संपल्याचीही चर्चा होती. त्यातच आता पुन्हा मुंढेंच्या बदलीचे आदेश निघाले आहेत. दरम्यान, मुंढे यांची गेल्या १६ वर्षांत तब्बल २० वेळा बदली झाली आहे.
कोणकोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली?
१. सुजाता सौनिक (१९८७) – गृह विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी
२. एस वी आर श्रीनिवास (१९९१) विशेष कर्तव्य अधिकारी (OSD), धारावी पुनर्विकास प्रकल्प, मुंबई
३. लोकेश चंद्र (१९९३) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD), MAHADISCOM, मुंबई
४. राधिका रस्तोगी (१९९५) यांना प्रधान सचिव आणि विकास आयुक्त, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
५. आय ए कुंदन (१९९६) प्रधान सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई