इम्फाळ: मणिपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बंडखोरांना शस्त्रे टाकून आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले होते. यानंतर मणिपूरच्या विविध ठिकाणांहून १४० शस्त्रे आत्मसमर्पण करण्यात आली आहेत. दरम्यान, आज इम्फाळ पूर्व, विष्णुपूरसह अनेक हिंसाचारग्रस्त जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू ८ ते १२ तासांसाठी शिथिल करण्यात आला आहे. तामेंगलाँग, नोनी, सेनापती, उखरुल, कमजोंग या भागातून कर्फ्यू पूर्णपणे हटवण्यात आला आहे.
आत्मसमर्पण करण्यात आलेल्या १४० शस्त्रांस्त्रांमध्ये या शस्त्रांमध्ये SLR 29, कार्बाइन, AK, INSAS रायफल, INSAS LMG, 303 रायफल, 9mm पिस्तूल, 32 पिस्तूल, M16 रायफल, स्मॉग गन आणि अश्रुधुराचे गोळे, स्टेन गन, मॉडिफाईड रायफल, ग्रेनेड यांचा समावेश आहे.
मणिपूरमध्ये मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये वाद आहे. या वादाचे रुपांतर हिंसाचारात झाले आणि त्यात आतापर्यंत ९८ लोक ठार झाले आहेत, तर जखमींची संख्या ३०० च्या पुढे गेली आहे. गेल्या २४ तासांपासून हिंसाचाराची कोणतीही घटना घडलेली नाही.
अमित शहांचे आवाहन
गृहमंत्री अमित शहा २९ मे रोजी चार दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर आले होते. येथे त्यांनी हिंसाचारग्रस्त भागाचा आढावा घेतला आणि हिंसाचाराच्या चौकशीचे आदेश दिले. ते म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांचे एक पॅनेल मणिपूरमधील हिंसाचाराची चौकशी करेल. कुकी आणि मेईतेई समुदायातील पीडित लोकांचीही त्यांनी भेट घेतली. यासोबतच मदत छावण्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षेचा आढावा घेतला.
अमित शाह यांनी इम्फाळमध्ये उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. सशस्त्र हल्लेखोरांवर कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले. ज्यांनी शस्त्रे लुटली आहेत त्यांनी ती तात्काळ परत करावीत, जेणेकरून राज्यात शांतता कायम राहील, असे आवाहन त्यांनी केले होते. या आवाहनाचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.