Tuesday, April 29, 2025

कोकणमहाराष्ट्रताज्या घडामोडीरायगड

रायगडावर तुफान गर्दी!

रायगडावर तुफान गर्दी!

शिवराज्याभिषेक दिनासाठी दिग्गज नेते उपस्थित

महाड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने राज्यभर मोठा जल्लोष पाहायला मिळतो आहे. रायगडावर चैतन्य अवतरल्याचे दिसून येते आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रायगडावर शिवभक्त मोठ्या प्रमाणावर आले आहेत. तुफान गर्दी झाल्याने जागेच्या मर्यादेमुळे काहींना अद्याप गडावर जाऊ दिलेले नाही. तरीसुद्धा शिवप्रेमींमध्ये उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.

या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज नेते रायगडावर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगडावर पोहचले असून छत्रपती उदयनराजे देखील रायगडावर आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सहपरिवार या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे, राम शिंदे, मंत्री उदय सामंत, दादा भूसे आदी नेते मंडळी देखील या सोहळ्यासाठी रायगडावर पोहचली आहे.

या सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर सर्वत्र फुलांची आरास करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला फुलांनी सजवण्यात आले आहे. तसेच महाराजांच्या बसलेल्या स्थितीतील चांदीच्या पुतळ्याच्या पालखीला देखील सजवण्यात आले आहे.

मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते आरती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शिवरायांची आरती करण्यात आली. यावेळी उदयनराजे भोसले देखील उपस्थिती होते.

हेलिकॉप्टरने किल्ले रायगडावर पुप्षवृष्टी

रायगडावर प्रशासनाच्या वतीने हेलिकॉप्टरद्वारे पृष्पवृष्टी करण्यात आली.

पोलिसांकडून मानवंदना

पोलिसांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. त्याचबरोबर विविध ढोलपथकांनी देखील या ठिकाणी वादन केले. ढोलताशकांच्या वादनाने संपूर्ण किल्ले रायगड दुमदुमून गेला आहे.

Comments
Add Comment