केरळच्या किनारपट्टीवर ४ किंवा ५ जूनला धडकणार!
केरळ : मान्सून सध्या दक्षिण अरब सागर, मालदीव, कोमोरिन क्षेत्रात आहे. दक्षिण बंगालची खाडी व पूर्व मध्य बंगाल खाडीतही मान्सून आगेकूच सुरू असून मान्सून ४ किंवा ५ जूनपर्यंत केरळ किनारपट्टीवर धडकेल.
मान्सूनचे आगमन जरा लांबले असले तरीही गेल्या १०-११ दिवसांत मान्सूनने केलेली वाटचाल आता एकाच दिवसात पूर्ण केल्याचे समजते. सध्या मान्सून केरळच्या किनाऱ्यापासून ४०० किमीवर आहे.
१४-१५ जून रोजी राज्यात मान्सून दस्तक देणार
महाराष्ट्रात यंदा मान्सून सुमारे ८ दिवस उशिराने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे १४-१५ जून रोजी राज्यात मान्सून दस्तक देऊ शकतो. मागील वर्षांच्या तुलनेत यावर्षी जून महिन्यात २५ टक्के कमी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
दक्षिण-मध्य कोकणात सामान्य पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या वेळी जून महिन्यात तापमान एक-दोन अंशांनी वाढण्याची शक्यता आहे.
पुढचा एक आठवडा मान्सूनची गती कमी असेल. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात त्याचा वेग वाढून तो कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, ईशान्येतील सात राज्यांत दिसेल.
मान्सूनपूर्व हंगामात उष्णतेची लाट आवश्यक असते. त्यामुळे जमिनीतील आर्द्रता संपून ती मान्सूनला आकर्षित करण्यासाठी मदत करते. परंतु या वेळी असे झाले नाही. मार्च ते मे दरम्यान १२ टक्के पाऊस झाला. राज्यवार पाहिल्यास सर्वाधिक १३६ टक्क्यांहून जास्त पाऊस मध्य भारतात (मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओदिशा, गुजरात, महाराष्ट्र) झाला. पश्चिम बंगाल, बिहार व झारखंड वगळता देशातील उर्वरित भागात एप्रिल-मे दरम्यान उष्णतेची लाट नव्हती.