मेक्सिको (वृत्तसंस्था): उत्तर अमेरिकेतील मेक्सिकोत एक अत्यंत अमानवीय कृत्य घडले आहे. मेक्सिकोमध्ये तब्बल ४५ बॅगांमध्ये मानवी शरीराचे तुकडे सापडले आहेत. मेक्सिकोमधील जेलिस्को या राज्यामध्ये हा प्रकार घडला आहे. येथे मागील काही दिवसांपासून ७ बेपत्ता लोकांचा तपास पोलिसांकडून करण्यात येत होता. याचदरम्यान पोलिसांना या बॅग सापडल्या आहेत. तसेच या सर्व बॅगा एका खड्ड्यात सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, या ४५ बॅगमध्ये महिला आणि पुरुषांच्या शरीराचे तुकडे सापडले आहेत. पोलिसांना मंगळवारी जेलिस्कोमधील जापोपन या उपनगराती नगर पालिकेच्या परिसरात एका खड्ड्यात शरीरराचे तुकडे असलेल्या ही बॅगा सापडल्या.
दरम्यान, बेपत्ता लोकांमध्ये ३० वर्षांच्या दोन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. हे सर्वजण गेल्या महिन्याच्या २० तारखेपासून बेपत्ता आहेत. तसेच या सर्व लोकांच्या बेपत्ता झाल्याच्या तक्रारी वेगवेगळ्या दिवशी आणि वेगवेगळ्या ठिकाणी नोंदवण्यात आल्या होत्या. परंतु तपास करताना असे निदर्शनास आले की ही सर्व माणसं एकाच कॉल सेंटरमध्ये काम करत होते.
तसेच ज्या भागातून शरीराचे हे तुकडे सापडले त्याच भागात हे कॉल सेंटर आहे. फॉरेंसिक तज्ञांनी अद्याप मृत्यू झालेल्या लोकांची एकूण संख्या आणि त्यांच्या ओळखीविषयी माहिती दिलेली नाही. पोलिसांना प्राथमिक तपासात या कॉल सेंटरमध्ये काही अवैध कामं केली जात असल्याची माहिती मिळाली आहे. अशाचप्रकारे काही वर्षांपूर्वीदेखील पोलिसांनी याच राज्यात वेगवेगळ्या भागांमध्ये मानवी शरीराचे तुकडे सापडले होते. जस्लिस्कोमधील टोनाल नगरपालिकेच्या परिसरात २०२१ मध्ये अकरा माणसांच्या शरीराचे तुकडे ७० बॅगमध्ये मिळाले होते. याशिवाय २०१९ मध्ये जपोपनमध्ये एका अज्ञातस्थळी ११९ बॅगमध्ये २९ लोकांचे मृतदेह आढळून आले होते.