नवी दिल्ली : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी वंदे भारत ट्रेनबाबत मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, वंदे भारत ट्रेन जूनपर्यंत सर्व राज्यांमध्ये पोहोचेल. पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत २०० शहरे ‘वंदे भारत’शी जोडण्याचे आमचे ध्येय आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव बोलत होते. ते म्हणाले, भारताची वंदे भारत ट्रेन ही जागतिक दर्जाची ट्रेन बनली आहे, जी ताशी १६०-१८० किमी वेगाने धावते. अशा ट्रेन तयार करण्याची क्षमता जगातील फक्त ८ देशांमध्ये आहे.
दरम्यान, त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधत, २००४ ते २०१४ हे दशक भारतासाठी हरवलेले दशक असल्याचे म्हटले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने बरीच प्रगती केली आणि भारताची अर्थव्यवस्था जगात ५ व्या क्रमांकावर आणली, असेही त्यांनी म्हटले.