आपल्या देशावर आणि राज्यावर ज्या विदेशी आक्रमकांनी कित्येक वर्षे जोरजुलूम, अत्याचार करीत सत्ता राबविली, त्या आक्रमकांची नावे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ किंवा आठवण म्हणून ज्या ज्या ठिकाणांना देण्यात आली आहेत ती कायमची पुसून त्या ठिकाणी आपल्या देशातील, राज्यातील पराक्रमी राजे, समाजसुधारक तसेच अन्य थोर विभूतींची नावे देण्याची कल्पना आणि मागणी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वतंत्र भारतात जागोजागी होत होती. पण त्याकडे तत्कालीन राज्यकर्त्यांनी म्हणावे तितके लक्ष दिले नाही. कालांतराने देशात भाजप पुरस्कृत नरेंद्र मोदी यांचे सरकार येताच या व अशा अनेक मागण्यांची पूर्तता होऊ लागली. त्यात उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांनी बाजी मारल्याचे दिसले. त्यांनी अलाहाबादचे प्रयागराज केले. असे कित्येक बदल तिथे करण्यात आले. त्यानंतर देशात बऱ्याच ठिकाणी नामांतराच्या मागण्या जोर धरू लागल्या. त्यात महाराष्ट्रात औरंगाबाद, उस्मानाबादप्रमाणेच अहमदनगर शहराचे नाव बदलण्याची मागणी काही दिवसांपासून होत होती. राज्यात भाजप – शिवसेना युतीचे सरकार स्थानापन्न होताच अशा अनेक प्रलंबित मागण्या पुढे येऊ लागल्या आणि कमाल म्हणजे शिंदे – फडणवीस सरकारने एकामागोमाग एक अशा या मागण्या पूर्ण करण्याचा जणू सपाटाच चालवला.
प्रथम औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. त्यानंतर उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण केले गेले. त्यातच अहमदनगर शहराचे नामांतर करण्याच्या मागणीने जोर धरला होता. तथापि, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८व्या जयंतीनिमित्त बुधवारी अहमदनगरच्या चौंडी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाषण करताना राम शिंदे यांनी अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्याची मागणी केली, तर गोपीचंद पडळकर यांनीदेखील याबाबतची मागणी केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्स्फूर्तपणे केलेल्या आपल्या भाषणात अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होणार, अशी मोठी घोषणा केली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील याबाबतची घोषणा केली आणि आपल्या सरकारच्या कार्यकाळात अहिल्यानगर असे नाव होणे हे आमचे भाग्य आहे, असे सांगूनही टाकले.
मलिक अहमद निजामशाह याच्या ताब्यात तेव्हा बहुतांश महाराष्ट्र होता तेव्हा याच निजामशाह याने हे शहर वसविल्याने त्याचे नाव शहराला देण्यात आले होते. आता या गोष्टीला कित्येक वर्षे लोटली असून अशा आक्रमकांची नावे पुढे कायम ठेवण्यात कोणतेही हशील नाही. त्यामुळे अहमदनगर शहराचे नामांतर करण्याची मागणीने जोर धरला होता. महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी गावात ३१ मे १७२५ रोजी जन्मलेल्या पराक्रमी राणी अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची मागणी त्यामुळेच सर्वानुमते केली गेली.
अहिल्याबाईंचे वडील माणकोजीराव शिंदे हे गावचे पाटील होते. त्या वेळी स्त्रियांना शाळेत जाण्याची परवानगी नसली तरी अहिल्याबाईंच्या वडिलांनी त्यांना लिहायला आणि वाचायला शिकवले. मराठा पेशवे बाळाजी बाजीराव आणि माळवा राजाच्या सेवेतील सेनापती मल्हारराव होळकर हे पुण्याला जाताना चौंडी येथे थांबले होते. तेव्हा गावातील मंदिरात आठ वर्षांच्या अहिल्याबाईंना त्यांनी पाहिले. त्यांची बुद्धिमत्ता आणि सचोटी ओळखून त्यांनी या मुलीला खंडेराव याची पत्नी म्हणून होळकर प्रदेशात नेले. मराठा साम्राज्याचे महान शासक खंडेराव होळकर यांच्या त्या पत्नी होत्या. अहिल्यादेवींचे पती १७५४ मध्ये युद्धात मारले गेले. तिचे सासरे मल्हारराव होळकर यांचे बारा वर्षांनी निधन झाले. त्यांनर त्यांनी १७६६ ते १७९५ या काळात मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले. मल्हार राव यांनी प्रशासकीय आणि लष्करी अशा दोन्ही गोष्टी त्यांनी शिकवल्या होत्या. अहिल्यादेवींचे कर्तृत्व म्हणजे इंदूरचे एका छोट्या गावातून समृद्ध आणि आकर्षक अशा महानगरात त्यांनी रूपांतर केले. तसेच स्वतःची राजधानी म्हणून नर्मदा नदीच्या काठी महेश्वर ही वसाहत त्यांनी स्थापन केली. अहिल्यादेवी या अनेक हिंदू मंदिरांच्या संरक्षक होत्या. माळव्यातील किल्ले आणि रस्त्यांची उभारणी त्यांनी केली. सणांनाही मोठा निधी दिला.
ग़८माळव्याच्या बाहेर अनेक मंदिरे, घाट, विहिरी, टाक्या आणि विश्रामगृहे बांधली. हिमालयापासून दक्षिण भारतापर्यंत पसरलेली काशी, गया, सोमनाथ, अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीनारायण, रामेश्वर आणि जगन्नाथपुरी ही तीर्थक्षेत्रे त्यांनी सुशोभित केली, असे भारतीय संस्कृती कोषात म्हटले आहे. बँकर्स, व्यापारी आणि शेतकरी समृद्ध होताना पाहून अहिल्यादेवींना आनंद होत होता; परंतु त्यांनी त्या सर्वांच्या पैशावर कर किंवा सरंजामशाही अधिकारांद्वारे मिळणारे सर्व दावे नाकारले. मात्र मिळालेल्या कायदेशीर नफ्यातून त्यांनी सर्व गोष्टींना निधी पुरविला. त्या काळात लगतच्या भोपाळ, जबलपूर किंवा ग्वाल्हेर यांच्याशी तुलना केली असता, भारताच्या स्वातंत्र्यानंतर आर्थिकदृष्ट्या, व्यवसाय, आर्थिक विकासाद्वारे आणि राजकीयदृष्ट्या प्रभावी सरकारच्या निर्मितीद्वारे इंदूर शहराची लक्षणीय वाढ झाली आहे. रहिवासी अभिमानाने घोषित करतात की, ते ‘मिनी-मुंबई’मध्ये असा ६०० किलोमीटर दूर असलेल्या या विशाल महानगराचा संदर्भ देतात. अहिल्यादेवींचे सत्कर्म, धार्मिक भक्ती आणि सशक्त धोरणांचा वारसा यांनी शहराला एकविसाव्या शतकात समृद्ध केले. विशेष म्हणजे त्याकाळी राजमाता अहिल्यादेवी होळकर नसत्या तर काशी राहिली नसती. त्या नसत्या तर शिवाची मंदिरेही आपल्याला दिसली नसती. त्या नसत्या तर दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत हिंदू धर्म आज जो जिवंत आहे, तोही राहिला नसता. अशा प्रकारचे महत्कार्य या राजमातेने करून दाखवले आहे. त्यामुळे अहमदनगरचे नामकरण ‘अहिल्यानगर’ करणे म्हणजे या महान विभूतीच्या कार्याचे कायम स्मरण ठेवणे होय.