Thursday, July 25, 2024
Homeब्रेकिंग न्यूज‘जेजे’रुग्णालयात नक्की चाललंय काय?

‘जेजे’रुग्णालयात नक्की चाललंय काय?

  • निवासी डॉक्टर संपावर, लहानेंना हटवण्याची मागणी

  • डॉ. अशोक आनंद आहेत तरी कोण?

मुंबई : सर जे. जे. रुग्णालयातील नेत्र विभागात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नियम पायदळी तुडवले जात असून वरिष्ठ डॉक्टर मनमानी कारभार करत असल्याची तक्रार करत निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने संपाचे हत्यार उपसले आहे.

नेत्र विभागप्रमुख आणि डॉ. तात्याराव लहाने यांना या विभागातून दूर करावे, या मागणीसह बेमुदत काळासाठी हा संप पुकारला आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे निवासी डॉक्टरांच्या संघटनेने सांगितले.

नेत्र विभागातील पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या २८ निवासी डॉक्टरांनी डॉ. लहाने बेकायदेशीरपणे विभाग चालवत असल्याचा आरोप केला आहे. तसेच या विभागात काम करणाऱ्या डॉक्टरांना सर्जरी शिकविण्यात येत नसून याचा परिणाम त्यांचा दैनंदिन शिक्षणावर होत आहे. वैद्यकीय आयोगाच्या नियमाप्रमाणे या विभागातील पदे भरली गेली पाहिजे. मात्र, तसे या विभागात झालेले नाही, असे मार्डचे म्हणणे आहे.

बुधवारी सायंकाळी पाचनंतर पुकारण्यात आलेल्या संपामुळे रुग्णालयाच्या नियमित कामावर परिणाम झाला असून रुग्ण सेवा कोलमडली आहे.

अशा आहेत मागण्या…

 दोन्ही डॉक्टरांची नेत्र विभागातून तत्काळ बदली करा.
 वैद्यकीय आयोगाच्या नियमानुसार विभागातील पदे भरा.
 पहिल्या वर्षाच्या निवासी डॉक्टरांचे तीन महिन्याचे थकीत विद्यावेतन द्यावे.
 तिसऱ्या वर्षातील निवासी डॉक्टरांची थकीत देणी देण्यात यावी.

हे पण वाचा : जे. जे. रुग्णालयातील नेत्रतज्ञ्ज डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह ९ डॉक्टरांचे तडकाफडकी राजीनामे

सर जे जे रुग्णालयातील नेत्र विभागप्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्यासह नऊ अध्यापकांनी बुधवारी राजीनामा दिला. निवासी डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या तक्रारीमुळे आणि गेल्या वर्षभरात रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी केलेल्या छळवणुकीमुळे राजीनामा देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी नेत्र विभागात पदव्युत्तर शाखेच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाला शिकत असणाऱ्या २८ निवासी डॉक्टरांनी डॉ. रागिणी पारेख आणि डॉ. तात्याराव लहाने त्रास देत असल्याची तक्रार राष्ट्रीय वैद्यकीय आयोग, वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री, सचिव, संचालक आणि जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडे केली होती. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता समिती नेमण्यात आली आहे.

त्या समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक आनंद यांना केले आहे. काही वर्षांपूर्वी याच डॉ. अशोक आनंद यांची महिला छळ प्रकरणी डॉ. रागिणी पारेख यांनी चौकशी केली होती. तसेच डॉ. आनंद यांनी डॉ. तात्याराव लहाने यांच्या विरोधात ॲट्रोसिटीची पोलीस तक्रार दाखल केली होती. त्यामुळे या अशा व्यक्तीकडून चौकशी करण्याऐवजी समितीचा अध्यक्ष बदलावा, अशी विनंती करण्यात आली होती.

मात्र, अधिष्ठात्यांनी तसे न करता चौकशी सुरू ठेवली. यामुळे आकसबुद्धीने ही चौकशी करत असल्याचे अध्यापकांतर्फे सांगण्यात येत आहे. तसेच गेल्या वर्षभरात अधिष्ठात्यांनी या विभागासाठी कोणतीही मदत केलेली नाही, असा आरोपही करण्यात आलेला आहे.

त्यांच्या या आहेत मागण्या…

  • या विभागाची रुग्ण सेवा सुरळीत ठेवायची असल्यास अधिष्ठात्यांविरोधात योग्य ती कारवाई करावी.
  • निवासी डॉक्टरांना भडकाविणाऱ्या तीन निवासी डॉक्टरांची नोंदणी रद्द करावी तसेच इतर निवासी डॉक्टरांना समज द्यावी.
  • डॉ. रागिणी पारेख यांची स्वेच्छानिवृत्ती मंजूर करावी. त्याचप्रमाणे सर्व अध्यापकांचे राजीनामा मंजूर करून त्यांना कार्यमुक्त करावे.

दरम्यान, अधिष्ठाता कार्यालयात कोणतेही राजीनामे आलेले नाहीत. डॉ. रागिणी पारेख १५ दिवस रजेवर गेल्याचा त्यांचा अर्ज आला आहे. राजीनाम्याचा अर्ज आलेला नाही. मी कुणाला काय त्रास दिला हे सांगावे. डॉ. लहाने महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त कार्यक्रमांतर्गत काम करत आहेत. ते जे. जे. आस्थापनेवर नसल्याने त्यांच्या जे. जे. मधील राजीनाम्याचा प्रश्न येत नाही, असे अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -