मुंबई : आताच्या घडीला देशात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली वंदे भारत एक्स्प्रेस आता मुंबई-गोवा मार्गावर सुरू करण्यात येत आहे. कोकण रेल्वेवरील वंदे भारतला येत्या शनिवारी, म्हणजेच ३ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर, ५ जूनपासून ही गाडी प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी दाखल होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसबाबत रेल्वे प्रवासी तसेच पर्यटकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मडगाव स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर एकवरून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सकाळी साडेदहा वाजता ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. मुंबई गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आठ डब्यांची असल्याचे सांगितले जात आहे. १६ मे रोजी मुंबई-गोवा कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारतची चाचणी घेण्यात आली होती. ती यशस्वी झाल्यानंतर आता वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. दरम्यान, वंदे भारतच्या तिकीट दरांबाबत अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही.
मुंबईकरांना मिळणारी ही चौथी वंदे भारत ट्रेन असून ती आठवड्याला सहा दिवस चालवण्याचे ठरवण्यात आले आहे. शुक्रवारी ही सेवा बंद राहील, असे सांगण्यात आले आहे. तेजस एक्स्प्रेसपेक्षा जलद धावणारी ही ट्रेन कोकण मार्गावरील सर्वात जलद एक्स्प्रेस असणार आहे. यातच आता वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक समोर आले आहे. मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईतून कधी सुटणार, गोव्यातून परतीचा प्रवास कधी असेल, तिचे थांबे कुठे असतील, याबद्द्ल सविस्तर…
मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक
मुंबई ते मडगाव थांबे आणि वेळ
- CSMT – पहाटे ५ वाजून २५ मिनिटे
- दादर – पहाटे ५ वाजून ३२ मिनिटे
- ठाणे – पहाटे ५ वाजून ५२ मिनिटे
- पनवेल – सकाळी ६ वाजून ३० मिनिटे
- रोहा – सकाळी ७ वाजून ३० मिनिटे
- खेड – सकाळी ८ वाजून २४ मिनिटे
- रत्नागिरी – सकाळी ९ वाजून ४५ मिनिटे
- कणकवली – सकाळी ११ वाजून २० मिनिटे
- थिविम – दुपारी १२ वाजून २८ मिनिटे
- मडगाव – दुपारी ०१ वाजून १५ मिनिटे
मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक
मडगाव ते मुंबई थांबे आणि वेळ
- मडगाव – दुपारी ०२ वाजून ३५ मिनिटे
- थिविम – दुपारी ०३ वाजून २० मिनिटे
- कणकवली – दुपारी ०४ वाजून १८ मिनिटे
- रत्नागिरी – सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटे
- खेड – रात्री ०७ वाजून ०८ मिनिटे
- रोहा – रात्री ०८ वाजून २० मिनिटे
- पनवेल – रात्री ९ वाजता
- ठाणे – रात्री ०९ वाजून ३५ मिनिटे
- दादर – रात्री १० वाजून ०५ मिनिटे
- CSMT – रात्री १० वाजून २५ मिनिटे