Thursday, July 18, 2024
Homeमहाराष्ट्रकोकण३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात शिवप्रेमींसाठी राज्य शासन सज्ज

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात शिवप्रेमींसाठी राज्य शासन सज्ज

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगडावर १० हजार लीटर तसेच पायथ्याशी ४० हजार लीटर पाणीसाठा

रायगड : यावर्षी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५०वा शिवराज्याभिषेक सोहळा ६ जूनला मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. खारघर येथे उष्माघातामुळे झालेला प्रसंग पुन्हा उद्भवू नये यासाठी शासन आरोग्यविषयक पुरेपूर खबरदारी घेणार आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगडावर १० हजार लीटर तसेच पायथ्याशी ४० हजार लीटर पाणीसाठा उपलब्ध करण्यात आला आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत आहेत. या कार्यक्रमांना मिळणारा प्रतिसाद पाहता शिवराज्याभिषेकादिवशी रायगडावर प्रचंड गर्दी पाहायला मिळेल. हीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने उपस्थितांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष पाऊले उचलली आहेत.

शिवराज्याभिषेकाला लाखो शिवप्रेमी रायगडावर येतील त्यामुळे त्यांचा ऊनापासून बचाव करण्यासाठी रायगडाच्या पायथ्यापासून ते रायगडापर्यंत एकूण २४ वैद्यकीय मदत कक्ष उभारण्यात आले आहेत. रायगडावर चढताना त्रास होऊ नये यासाठी दीड लाख पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्सची व्यवस्था केली जाणार आहे. सोबतच अत्यावश्यक सेवेसाठी रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या आहेत. शिवभक्तांना आरामासाठी खाटांचीही सोय करण्यात आलेली आहे. पर्यटकांसाठी कोंझर, वालुसरे, पाचाड येथे वाहन पार्किंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. येथे एकाच वेळी साडेतीन हजार वाहने पार्क करता येतील.

“फक्त उष्माघातापासून बचाव म्हणून नाही तर येणार्‍या शिवप्रेमींना इतरही काही त्रास होत असेल तर त्याकरिता ३५० डॉक्टरांचा चमू पायथ्यापासून ते गडापर्यंत सेवेसाठी सज्ज असेल”, अशी माहिती रायगड जिल्हा आरोग्य प्रशासनाचे अधिकारी सुधाकर मोरे यांनी दिली. तसेच प्रत्येक शिवप्रेमीने आपल्याजवळ एक पाण्याची बोटल ठेवावी व डोक्याला रुमाल बांधावा किंवा टोपी, कॅप, हॅट घालावी जेणेकरुन ऊनापासून संरक्षण होईल, असा सल्लाही त्यांनी दिला.

कोणताही दुर्घटना होऊ नये यासाठी शिवप्रेमींच्या सुरक्षिततेकरता जवळपास २ हजार पोलीस तैनात करण्यात आहेत. तसेच गडावर १०९ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. या सर्व खबरदारीमुळे येणार्‍या शिवभक्तांना कोणतीही काळजी न करता जल्लोषात साजर्‍या होणार्‍या शिवराज्याभिषेकाचा आनंद घेता येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -