मुंबई (वृत्तसंस्था) : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या गुडघ्यावर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याचे समजते. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. धोनीच्या गुडघ्याचे ऑपरेशन डॉ. दिनशॉ परडीवाला यांनी केले. कार अपघातानंतर ऋषभ पंत आणि भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणारे नीरज चोप्रा यांचे ऑपरेशन करणारे हेच डॉक्टर आहेत.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध खेळताना महेंद्रसिंह धोनीला दुखापत झाली होती. या सामन्याच्या चेंडू रोखण्यासाठी धोनीने डाईव्ह मारली. डाईव्हनंतरच धोनीला दुखापत झाल्याचे समजते. मात्र तरीही त्याने विकेटकीपिंग करणे सोडले नव्हते. या सामन्यानंतर धोनी संपूर्ण हंगामात गुडघ्याच्या दुखापतीशी झुंजताना दिसला.