Tuesday, July 23, 2024
Homeमहाराष्ट्रठाणे'ते' वक्तव्य जितेंद्र आव्हाडांना भोवणार!

‘ते’ वक्तव्य जितेंद्र आव्हाडांना भोवणार!

आव्हाडांची आमदारकी रद्द करण्यासाठी सिंधी समाजाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ठाणे : आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उल्हासनगरमधील एका कार्यक्रमात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सिंधी समाज संतापला आहे. सिंधी समाजाने आक्रमक होत ठाण्यातील कोपरी भागात बुधवारी एक मेळावा घेतला आणि आव्हाडांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध केला. तसेच असंसदीय शब्दांचा वापर करणाऱ्या आव्हाडांची आमदारकी रद्द करण्याची मागणी हा समाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे करणार आहे.

उल्हासनगर प्रभात गार्डन कॅम्प-५ जवळ २७ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना जितेंद्र आव्हाड यांची जीभ चांगलीच घसरली. मंत्री पदावर राहिलेल्या आव्हाड यांनी यावेळी बोलताना सिंधी समाजाला कुत्र्यांची उपमा दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर सिंधी समाज आक्रमक झाला आहे.

जोपर्यंत जितेंद्र आव्हाड माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या घरावर मोर्चा काढणे, कोपरी बंद ठेवणे, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देणे या संविधानिक मार्गाने निषेध नोंदवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यावेळी शिवसेनेचे प्रकाश कोटवानी, गोपाळ लांडगे, हेमंत पमनानी, दिपक घनशानी यांच्यासह कोपरीतील सिंधी समाज तसेच इतर समाजातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीनंतर आव्हाडांची आमदारकी रद्द करण्याची मागणी सिंधी समाजाने लावून धरली आहे.

उल्हासनगर शहरात ठिकठिकाणी जोरदार निदर्शने

आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी उल्हासनगर शहरात ठिकठिकाणी जोरदार निदर्शने करण्यात आली. जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाची लेखी माफी मागावी, अशी मागणी होत आहे.

नाशिक येथे नोंदवला निषेध

सिंधी समाजाचा अपमान झाल्याची भावना समाजाने व्यक्त करीत आव्हाड यांचा नाशिक येथे निषेध नोंदवला. यापुढे समाजाचा अपमान सहन केला जाणार नाही, असे नाशिक, तपोवन, लिंक रोड येथील रामी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या निषेध बैठकीत निर्धार करण्यात आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -